इतके दिवस अमेरिका हरितगृह वायूच्या उत्सर्जनामुळे होणाऱ्या हवामानबदलांना केवळ भारत-चीन यांना जबाबदार धरून त्यांनी आधी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असा आग्रह धरीत असे, पण त्यांच्याच देशाच्या हवामान मूल्यांकन अहवालाने हे पाप केवळ  या दोन देशांचे नसून अमेरिकाही त्याला त्यांच्यापेक्षा जास्त जबाबदार आहे, त्याचे अमेरिकेला हवामान आपत्तीच्या रूपाने हादरे बसू लागले आहेत, असे मान्यच केले आहे. हवामान बदलांबाबतची अमेरिकेची भूमिका चुकीची होती हे आता त्यांनाच उमगले आहे, झोपी गेलेल्याला जाग आली आहे, पण आता खूप उशीर झाला आहे एवढे मात्र खरे.
हवामानबदलांना आता अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या रूपाने नवीन वैचारिक अनुयायी मिळाला आहे. खरे तर अमेरिकी सरकार हेच हवामानबदलविषयक वाटाघाटींमधील एक प्रमुख अडथळा आहे. १९९०च्या प्रारंभापासून या मुद्दय़ावर चर्चा सुरू झाली, पण अमेरिकेने या विषयावर न्याय्य व प्रभावी तोडगा काढण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरवले. चीन व भारत या देशांनी प्रथम हवामानबदल रोखण्यासाठी जास्तीत जास्त उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त करीत अमेरिकेने कृती करण्याचे टाळले. सर्वात वाईट बाब म्हणजे अमेरिकेत पाठोपाठ आलेल्या सरकारांनी हवामानबदलांचा खरा धोका हा वास्तव असून ती तातडीने हाताळण्याची बाब आहे हे कधीच मान्य केले नाही. अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा हे पहिल्यांदा सत्तेवर आले त्या वेळी त्यांनी हवामानबदलविषयक वाटाघाटी करण्याचे मान्य केले होते, पण अलीकडच्या काळात त्यांनी या मुद्दय़ावर पुन्हा माघार घेण्यास सुरुवात केली. असे असले तरी या वर्षी मे महिन्यात अमेरिकी सरकारने राष्ट्रीय हवामान मूल्यमापन अहवाल सादर केला, त्यातील वैज्ञानिक माहिती ही अमेरिकेतील हवामानबदलांचे परिणाम गांभीर्याने मांडणारी आहे. त्या अहवालानुसार अमेरिकाही हवामानबदलाच्या धोक्यापासून मुक्त नाही. तेथेही हवामानबदलाचा धोका असून त्याचे काही दृश्य परिणाम आतापासूनच दिसू लागले असून, त्यामुळे त्या देशाला अनेक फटके बसले आहेत. या मूल्यमापन अहवालाचे निष्कर्ष उर्वरित जगासाठीही महत्त्वाचे आहेत. या अहवालातील पहिली महत्त्वाची बाब म्हणजे पृथ्वीच्या तापमानात वाढ होत आहे व ती ध्रुवीय प्रदेशात जास्त आहे. या ध्रुवीय प्रदेशात बर्फाचे थर कमी होत चालले आहेत. वातावरण तापते तसे ते जास्त पाणी धारण करते व त्यामुळे मोठय़ा प्रमाणात अवक्षेपीकरण (प्रेसिपिटेशन) होते. त्यात भर म्हणून एकीकडे जास्त उष्णतामान व एकीकडे हिमवर्षांव व पाऊस अशी टोकाची स्थिती बघायला मिळते, हे घातक आहे. अमेरिकेत उष्म्याच्या लाटांचे प्रमाण वाढले आहे. २०११ व २०१२ मध्ये उष्म्याच्या लाटांची संख्या सरासरीच्या तीन पटींनी अधिक होती. अमेरिकेने केलेल्या हवामान मूल्यांकनात असेही दिसले आहे, की जिथे अवक्षेपीकरण कमी झाले नव्हते, तिथे दुष्काळ पडले. याचे कारण म्हणजे उच्च तापमानाला बाष्पीभवन जास्त होते व माती तिची आद्र्रता गमावून बसते. २०११ मध्ये टेक्सास व नंतर २०१२ मध्ये मिडवेस्ट भागात बराच काळ तापमान जास्त राहिल्याने दुष्काळ पडला. याच्या जोडीला काही भागात खूप जास्त पाऊस पडला. जेव्हा जास्त पाऊस पडतो तेव्हा अवक्षेप तयार होण्याचे प्रमाण जास्त असते. अमेरिकेत अलीकडे अनेक ठिकाणी पूर आले, राष्ट्रीय हवामान मूल्यांकन अहवालानुसार भविष्यकाळात त्या देशाला अशा धोक्यांचा नेहमीच सामना करावा लागणार आहे. १९८०पासून अमेरिकेत वादळे व चक्रीवादळे यांची तीव्रता, संख्या व कालावधी यात वाढ होत चालली आहे. ही वादळे तीव्र म्हणजे वर्ग ४ व ५मध्ये मोडणारी आहेत. अतिशय उच्च दर्जाच्या व विश्वासार्ह माहितीच्या आधारे हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे अमेरिकेसाठीही- तो श्रीमंत देश असला तरी-  हवामानाच्या बाबतीत काही शुभवर्तमान आहे अशातला भाग नाही.
बराच काळ असा अलिखित समज होता, की या प्रगत देशांना हवामानबदलाचा फायदा होणार आहे, त्यामुळे ते गाफील राहिले. हे देश ऊबदार बनून तेथे पिकांच्या वाढीचा काळ विस्तारेल. परिणामी, अर्थव्यवस्थेला फायदा होईल असा हा समज होता. आता अमेरिकी राष्ट्रीय हवामान मूल्यांकन अहवालाने असे दाखवून दिले आहे, की एखाद्या विशिष्ट भागाला हवामानबदलाचा थोडा फायदा झाला तरी तो पुरेसा व स्थायी स्वरूपाचा नसेल, त्यामुळे अमेरिकेसारख्या श्रीमंत देशांची अर्थव्यवस्थाही प्रतिकूल हवामान व त्यामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तींनी कोलमडू शकते. या अहवालात असे म्हटले आहे, की हवामानबदल हे मानवी कृतींमुळे घडून येतात, पण हे कुणी तरी अमेरिकी लोकांना कानीकपाळी ओरडून सांगायला हवे. नसíगक वातावरणात सतत होणारे बदल यापुढे नाकारता येणार नाहीत. खनिज इंधनांमुळे वातावरणात असा हरितगृह वायूंचा अभूतपूर्व संचय झाला आहे. काही अभ्यासातून हवामानबदलाची वेगळी कारणेही पुढे आली आहेत. वातावरणातील स्थितांबर नावाच्या थरात शीतकरण होते आहे, तर पृथ्वीचा पृष्ठभाग व वातावरणातील खालचा थर तापतो आहे. उष्णता अडकवून ठेवणाऱ्या हरितगृहवायूंचाच हा परिणाम आहे. हे वायू खनिज इंधनांच्या ज्वलनातून वातावरणात सोडले जातात. हे इंधनांचे ज्वलन देशाची एकप्रकारे आíथक वाढ करीत असते, पण दुसरीकडे त्याचा वातावरणावर वाईट परिणाम होत असतो.
यातून मिळणारा संदेश अमेरिकेसारख्या देशांसाठी अतिशय स्पष्ट आहे. तो हाच की, वातावरणातील हरितगृह वायू हे धोकादायक पातळीपेक्षा जास्त आहेत व त्याचा फटका अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला बसत आहे. त्यामुळे दुष्काळरोधक शेती, पूररोधक शेती तसेच पायाभूत सुविधा निर्माण करायला हव्या. दुष्काळात व पुरातही टिकतील अशा पिकांच्या प्रजाती तयार करणे, पायाभूत सुविधा वाढवणे याला मर्यादा आहेत, त्यामुळे खनिजइंधनांचे ज्वलन कमी करून हरितगृह वायूंचे वातावरणातील प्रमाण वेगाने आटोक्यात आणणे महत्त्वाचे आहे. नेमकी याच मुद्दय़ावर या अहवालात उणीव आहे. अमेरिकेचे जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनातील प्रमाण १८ टक्के आहे हे अहवालात मान्य केले आहे, पण अमेरिकेचे हे वायूचे उत्सर्जन आवर्ती पातळीवर बघितले तर खूप जास्त आहे. पण एक तरी बरे, की या अहवालात एवढे तरी मान्य केले आहे, की वातावरणात हरितगृह वायू साठून राहिल्याने हवामानबदल घडून येत आहेत व ते हानिकारक आहेत. आतापर्यंत अमेरिकेची भूमिका ही हवामानबदलाच्या वाटाघाटीतील अडथळा ठरत होती पण आता प्रश्न असा आहे की, हे उत्सर्जन कमी करण्यासाठी काय करायचे, पण वायू उत्सर्जनातील वाटा गृहीत धरून ते प्रमाण कमी करण्यासाठी कुठलीही योजना अमेरिकेकडे नाही. अमेरिकेने स्वेच्छेने २००५च्या हरितगृह वायू पातळीपेक्षा वायू उत्सर्जन १७ टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, पण ते खूप कमी आहे व आता ते करण्यास खूप उशीरही झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या त्या वायू उत्सर्जन कमी करण्याच्या उद्दिष्टाला तसा काहीच अर्थ नाही. आताच्या क्षणाला तरी हरितगृह वायू उत्सर्जनामुळे होणारे हवामानबदल अमेरिकेलाही धक्का देणार आहेत, एवढे तरी त्यांना उमगले आहे, यातून कदाचित त्यांच्या कृतीत काही बदल घडून येतील अशी आशा करू या.
*लेखिका दिल्लीतील  ‘सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायरन्मेंट’च्या महासंचालक  आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व ताल-भवताल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Climate change impacts in the united states
First published on: 28-05-2014 at 01:01 IST