श्रावण महिना सुरू झाला आहे. धार्मिक प्रथांमध्ये या महिन्याचं महत्त्व पूर्वापार आहेच. चातुर्मासाची सुरुवातही या महिन्यापासून होते. हे चार महिने खरंतर साधनेच्या दृष्टीनंही महत्त्वाचे. या चार महिन्यांत आहार-विहाराची पथ्यं बरेचजण पाळतात. पण साधकानं आध्यात्मिकदृष्टय़ा चातुर्मासाकडे आणि श्रावणाकडे पाहिलं पाहिजे. माणूस वर्षांचे बाराही महिने प्रपंचातच गुंतला असतो. त्या बारा महिन्यातले चार महिने तरी त्यानं आत्मचिंतनासाठी द्यायला पाहिजेत, असा या चातुर्मासामागचा खरा हेतू असावा. तेव्हा हा हेतू साधकानं अधिक तीव्रतेनं आपल्या अंत:करणात बिंबवला पाहिजे. श्रवण नक्षत्रावरून या महिन्याला श्रावण नाव पडलं, असं सांगतात. ‘श्रवण’ ही नवविधा भक्तीतली पहिली भक्ती आहे. या महिन्यात अनेक धार्मिक सद्ग्रंथांचं श्रवणही करण्याची प्रथा आहे. श्रवण म्हणजे ऐकणं. सद्गुरूबोध कानांत साठवून घेणं. खरं ऐकणं म्हणजे जे ऐकलं ते कृतीत उतरवणं! नुसतं ऐकून उपयोग नाही, नुसतं ऐकण्याचं व्यसन असूनही उपयोग नाही. जे ऐकलं त्यातलं जमेल तेवढं तरी प्रामाणिकपणे आचरणात उतरवलं पाहिजे. तर ते खरं ऐकणं झालं. तेव्हा हा चातुर्मास कृतीला चालना देणाराच असला पाहिजे. बरं ही कृती तरी कोणती? तर ती शाश्वत जे आहे त्यालाच अनुसरून असली पाहिजे. अर्थात आपल्या अंतरंगातील भ्रम आणि मोहाची जाणीव करून देणारी असली पाहिजे. चातुर्मास पाळण्याचा मुद्दा आला की मला हमखास श्रीगोंदवेलकर महाराज यांनी सांगितलेला अभिनव चातुर्मासच आठवतो. आपण तो वाचला असेलच, पण तरीही चातुर्मासाच्या मुहूर्तावर त्याची पुनरूक्ती करीत आहे. महाराज सांगतात त्याचा आशय असा की, ‘‘बरेचजण चातुर्मास पाळायचं ठरवतात. म्हणजे काय? तर कांदा खायचा नाही, लसूण खायची नाही वगैरे. हा चातुर्मास जे करतात ते करोत, पण माझ्या माणसानं चातुर्मास कसा करावा? तर त्यानं आपल्यातला एखादा दुर्गुण धरावा. म्हणजे समजा तुम्ही जास्त चिडता, तर मग हे चार महिने आपण चिडणार नाही, असा निश्चय करा. म्हणजेच हे चार महिने क्रोधच वज्र्य! मग जसं कोणाकडे गेलात आणि त्यांनी काही खायचं दिलं तर तुम्ही जसं सांगता की, ‘अहो माझा चातुर्मास आहे. यात कांदा-लसूण नाही ना?’ तसा रागाचा प्रसंग आला की स्वत:ला आठवण करून द्या, की आपला चातुर्मास आहे. राग आवरायचा आहे! मग जर असं एखाद्या दुर्गुणावर चार महिने नियंत्रण आणता आलं, तर मग तो नेम वर्षभरासाठी करा. आणि वर्षभर जर ते साधलं तर मग कायमसाठी करा!’’ यापुढे जाऊन महाराज सांगतात की, ‘‘असा जर चातुर्मास माझ्या माणसानं केला, तर मग त्यानं कांदा खाल्ला काय किंवा न खाल्ला काय!’’ तेव्हा आपण चातुर्मास करतो तो खाण्यातला एखादा पदार्थ वज्र्य ठरवून. त्यापेक्षा आपल्या आतला एखादा दुर्गुण वज्र्य ठरवला तर? ते साधलं तर हळूहळू दुर्गुणांच्या प्रभावातून बाहेर पडता येईल. तेव्हा या श्रावणाची सुरुवात अशी आत्मपरीक्षणातून आणि स्वसुधारणेतून साधली तर खरा चातुर्मास पाळायला सुरुवात होईल. बरं, महाराजांनी अशीही सूट दिली आहे की, काहीवेळा तुम्हाला रागवावंच लागतं. मुलावर किंवा हाताखालच्या कर्मचाऱ्यावर. पण तेव्हाही तो राग गळ्याच्या खाली असला पाहिजे. म्हणजेच चेहऱ्यावर असला पाहिजे, मनात नव्हे! मग असं व्रत पाळून पाहायला काय हरकत आहे?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– चैतन्य प्रेम

मराठीतील सर्व चिंतनधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chintandhara loksatta philosophy
First published on: 13-08-2018 at 00:46 IST