परमात्म तत्त्वाचं स्मरण आणि चिंतन साधण्यासाठीच स्वाध्याय आहे, उपासना आहे. ती नित्य नियमित झाली पाहिजे. कलावती आई सांगत, परगावी जायचं असलं की गाडीची वेळ आपण काटेकोरपणे पाळतोच ना? मग उपासनेची वेळही का पाळू नये?  नेमाचं महत्त्व मांडताना आई सांगतात : एखाद्याला तपकीर ओढायची सवय आहे. त्याला विचारलं की, ‘‘काय हो! तपकीर ओढायला लागून किती वर्ष झाली?’’ तो म्हणतो, ‘‘वीस वर्ष झाली.’’ मग विचारलं की, कशी काय सवय लागली; तर तो म्हणाला, ‘‘परीक्षेच्या वेळेला मला सारखी झोप यायची. मग एका मित्रानं सांगितलं की, तू तपकीर ओढ म्हणजे झोप येणार नाही. ’’ कारण तर कळलं. मग विचारलं की, ‘‘परीक्षा तर आता झाली. तुमचं शिक्षणही संपलंय. मग सोडली का नाही तपकीर तुम्ही?’’ तर तो सांगतो की, ‘‘नाही हो! ती एकदाची सवयच लागली ती लागली.’’ आता पाहा, देवाच्या नावाची सवय मात्र काही लागत नाही! व्यसनांची सवय कायमची जडते.  का? तर चांगलं आहे ना ते! अन्य व्यसनांपासून सोडवणारं आहे ना ते? तर माणसाला व्यसन काही सोडता येत नाही. पण जर काही सोडायची वेळ आली, तर साधन मात्र सर्वप्रथम सुटतं. कसं? आई सांगतात: ‘‘एक बाई म्हणाली की, मी लहानपणापासून देव देव करीत होते. परंतु यजमान वारले अलीकडे तेव्हापासून देवाचं आम्ही सोडून दिलं!’’ म्हणजे काय अर्थ आहे? यजमान वारले, तर मग जेवण सोडलं का? काय सोडलं? काही नाही सोडलं. काय सोडलं? तर देवाचं नाव घ्यायचं सोडलं! खोटं बोलायचं सोडलं नाही, रागवायचं सोडलं नाही.. फक्त सोडलं काय? तर देवाचं नाव घ्यायचं सोडलं. म्हणजे मनाविरुद्ध काही घडलं तर भौतिकाचा कोणताही क्रम, भौतिकातली कोणतीही ओढ सुटत नाही. सुटतो तो परमात्म स्मरणाचा उपाय. आई म्हणतात : कित्येकजण विचारतात की, ‘‘मी आंघोळ झाली की जप करतो. मग गुरुचरित्राचं पारायण करतो. संध्याकाळचं पुराणाला जातो. तरी मुलीचं लग्न जमत नाही हो! याच्यापेक्षा आणखी काही करायला पाहिजे का?’’ तेव्हा खरं काय करावं ते कळत नाही. साधना का करायची असते, ते कळत नाही. भौतिकातल्या अडीअडचणींपुरतीच जणू साधना असते हा समज. त्यात पुन्हा ही भक्ती अगदी कप्पाबंद. कशी? तर प्रत्येक दिवस जणू एकेका देवाला वाटून दिलेला. आई म्हणतात की, आज एकादशी ना? मग विठोबालाच जायचं. सोमवार म्हणजे शंकरालाच जायचं. तर तो एकच परमात्मा विविध रूपांत प्रकटला आहे.  नदी कोणतीही असो, ती एकाच महासागराला पोहोचते. तेव्हा जी भक्ती माणसाला व्यापक करते त्या भक्तीच्या आधारे संकुचित होत असू, तर आपल्याच आकलनात काहीतरी गोंधळ आहे, यात शंका नाही. तेव्हा या भक्तीचं खरं मर्म कळलं पाहिजे. त्या भक्तीचं खरं सुख अंगी लागलं पाहिजे. काहीजण विचारतात की, ‘‘नाम किती दिवस घ्यायचं हो?’’ आई सोप्या शब्दात सांगतात की, औषध कधीपर्यंत घ्यायचं? तर बरं होईपर्यंत. तसं देवाचं नाव कुठवर घ्यावं? तर मनाला समाधान होईपर्यंत देवाचं नाव घ्यायला पाहिजे.. आणि हे समाधान कधी होईल? तर देवाचं नाव अंगात मुरल्यावर.. आणि एकदा नाम अंगात मुरलं म्हणजेच उपासना ही सहज जगण्याचा भाग बनली की, ती कधीच सुटणार नाही. उपासनामय जीवन हाच समाधानाचा खरा मार्ग असल्याने अखंड समाधानाकडे वाटचाल झाल्याशिवाय राहणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व चिंतनधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta chintan dhara part
First published on: 25-01-2018 at 02:55 IST