भरत म्हणाले, ‘‘मी अयोध्येत परततो, पण हे रामा तुझ्याशिवायची अयोध्या ही अयोध्याच उरलेली नाही. जणू प्राणविहीन शरीर! तेव्हा तू सदोदित माझ्या बरोबर आहेस, याची जाणीव टिकेल अशी काहीतरी खूण मला दे!’’ भरतानं प्रकटपणे रामांच्या पादुका काही मागितल्या नव्हत्या. पण लहानपणापासून प्रभूंच्या पादत्राणांवरही भरतानं आत्मीय प्रेमसिंचन केलं होतं. शरयूमध्ये प्रभु स्नानासाठी उतरत तेव्हा भरत अनेकदा ती पादत्राणं हृदयाशी कवटाळून बसत असत. जी पादत्राणं रामांचा अवघा देह ज्या पावलांवर उभा आहे त्या चरणांना कवटाळतात तीसुद्धा पवित्र आहेत, हा भाव होता. पण रामांचे चरण ज्या तत्त्वनिष्ठेच्या मार्गावरून चालतात ती तत्त्वं आचरणात आणणं, ही खरी भक्तीही भरताला साधली होतीच. तेव्हा भरतानं जेव्हा, ‘तुझ्या अस्तित्वाची जाणीव टिकेल अशी खूण दे,’ अशी विनवणी केली तेव्हा त्याला आपल्या खडावा हव्या आहेत, हे प्रभुंनी जाणलं. पण भरतासोबत गुरूजन, परिजन आणि दरबारातील मंत्रीही होते. त्यामुळे प्रभु संकोचून गेले, पण भरताच्या भक्तिप्रेमापुढे विवशही होते! मग हळूच प्रभुंनी त्या पादुका भरतांसमोर ठेवल्या आणि मग कुणाचीही भीडभाड न बाळगता त्या हृदयाशी कवटाळत त्यांना आपल्या अश्रूंनी सिंचित केलं. भगवंतानं अनन्य भक्ताला पादुका देण्याचा हा पहिला प्रसंग असावा. या पादुकांचं मोठं मनोज्ञ वर्णाान तुलसीदासांनी केलं आहे. या दोन पादुका म्हणजे आपल्या जनांचं रक्षण करणारे दोन पहारेकरीच होते! भरताला अंत:करणातील भावभक्तीचं ऐश्वर्य  साठवून ठेवता येर्क्षाल अशा त्या दोन पेटय़ाच होत्या, सत्कर्माना साह्य करणारे ते जणू दोन हातच होते, अंतरंगातला सेवाभाव जागृत होण्यासाठी परदु:खं ज्यायोगे पाहणं साधेल, असे ते दोन नेत्र होते. या दोन पादुका म्हणजे ‘रा’ आणि ‘म’ अशी अक्षरांची जोड होती. त्या पादुका म्हणजे रामांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी खूण होतीच. साधं उदाहरण घ्या. एखादय़ाच्या चपला घरात असल्या की तो घरात आहेच, असं आपण मानतोच ना? पादुकांची जी रूपकं तुलसीदासांनी योजली आहेत तीसुद्धा किती अर्थगर्भ आहेत! या एकेका रूपकाचं चिंतनदेखील रामकथेतल्या प्रसंगांचं स्मरण करून देतं. तर त्या पादुका सिंहासनावर ठेवल्या गेल्या आणि मग नंदीग्राम येथे एक पर्णकुटी बांधून भरत वल्कलं नेसून राहू लागले. वनात राम कसे राहात असतील, काय खात असतील, कसे निजत असतील, याचा विचार करून भरतांनी आपल्या जगण्याची रीत बदलली होती. जोरदार वृष्टी सुरू होताच भरतांनी कुटीबाहेर येऊन चिंब भिजावं आणि प्रार्थााना करावी की, ‘‘हे मेघांनो हवं तर मला कितीही भिजवा, पण रामांच्या कुटीलगत कोसळू नका!’’ तीव्र उन्हात जाऊन उभं रहावं आणि म्हणावं की, ‘‘माझा हा तुच्छ देह भाजू दे, पण रामांच्या पर्णााकुटीलगत सावली धर!’’ त्या अचल पादुकांप्रमाणेच मरतांचं भावजीवनही ध्येयापासून अचलच होतं! भरताच्या या विरक्त जीवनाला आधार होता तो शत्रुघ्नाच्या धैर्यसमृद्ध जीवनाचा. कारण भरताची ती विरहव्याकुळ अवस्था पाहूनही डोळ्यांत पाणी न आणण्याची आज्ञा रामांनी त्यांना केली होती. तेव्हा प्रत्यक्ष राज्य कारभार शत्रुघ्नानंच केला. शुद्ध भावाचं भरण-पोषण तेव्हाच शक्य होतं जेव्हा त्या शुद्ध भावाच्या आड येणाऱ्या विकार-विकल्परूपी शत्रूंचा संहार होतो! भरत आणि शत्रुघ्नांची रामभक्ती ही अशीच रामांशी एकरूप आणि परस्परांना पूरक होती.