साधक जीवनाचं खरं उद्दिष्ट काय आहे? ‘साधकाची चिंतनिका’ या छोटेखानी पुस्तकातला जो चिंतन उतारा आपण वाचत आहोत, त्यात हे उद्दिष्ट मांडलं आहे. गेल्या भागात या उताऱ्याचा निम्मा भाग आपण वाचला होता. प्रथम त्याआधारेच विचार करू. तर साधक जीवनाचं खरं उद्दिष्ट आहे ते ‘परमेश्वरी इच्छेचं अनुसरण’! यालाच ‘शरणागति’ म्हणतात. जशी त्याची इच्छा त्यानुसारच माझ्या जीवनात गोष्टी घडतील, याचा स्वीकार. आता इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जोवर त्याची इच्छा आणि माझी इच्छा, यातलं अंतर मिटलेलं नाही आणि त्याची इच्छा काय, हे उमगलेलं नाही, तोवर आपल्याकडून प्रयत्नांचा जोर अत्याधिक असणार. प्रयत्नांत गैर काहीच नाही. कारण जरी अमुक एक यश आपल्याला भगवद्इच्छेनं मिळणार असलं, तरी ते यश प्राप्त होण्यासाठी जे प्रयत्न आवश्यक असतात, ते करावेच लागतात. त्यामुळे प्रयत्नांना कुणाचीच मनाई नाही, फक्त फलाशेत गुंतण्यास मनाई आहे! फलाशा म्हणजे आपण जे कर्म केलं, त्याचं अमुक एक फळ मिळालंच पाहिजे, ही इच्छा. तर कर्म करीत राहावं, निरपेक्षपणे आणि अचूकपणे करीत राहावं, पण आपलं सर्व लक्ष, चिंतनाचं केंद्र हे परमेश्वर अर्थात सद्गुरूबोध हेच असावं. त्या बोधाला अनुरूप असंच जगणं व्हावं, ही इच्छा असावी आणि त्या दृष्टीनं प्रामाणिक प्रयत्नही असावेत. ते साधण्यासाठी काय केलं पाहिजे, हे याच उताऱ्यात सांगितलं आहे. ते म्हणजे : ‘सर्व प्रकारच्या उतावीळ कर्माचा त्याग करणे, कोणत्याही प्रकारच्या वादंगात न पडणे, निर्थक गप्पागोष्टी न करणे, कोणत्याही कर्माचा बडेजाव न करणे, त्यातील कष्टांचा बाऊ न करणे, कल्पनावारूवर बसून इकडेतिकडे भटकण्यास मनास मना करणे, स्वतच्या क्षेत्राच्या बाहेर बुद्धीला लुडबुड करू न देणे.’  हे साधलं की काय होतं? तर, ‘या सर्व गोष्टींमुळे परमेश्वरी इच्छेचे अनुसरण सोपे होऊन जाते!’ आता एक-एका गोष्टीचा थोडक्यात विचार करू. प्रथम सांगतात की, ‘सर्व प्रकारच्या उतावीळ कर्माचा त्याग करा.’ आता कर्म उतावीळ नसतात, ते करण्याची इच्छा बाळगणारं मन जे आहे, ते उतावीळ असतं. ते उतावीळपणे कर्म करीत असतं. आता हा उतावीळपणा का असतो? तर मनाची ओढ! मनाला सुख ओरबाडण्याची लालसा असते आणि ते अमुक एका कर्मातूनच मिळेल, याची भ्रामक खात्री असते. त्यामुळे त्या कर्मासाठी मन आसुसलेलं असतं. तेव्हा कर्म करण्याआधी आणि प्रत्यक्ष कर्म करताना त्या कर्माबाबत साधक-बाधक विचार आपण करीत नाही. मनाच्या उतावीळपणानं आपण कर्म करतो. तेव्हा हा जो मनाचा उतावीळपणा आहे, तो रोखायला सांगत आहेत. पुढचं सांगणं आहे ते म्हणजे, ‘कोणत्याही प्रकारच्या वादंगात न पडणे,’ म्हणजे काय? तर, आपले बहुतेक वाद ‘मी सांगतो तेच दुसऱ्यानं ऐकावं,’ या अविर्भावातून ओढवत असतात. त्यात अहंकार असतो, द्वेष-मत्सर असतो. असे कोणतेही वाद नसतात ज्यायोगे जीवनाला चांगलं सकारात्मक वळण लागेल किंवा आपलं अथवा दुसऱ्याचं वैचारिक परिवर्तन होईल. वाद घालतानाही उभय बाजूनं ‘आपलं तेच खरं,’ हाच हेकेखोर पवित्रा असतो. दुसऱ्याचं मत त्यामुळेच आपल्याला खुलेपणानं ऐकता येत नाही की त्यावर विचार करता येत नाही. त्यामुळे अशा वादंगांनी केवळ वेळ आणि शक्ती तेवढी नाहक वाया जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– चैतन्य प्रेम

मराठीतील सर्व चिंतनधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta chintan dhara part
First published on: 04-10-2018 at 04:57 IST