कलावती आई यांना एकदा एक भक्त स्त्री म्हणाली की, ‘‘आई आज मी बाजारातून हापूसचे चार आंबे आणले होते. माझ्या लहान मुलानं ते अंगणात फेकून दिले!’’ त्या लहानग्या मुलानं आंब्याच्या अगदी बारीक चिरलेल्या फोडी खाल्ल्या होत्या, त्याचा रसही प्यायला होता, पण आंबा प्रत्यक्ष कधी पाहिला नव्हता. त्यामुळे त्या आंब्याचं मोल त्याला उमगत नव्हतं. ती बाई हसून आईंना घडला प्रकार सांगत होती. संतांचा जो बोध असतो त्याचं अगदी समर्पक वर्णन एका ओवीत आहे, ‘‘सहज बोलणे हित उपदेश!’’  म्हणजे त्यांच्या सहज अशा बोलण्यातही जिवाच्या हिताचाच उपदेश असतो! ते बोलणं तेवढय़ापुरतं, वरवरचं असं नसतं. कोणत्याही काही अनेक संदर्भात त्यांचं बोलणं जिवाला जागृत करण्यासाठी तितकंच प्रेरक ठरत असतं. आई म्हणाल्या, ‘‘आंबा म्हणजे काय वस्तू आहे, हे माहीत नसल्यामुळे त्याने ते आंबे फेकून दिले. त्या मुलाप्रमाणेच आमचं लक्षही वरवर असल्यामुळे आम्हाला अजून खऱ्या सुखाला जाणता आलेले नाही..’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आई जे सांगत आहेत त्या अनुषंगानं एक गोष्ट आठवली. गोष्ट अशी : एक वैरागी होता. भटकंती करीत असताना तो एकदा एका गावातल्या मंदिरात थांबला होता. त्याच्या दर्शनाला गावकरी येऊ लागले. त्यानं गावकऱ्यांना ज्ञानाच्या आणि हिताच्या चार गोष्टी सांगितल्या. एक-दोन दिवस हा क्रम सुरू होता. त्याचं बोलणं ऐकताना सर्वाच्याच चेहऱ्यावर समाधान विलसत असे, पण एकदा का त्याचं बोलणं थांबलं की मग जो तो आपापल्या जीवनातल्या अनंत अडचणींचा पाढा वाचत असे.  त्यातल्या बहुतांश अडचणी या ‘मी’पणातूनच उद्भवलेल्या, जपलेल्या, जोपासलेल्या असत. आपलाच स्वभाव आपल्या अनेक दु:खांना कसा कारणीभूत ठरतो, हे त्यानं वारंवार समजावलं. तरीही कुणात काही बदल होईना. अखेर त्याचा जायचा दिवस आला. सगळ्या गावकऱ्यांनी त्याच्या त्यागी जीवनाचे गोडवे गायले. अखेर तो वैरागी बोलू लागला. तो म्हणाला, ‘‘लोकहो, माझ्यापेक्षा खरे त्यागी तुम्हीच आहात! मी तर एका परम प्राप्तीसाठी सर्व क्षणभंगूर नश्वर अशाश्वत अशा गोष्टींचाच केवळ त्याग करीत आहे. तुम्ही तर त्या क्षणभंगूर नश्वर आणि अशाश्वत गोष्टींना जपत आहात आणि परमलाभ मिळवून देणाऱ्या परम तत्त्वाचा त्याग करीत आहात. त्यामुळे खरा मोठा त्याग मी नव्हे, तुम्हीच करीत आहात!’’

मराठीतील सर्व चिंतनधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta chintandhara part
First published on: 19-01-2018 at 03:54 IST