परमार्थ हे कृतीचे शास्त्र आहे, असं गोंदवलेकर महाराज म्हणत. अर्थात परमार्थ हा नुसता बोलण्यापुरता उरू नये, तो आचरणातच उतरला पाहिजे. आपण भारंभार वाचू शकतो, भारंभार ऐकू आणि त्याहून अधिक बोलू शकतो, पण तसं आचरण काही तीळमात्र साधत नाही! तुकाराम महाराज सांगत ना? ‘बोल बोलता वाटे सोपे, करणी करता टिर कांपे!’ पण जोवर परमार्थ हा आचरणात येत नाही, जगण्याचा भाग होत नाही, तोवर काही अर्थ नाही. त्यासाठी जो खऱ्या तळमळीनं परमार्थ करू पाहतो तो काही छोटे-मोठे प्रयोगही स्वयंस्फूर्तीनं करीत असतो. पण हे प्रयोग बरेचदा अहंभाव वाढवण्याचाही धोका असतो. म्हणजे कुणी कुणी ठरवतात की अमुक एक पारायण करीत जायचं, त्यावर चिंतन करीत जायचं. तर मग त्या चिंतनातून जे जे गवसू लागतं त्यानं केवळ शाब्दिक ज्ञानात, शाब्दिक आकलनात भर पडण्याचा धोका असतो. तशी भर पडली की आपल्याला इतरांपेक्षा अधिक काही समजू लागलं, असा भ्रम होण्याचाही धोका असतो. त्यामुळे परमार्थ जगण्यात उतरवण्यासाठीचा जो अभ्यास आहे, जे प्रयोग आहेत ते आपल्या वृत्तीत पालट घडवणारे असले पाहिजेत. त्याचा एक सोपा उपाय असा की, रोज रात्री झोपी जाण्यापूर्वी श्रीमहाराजांची प्रवचनं किंवा कुणाही सत्पुरुषाच्या बोधवचनाचं पुस्तक हाती घ्यावं. त्यातील कोणतंही पान उघडून जिथं नजर स्थिरावेल तो भाग वाचावा. त्या वाचनातून कृतीत आणण्यासारखा एखादा बोध सूत्ररूपानं गवसू शकतो. त्या विचाराचं सखोल चिंतन करत झोपी जावं. हा गवसलेला बोध उद्या आचरणात आणायचा आहे, या भावनेनं हे चिंतन व्हावं. मग दुसरा दिवस उजाडेल तो त्याच विचाराच्या सोबतीनं आणि मग दिवसभर त्या सूत्रानुसार आचरणाचा प्रामाणिक प्रयत्न केला तर त्या प्रमाणात आचरणात सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू होते. जेव्हा असा अभ्यास सुरू होतो आणि त्याचा आपल्यावर परिणाम किती घडतो, आचरणात किती बदल होतो, याचं निरीक्षण करीत गेलं तरी आपण आपल्या स्वभावात, वर्तनात कितीतरी बदल घडवू शकतो, ही जाणीव होते. ती हुरूप वाढवणारी आणि अभ्यासाला बळ देणारी असते. तेव्हा ज्याला अध्यात्माच्या मार्गावर खरी वाटचाल करायची आहे त्याला असे प्रयोग करून पाहावेच लागतील. त्यातूनच आपली आपल्याला नव्यानं ओळख होईल. आपल्यातील चिकाटी, धैर्य, प्रामाणिकपणा यांची तपासणी करता येईल. त्यातून कुठं काय चुकतं आणि ते कसं सुधारावं, याचं भान वाढेल. साताऱ्याचे पेठेकाका यांनी असे प्रयोग सुचवणारं ‘वृत्त्यंतरप्रकाश’ हे मनोज्ञ पुस्तक लिहिलं आहे. त्यात वृत्तीपालटाला चालना देण्यासाठीचे १६ प्रयोग सूत्ररूपानं सुचविले आहेत. त्यांचं अगदी सखोल मार्गदर्शन त्यांनी केलं आहे. मुळात असे प्रयोग करणं माणसाला आवडू शकतं आणि त्यात मूळ उपासना दुय्यम ठरण्याचा धोका असतो. कारण काहीतरी ‘करायला’ माणसाला आवडतं, काहीतरी ‘करण्यात’ जो आनंद मिळतो तो उपासनेत एका जागी शांत बसायचं असल्यानं मिळत नाही, अशी माणसाची भ्रामक समजूत असते. त्यामुळे असे काही प्रयोग करायला मन उत्सुक असू शकतं आणि त्यातून उपासनेकडे दुर्लक्ष होऊ शकतं. तर या प्रयोगांना उपासनेची जोड हवीच, त्या उपासनेशिवाय या प्रयोगांना बळ मिळणार नाही, असं पेठेकाकांनी ही सूत्रं मांडण्याआधीच स्पष्ट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– चैतन्य प्रेम

मराठीतील सर्व चिंतनधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta chintan dhara part
First published on: 16-04-2018 at 03:37 IST