संयोग भक्तीचं दर्शन लक्ष्मणांच्या चरित्रातून घडतं, तर वियोग भक्तीचं विराट रूप भरतांच्या भावचरित्रातून घडतं. रामायणाची कथा आपल्या आत्यंतिक परिचयाची आहे, पण त्याच कथेत किती आध्यात्मिक रहस्ये दडली आहेत, किती मोठा आध्यात्मिक बोध आहे, हे सदगुरूकृपेनंच अंतरंगातून जाणवू लागतं. भरत आणि शत्रुघ्न आजोळी गेले असतानाच मंथरेच्या चिथावणीनं माता कैकयीनं रामाला वनवासात धाडण्याचा हट्ट धरला. ‘प्राण जाइ, पर बचन न जाई,’ ही रीत असलेल्या रघुकुलाचे राजे दशरथ यांना वचनबंधनामुळे तो हट्ट मानावा लागला. रामासह सीता आणि लक्ष्मणही वनात गेले आणि रामाशिवाय देहाच्या पिंजऱ्यात प्राण धरून ठेवणं काही दशरथांना साधलं नाही. त्यामुळे गुरु वसिष्ठांच्या सांगण्यावरून भरतांना बोलावणं पाठवलं गेलं. भरतजी जसजसे अयोध्येकडे येऊ लागले तसतसं त्यांचं मन अगम्य हुरहुरीनं व्यापू लागलं. आपल्या प्राणप्रिय प्रभुंच्या वास्तव्यानं मंगलमय भासणाऱ्या अयोध्येच्या जवळ आल्यावर मात्र वातावरणातलं औदासिन्य त्यांच्या मनाला डसू लागलं. ज्या नगरीत सीता-रामांचं वास्तव्य आहे तिथं असा उजाडपणा अशक्य आहे, या जाणिवेनं ते अस्वस्थ झाले. काहीच दिवसांपूर्वी अयोध्या सोडली होती, तेव्हा ती जणू आनंदानं ओथंबलेली होती, मग आज ती इतकी उजाड का भासावी, हा प्रश्न त्यांचं मन पोखरू लागला. नगरातील माणसांच्या चेहऱ्यावर दु:खाचं सावट होतं, प्रासादाजवळ आले तर रक्षकही खिन्नम्लान होते. समोर येणारा प्रत्येकजण भरतांना प्रणाम करीत होता, पण त्यात ती उत्फुल्लता नव्हती. प्रासादत पाऊल टाकलं तेव्हा कैकयी माता स्वागतासाठी धावतच आली. तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहात असलेला आनंद पाहून भरताला आश्चर्य वाटलं. ‘श्रीअवध भूषण रामायणा’त म्हटलं आहे, ‘‘सबहिं दुखित हरषित महतारी।। निरखि भरत असमंजस भारी’’ (अगाधकाण्ड, दोहा २७३, चौपाई ७). अवघी अयोध्या दु:खाच्या सावटाखाली असताना केवळ आपल्या मातेच्या चेहऱ्यावर हर्ष कसा, या प्रश्नानं भरत गोंधळले. त्यांनी खोदून विचारलं तेव्हा कैकयीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, ‘‘मी सर्व काही मनासारखं करू पाहात होते, पण विधात्याला राहवलं नाही! त्यानं महाराज दशरथांना आपल्यातून नेलं..’’ हा भरतांना अनपेक्षित धक्का होता. जणू ते धरणीवर कोसळलेच. पण त्यांना सावरत मातेनं मंथरेच्या चतुराईनं सावध होऊन आपण तुला सिंहासनावर बसता यावं याकरिता रामांना वनवासात कसं पाठवलं, हे सांगितलं. हे ऐकताच पित्याच्या मृत्यूचं दु:खंही क्षुद्र भासावं इतका आघात भरतांच्या हृदयावर झाला. त्यातही या साऱ्याला आपण कुठेतरी कारणीभूत आहोत, या जाणिवेनं तर त्याला आपल्या जन्माचीच घृणा वाटू लागली. त्याचं मन, प्राण स्वयंतिरस्काराच्या दाहानं पोळू लागलं. ‘‘पिता मरत एक अंगहिं काटा।। अब तौ काटेसि तनु सब ठाटा।।’’ (दोहा २७६, चौ. ३) अशी त्याची दशा झाली. पित्याच्या मृत्यूनं जणू देहाचा एखादा अवयव निखळून पडावा, असं दु:खं झालं होतं, पण रामाला वनवासात जावं लागणं म्हणजे उरलेल्या देहाचे तुकडे तुकडे झाल्यागत भरतांना वाटू लागलं. परमतत्त्वाशी भक्ताचं असं ऐक्य असलंच पाहिजे. त्या तत्त्वाचा जीवनात अभाव असेल, तर तो दूर करण्यासाठी त्याचं मन तळमळलंच पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चैतन्य प्रेम

मराठीतील सर्व चिंतनधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta chintan dhara part
First published on: 06-11-2018 at 03:37 IST