जगाकडचे डोळे भक्तानं मोडून तर टाकले आहेत आणि तेवढय़ानंही तो सद्गुरू प्रसन्न होऊन त्या भक्ताच्या प्रेमहीन, भावहीन अंत:करणात शुद्ध प्रेम, शुद्ध भाव उत्पन्न करतो. हे शुद्ध प्रेम आणि शुद्ध भाव पेलवणं त्या साधकासाठी सोपं नसतंच. साधना सुरू करताच अनेक अनुभव येऊ शकतात, पण त्यांचा अर्थ आणि अन्वय लावता येत नाही. अंतर्मुखता वाढत असते आणि अष्टसात्त्विक भावाच्या कळ्याही जन्मून अलगद उमलू लागलेल्या असतात. ही भावस्थिती अतिशय नाजूक आणि तितकीच धोकादायकही असते! कारण साधकाची शक्ती हा व्यापक अनुभव पेलू शकत नाही आणि इथूनच साधकाची घसरणही शक्य असते आणि म्हणूनच त्याला सद्गुरूच्या शक्तीचंच पाठबळ आवश्यक असतं. त्यामुळेच इथं सारंगधर अवतीर्ण होतो. त्या सद्गुरूंचं वर्णन नाथ करतात, ‘‘हातीं घेऊन सारंगपाट!’’ सारंगपाट म्हणजे धनुष्यबाण. तर हा सद्गुरू धनुष्यबाण घेऊन सरसावतो. धनुष्यबाण हे मोठं रूपक आहे. धनुष्याच्या दोन भुजा असतात आणि त्याची प्रत्यंचा ताणून जो बाण सोडतात तो लक्ष्यावर अचूक नेम साधतो. अगदी त्याचप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ या दोन भुजांचं धनुष्य हाती घेऊन साधनेची प्रत्यंचा ताणून सद्गुरू बोधानुरूप आचरणाचा जो बाण सोडला जातो तो लक्ष्याचा भेद करतो अर्थात ‘मी’चाच नाश करतो! कुंडलिनी जागृतीच्या अंगानं विचार केला तर हा सद्गुरू कृपाशक्तीरूपी बाण सहस्रारचक्राचा भेद करीपर्यंत वेगानं ऊध्र्वगामी मार्गक्रमण करतो. भक्तीच्या अंगानं पाहिलं, तर हा बाण भक्ताला परमतत्त्वापासून पुन्हा विभक्त करू शकणाऱ्या त्याच्या शत्रूंचा नाश करतो! आता भक्ताचे हे शत्रू कोण? तर त्याचेच आंतरिक विकार! समर्थही याच गोष्टीचं वर्णन करताना म्हणतात की, ज्याच्या मुखी सदैव त्या राघवाचं नाम गर्जत असतं, अर्थात जो सदैव साधनारत असतो अशा भक्ताच्या शत्रूंचा वेध तो राघव अर्थात तो सद्गुरूच घेत असतो.. ‘भक्तरीपूशिरी काम्बि वाजे’! आता या विकारांचा नाश होतो, म्हणजे नेमकं काय होतं? तर या विकारांचा आंतरिक धारणेवर जो प्रभाव असतो तो ओसरू लागतो. विकारांची ओढ जशी उरत नाही त्याचप्रमाणे विकारांची घृणाही उरत नाही. कारण ओढीतून जीव जसा विकारांना घट्ट चिकटतो त्याचप्रमाणे त्यांच्याबाबत घृणाभाव जोपासण्याचा प्रयत्न करून, त्या विकारांचा अट्टहासाने त्याग करण्याची धडपड करून तो विकारांमध्ये अधिकच अडकत जातो. ज्याप्रमाणे चिखलात रुतलेल्या माणसानं त्या चिखलातून सुटण्यासाठी जितकी जोरात हालचाल करावी तितकाच तो त्या गाळात अधिक खोलवर रुतत जातो त्याप्रमाणे ही दशा होते. तेव्हा ना ओढ ना घृणा या पद्धतीने साधक तटस्थपणे आपल्या आंतरिक विकारतरंगांकडे पाहू लागतो. तेव्हा विकार क्षीण होत जातात आणि त्यांच्या जागी अंत:करणात क्षीणपणे अष्टसात्त्विक भाव जागृत होऊ लागतात. त्या अष्टसात्त्विक भावानं मन हळवं बनू लागतं. या टप्प्यावरही कच्चं असलेलं मन जगाकडेच पुन्हा घसरण्याचा धोका असतो. त्यातून ते भावनिक गुंत्यात अडकू शकतं. जगातल्या दु:खाचं खरं मूळ शोधणं आणि त्यावर उपाय शोधणं, हे या मनाच्या आवाक्यात नसतं. त्यामुळे अशाश्वत माणसांच्या अशाश्वत दु:खांमध्येच ते घोटाळत राहातं. तेव्हा अशा या साधकाला भ्रम, मोह, विकार यांच्या पकडीतून सोडवण्यासाठी सद्गुरूच धनुर्बाण हाती घेतात आणि लक्ष्यावर नेम धरतात!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व चिंतनधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chintandhara loksatta philosophy
First published on: 15-03-2018 at 03:16 IST