सत्पुरुषाच्या सहवासात आपली वासना अर्थात इच्छा एक तर पूर्ण तरी होते नाही तर क्षीण तरी होते, असं गेल्या भागात म्हटलं होतं. इच्छेचा जोर जेव्हा जास्त असतो तेव्हा तिच्यातला फोलपणा सत्पुरुषानं सांगितला तरी कळत नाही. पटणं तर मग दूरचीच गोष्ट. उतारावर सुसाट असलेली गाडी एकदम थांबवता येत नाही, तसंच आहे हे. प्रथम तिचा वेग कमी करावा लागतो. त्याचप्रमाणे सत्पुरुष आपल्या अनावर इच्छेला एकदम धुडकावत नाहीत. त्या इच्छेच्या पूर्तीसाठी प्रयत्न करायला सांगतात. त्याचवेळी निरिच्छतेचा सूक्ष्म संस्कार चित्तावर करू लागतात. एखाद्याचं जगणंच अनावर इच्छा, वासनांच्या प्रवाहाबरोबर वेगाने वाहत असतं. असं वाहत असतानाच तो सत्पुरुषाच्या संपर्कात येतो. तेव्हा त्याच्या जगण्याची रीत बदलण्याची अतिशय अवघड आणि दीर्घ प्रक्रिया सद्गुरू कशी सुरू करतात, ते गिरीशचंद्र घोष आणि श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या लीलाचरित्रातून दिसतं. ते सर्व प्रसंग अगदी मुळात वाचण्यासारखे आहेत. पण काहींचा संक्षेपानं उल्लेख केला पाहिजे. गिरीशचंद्र हे बंगाली रंगभूमीचा पाया दृढ करणारे नाटय़कर्मी. तरुण वय, हाती खेळत असलेला पसा आणि भरीला अमाप मान, प्रसिद्धी. त्यामुळे सर्व वाईट सवयी जगण्याचा अविभाज्य भाग बनलेल्या. श्रीरामकृष्णांचं तीनवेळा दर्शन होऊनही विकल्प आणि अहंकारामुळे त्यांचा परमहंसांवर विश्वास बसला नव्हता. लेखक, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता अशी चौफेर कामगिरीही रंगभूमीवर सुरू होती. रामकृष्णांनी कशालाच आडकाठी केली नव्हती. एकदा मध्यरात्र उलटून गेली होती. आपल्या दोन मित्रांसह गिरीशचंद्र एका गणिकेच्या घरी भोगसुखात बुडाले होते. दारू पिऊन उन्मत्तही झाले होते. अशा वेळी त्यांना अचानक श्रीरामकृष्ण परमहंसांची तीव्र आठवण आली. ते त्याच अवस्थेत तडक दक्षिणेश्वरी रामकृष्णांकडे आले. झिंगलेल्या अवस्थेत, लटपटतच ते श्रीरामकृष्णांच्या खोलीत शिरले. त्यांना पाहताच रामकृष्ण भावाविष्ट झाले आणि गिरीशांचा हात हाती घेऊन भजन गात नृत्य करू लागले! गिरीश लिहितात, ‘माझ्या मनात विचार चमकून गेला- हे असे एक आहेत की ज्यांचं प्रेम सर्वानाच, अगदी माझ्यासारख्या दुष्टालाही, ज्याची या अवस्थेत कुटुंबीयही निर्भर्त्सना करतील त्यालाही हे आिलगन द्यायला तयार आहेत. हे सज्जनांच्या गळ्यातले हार आहेतच, पण माझ्यासारख्या पतितांचे तारणहारही आहेत!’ हा प्रसंग गिरीशचंद्रांच्या आंतरिक पालटाआधीची स्थिती दाखवतो. वासनेत पूर्ण बुडालेल्या जिवाला त्याही अवस्थेत जेव्हा सद्गुरूंचे स्मरण होते तेव्हा त्यांना अपार आनंद होतो. देहसुखात बुडालेल्या गिरीशचंद्रांनाही जेव्हा रामकृष्णांचं तीव्र स्मरण झालं आणि त्याच अवस्थेत ते त्यांना भेटायला आले तेव्हा परमहंसांनाही अपार आनंद वाटला. दया, वात्सल्य, करुणा यातून तो प्रकट झाला. या घटनेनं सद्गुरू आश्रयाचा भाव कसा दृढ झाला, हे उघड करताना गिरीशचंद्र लिहितात, ‘या भेटीनंतर मी विस्मयानं विचार करू लागलो की, माझ्याशी इतकं आपुलकीनं बोलणारे, मला अगदी माझा आपला माणूस वाटणारे हे कोण बरं असावेत? आता मला पापांचं भय राहिलं नाही, कारण ते दूर लोटणार नाहीत, ही खात्री झाली. माझ्या आत-बाहेर काय आहे, हे ते सर्व जाणत असले तरी मी माझ्या पापांची कबुली दिल्यास माझ्या दृष्टीनं फार चांगलं होईल, मला त्यांच्या चरणी आश्रय घ्यायलाच हवा, कारण केवळ तेच मला शांती प्रदान करू शकतात!’
– चैतन्य प्रेम