आपण जप, ध्यान, पूजा, दान, धर्म, व्रत, उपासना आदी गोषअटी करतो. त्यांची सुरुवात भौतिकातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून असते. आई सांगतात, ‘‘आपण देवाप्रीत्यर्थ जे काही करतो त्यात आपणास प्रतिफळ मिळावे, हा मुख्य उद्देश असतो. प्रतिफळ म्हणजे शाश्वतसुखप्राप्ती. पण सुखाविषयीची आपली कल्पनाच मुळी चुकीची असल्याने (देवाप्रीत्यर्थ) जे काय आपणाकडून घडते ते शाश्वत सुखप्राप्तीचे साधन होऊ शकत नाही.. त्यामुळे दु:खाचा अंतच होत नाही.’’ (बोधामृत, पृ. १९६). म्हणजे काय? तर मुलाचं लग्न होत नाही, ते व्हावं म्हणून व्रतं केली, पारायणं केली, उपास-तापास केले. हेतू काय? की, लग्न झालं की मग दु:खाचं काही कारण उरणार नाही. आता लग्न झालं, पण सून मनासारखं वागत नाही! जे सुखाचं कारण वाटत होतं, तेच दु:खाचं कारण झालं. मग पुन्हा व्रतं, उपास-तापास आणि मागणं की, देवा सुनेचा स्वभाव बदलू दे. तो बदलला की दु:खाचं कारणच उरणार नाही! तर आपली सगळी ‘भक्ती’ ही अशी भौतिक दु:खाचंच बोट पकडून त्या परिघातच फिरत असते. त्यामुळे खरा जप, खरं ध्यान, खरी पूजा, खरं दान, खरा धर्म, खरं व्रत, खरी उपासना आपण जाणत नाही. अंत:करणातील ‘मी’पणा ज्यायोगे उपसला जातो आणि ‘तू’पणा अर्थात परमात्मभाव ज्यायोगे भरला जातो ती खरी उपासना! ज्यानं वृत्तीची सुधारणा होते, घडण होते ते खरं व्रत, ज्यायोगे अहंचा त्याग घडतो तो खरा त्याग, ते खरं दान, ज्यानं आपण पूज्य म्हणजे शून्यवत होतो आणि परमात्म्याची पूज्यता वाढते ती खरी पूजा, ज्यायोगे अंतरंगात शाश्वताचा निश्चय धारण केला जातो तो खरा धर्म, ज्यायोगे ‘मी’चा ध्यास संपून ‘तू’चा ध्यास सहजतेनं स्थिर होतो ते खरं ध्यान, तो खरा जप.. पण हे सारं वाचून, बोलून, ऐकून समजू शकत नाही. ते केवळ सद्गुरूंच्याच बोधानुसार जगून अनुभवातून शिकता येतं. खरी भक्ती म्हणजे काय आणि ती कशी साधावी, हे त्यांच्याच सहवासात उमगू शकतं. कसं? आई सांगतात, ‘‘आपल्याला देहाची जशी सहजासहजी आठवण असते तशी सत्पुरुषांना देवाची सहज आठवण असते. त्यामुळे आपणास देहध्यासातून सुटण्यासाठी संतांची सूचनाच अंमलात आणावी लागते.’’ (बोधामृत, पृ. २००). देहध्यास म्हणजे काय? तर देहच ‘मी’ ही भावना. पण खरं पाहता ‘देह’ आणि ‘मी’ असे दोन कधीच वेगळेपणानं आपल्याला भासत नाहीत. देहाला आपण वेगळेपणानं पाहात नाही. तर देहात पूर्णपणे रूतून आपला ‘मी’ व्यापला असतो. या ‘मी’च्या सुखाचा एकमेव आधार, या भौतिक जगातल्या वावरण्याचा एकमेव आधार हा देहच आहे. त्यामुळे या देहाद्वारे सदोदित सुखच सुख भोगण्याचा जो ध्यास आहे, तोच खरा देहध्यास आहे. त्यामुळे क्षणोक्षणी आपल्याला देहसुखाचीच जाण असते, देहसुखाचंच भान असतं. अगदी त्याचप्रमाणे संत सत्पुरुषांना क्षणोक्षणी देवध्यास असतो! परम तत्त्वाचं सदोदित भान असतं. त्यामुळे त्यांचं जीवनही व्यापकतेचीच प्रेरणा देत असतं. त्यांची भक्तीही व्यापकच असते. आपली भक्तीसुद्धा आपल्या देहसुखाला नख लागणार नाही, अशीच असते. जप असो, तप असो, व्रत असो, पारायण असो की आणखी काही असो.. देहाची काळजी अगदी सूक्ष्मपणे घेतली जात असते. इतकच नाही, तर या देहाला जे आवडतं तेच जणू देवालाही आवडतं, असं आपल्या सोयीनुसार मानून आपल्या आवडीनिवडी देवावर थोपवून आपली ‘भक्ती’ सुरू असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com

 

Web Title: Loksatta chintan dhara part
First published on: 26-01-2018 at 02:52 IST