गणेशोत्सवादरम्यान एका प्रभावकाने दोन धर्मांमधील एकोप्याचे एक रील समाजमाध्यमांवर टाकले, पण त्यामुळे तो स्वत:च ट्रोल झाल्याने त्याने ते माघारी घेतले. त्यानंतर अल्पावधीतच त्या केवळ एका रीलमुळे तो पुरोगाम्यांच्या गळ्यातील ताईत बनला. प्रभावकाचा पूर्वीचा आशय, आशयाची रूपरेषा, बौद्धिक क्षमता इत्यादींचा सांगोपांग विचार न करता नायक बनविण्याची ही कृती ‘वैचारिक’ बैठक असणाऱ्यांकडून तरी धोकादायकच! मात्र एआय, अल्गोरिदम आणि समाजमाध्यमे यांच्या संयुक्त युगात केवळ उजवेच नाही, तर वैचारिक वारसदार समजले जाणारे पुरोगामीसुद्धा तात्कालिक मुद्द्यावरून प्रतिमावर्धन अथवा हननाच्या प्रेमात पडत आहेत. हेच चित्र आजकाल इतर सामाजिक-राजकीय मुद्द्यांसोबत सामान्यपणे दिसते.

कोणत्याही विवादातून फलित निघण्यापेक्षा आकांडतांडव करून ते विसरून जायचे ही एआय काळातील समाजमाध्यमांच्या दुनियेतील सामान्य रीत! यातूनच चर्चा, चिंतन, अभ्यास, विश्लेषण, विषयाच्या मुळापर्यंत जाण्याची चिकाटी, इतिहासाचं सजग भान, संयम आणि तत्त्वांवरील निष्ठा आणि एकूणच चिकित्सक मनोवृत्ती या गोष्टी मागे पडत जाऊन समाजमाध्यमांवरील आक्रस्ताळ्या गणंगांनी ज्ञानक्षेत्रातील जागा व्यापली आहे. सर्वसाधारणपणे वरून आदेश आला की शिरसावंद्या मानून तो पाळणे हा उजव्यांचा तर व्यवस्थेला अभ्यास करून, प्रश्न विचारून त्रस्त करून नाकारणे हा डाव्यांचा शिरस्ता! मात्र उजवे असो वा पुरोगामी, दोघांच्या उथळपणाला एआय परिसंस्था कशी हातभार लावते याचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न.

चिकित्सक वृत्ती आपल्या सभोवतालाला प्रश्न विचारण्यास भाग पाडते. मिलिंदपन्हो आणि उपनिषदांसारख्या प्राचीन ग्रंथांपासून ही परंपरा समाजात रुजलेली दिसते. एकीकडे प्रस्थापित गट स्वत:च्या अमरत्वासाठी चिकित्सेला हद्दपार करून दैवत्व, चमत्कार वगैरे गोष्टींच्या माध्यमातून व्यवस्था टिकविण्यासाठी मदत करतो. यातूनच धर्म आणि कर्मकांडांनी माजलेल्या बजबजपुरीने इतिहासाची पाने गिचमीड केली. युरोपमध्ये प्रबोधनाचा अंकुर फुटला आणि मनुष्यकेंद्रित विचारामुळे चिकित्सक वृत्तीने पुन्हा जोम धरला.

सध्याचा विचार करता राष्ट्र, समाज, जातीव्यवस्था अगदी सरकार वगैरे गोष्टींना प्रश्न विचारले असता राष्ट्रद्रोही वगैरे लेबल लावून प्रश्न विचारणाऱ्यास बदनाम करण्याचा कट रचणे ही उजव्यांची कार्यपद्धती झाली आहे. ‘भक्त’ संप्रदायाचा विकास करून व्हॉट्सअॅप विद्यापीठातील पदवीधारकांची फौज तैनात करून मायक्रो टार्गेटिंगच्या सहाय्याने अपेक्षित सामाजिक-राजकीय उद्दिष्टे साध्य करणे हा जगभरातल्या उजव्यांचा आवडता खेळ झाला आहे. ट्विटरसारख्या माध्यमांवर एआय बॉट्स वापरून एखादा विषय कसा तापवायचा, एखाद्या मंत्र्याच्या भाषण अथवा दौऱ्याआधी एखादा विषय कसा चर्चेत आणायचा याची सविस्तर रणनीती आपल्याला उजव्यांकडे दिसेल. उजव्यांची क्रियापद्धती उघड आहे. अल्गोरिदमचा वापर करून लोकांमधील छुपे द्वेष आणि नाराजी शोधून काढायची आणि त्याला आणखी खतपाणी घालायचे. ब्रेक्झिटच्या काळात स्थलांतराची भीती, अमेरिकेतील आर्थिक राष्ट्रवाद किंवा भारतातील हिंदू बहुसंख्याकवादाची चिंता असो, एआय-शक्तीवर चालणारे हे तंत्रज्ञान ‘आपण विरुद्ध ते’ ( us vs. them) हा भेद अधिक तीव्र करून, मध्यममार्ग किंवा समन्वयासाठी फार कमी जागा ठेवते. याचा परिणाम केवळ राजकीय ध्रुवीकरण नाही, तर नागरिकांचे रूपांतर ‘स्मार्टफोन’ने सज्ज आणि स्वत:ला नैतिकदृष्ट्या योग्य मानणाऱ्या टोळीयोद्ध्यांमध्ये होते.

पुरोगाम्यांचे अध:पतन

एआयची व्याप्ती एवढी प्रचंड आहे की पुरोगामी आणि डावे लोक जे बुद्धिवादासाठी ओळखले जातात आणि उजव्यांची भक्त म्हणून हेटाळणी करतात तेसुद्धा अलिप्त राहू शकले नाहीत. उजव्या विचारसरणीच्या लोकांद्वारे एआयचा वापर दहशत आणि गटनिष्ठेवर आधारलेला आहे, तर पुरोगामी विचारसरणीत त्याचा वापर नैतिक मान्यता आणि सामाजिक भांडवल मिळवण्यासाठी केला जातो. यातूनच ऑनलाइन पुरोगामी योद्ध्यांसाठी वोक संस्कृती ही नवी परिभाषा झाली आहे. वोक म्हणजे कोणत्याही विषयावर नैतिकदृष्ट्या सर्वात शुद्ध आणि बौद्धिकदृष्ट्या सर्वात प्रगत भूमिका घेण्याची स्पर्धा! यातूनच कोणताही मुद्दा उपस्थित झाल्यास नैतिक श्रेष्ठतेचा आव आणून विरोधी बाबींच्या बहिष्काराची भाषा केली जाते. दुर्दैवाने मुुद्द्यांना स्थळकाळाचे बंधन नसल्याने ही वोक कोल्हेकुई सर्वव्यापी होऊन वोक संस्कृतीचे वर्णन ‘सर्व मुद्द्यांचे पीडित, मात्र कोणत्याही एका गोष्टीसाठी जबाबदार नसणारी जमात’ असे केले जात आहे. त्यामुळे सामाजिक आंदोलने, निदर्शने यांच्यातून भौतिक स्वरूपात हाती काही लागत नसून ऑनलाइन आणि प्रसंगी प्रत्यक्ष जगात त्याची राळ उडवली जाते. ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर किंवा भारतामधील दलित लाइव्ह्ज मॅटर वगैरे चळवळी आशयसमृद्ध असूनसुद्धा वोक जाळ्यात फसल्यामुळे त्यांच्यातून प्रत्यक्ष भरीव काही निष्पन्न झाले नाही.

टोकाच्या भूमिका घेण्याच्या सोशल मीडिया अल्गोरिदमच्या प्रवृत्तीमुळे पुरोगाम्यांमध्ये संतापाची भावना सुलभपणे तयार केली जात आहे. लाइक, शेयर आणि कमेंट्सच्या मोहापायी ‘संतप्त अल्गोरिदम’ ( outrage algorithm) वापरकर्त्यांमध्ये अशी संस्कृती तयार होत आहे, जिथे लोक स्वत:चे अस्तित्व विसरत आहेत. ऑनलाइन संतापाच्या मानसिकतेचा अभ्यास केल्यावर असे दिसून येते की, हा आंतरिक प्रतिसाद नसून सामाजिक भांडवल मिळवण्यासाठी केलेला एक देखावा असतो. खऱ्या भावनांपासून दूर जाणे ही एक गंभीर विकृती आहे. यामुळे एखादा विषय ज्यावर अनेक तासांच्या चर्चासत्रांची गरज असते, त्याचे रूपांतर एका सहज शेअर करता येणाऱ्या ओळीत किंवा मीममध्ये होते, ज्यामुळे फक्त भावनिक गोंधळ वाढतो. ट्विटरसारख्या प्लॅटफॉर्मवर सामान्य झालेल्या ‘तात्काळ बहिष्काराची मोहिमे’ (rapid- fire cancellation campaigns) चा विचार करता, जेव्हा एखादा वादग्रस्त व्हिडीओ किंवा विधान समोर येते, तेव्हा अल्गोरिदम अशा लोकांना पुरस्कृत करतो जे सर्वात लवकर आणि टोकाची प्रतिक्रिया देतात. त्यांनी त्यामागचा संदर्भ पूर्णपणे समजून घेतला आहे की नाही हे महत्त्वाचे नसते. इथे, समजून घेण्याच्या खोलीपेक्षा प्रतिक्रियेच्या वेगाला जास्त महत्त्व दिले जाते. ही यंत्रणा सत्यापेक्षा व्हायरल होण्याची शक्यता असलेल्या गोष्टींना प्राधान्य देते.

हात दाखवून अवलक्षण

कॅन्सल कल्चर किंवा बहिष्काराचे आवाहन हे या अल्गोरिदम आधारित विकृतीचे संस्थागत रूप बनत आहे. समान उद्दिष्टासाठी विविध मार्ग असू शकतात किंवा एखाद्या मोठ्या ध्येयासाठी मतांतरे असून प्रसंगी सामंजस्याची भूमिका घ्यावी लागते ही आजकालच्या ऑनलाइन पुरोगाम्यांसाठी न पटणारी आणि न पचणारी गोष्ट बनत आहे. एका विशिष्ट कार्यपद्धतीमुळे त्या साच्यात न बसणाऱ्या लोकांना दुय्यम ठरवून या टोळीयोद्ध्यांकडून स्वत:च्या नैतिकतेचे डांगोरे पिटले जातात. यातून केवळ विरोधकच नव्हे तर आपल्याच विचारसरणीचे लोक जे आपल्याशी संपूर्ण सहमत नाहीत त्यांच्या हेतूंवर शंका उपस्थित करून त्यांना कॅन्सल कल्चरचे भाग बनविले जाते. यातूनच चळवळीशी संबंध नसणाऱ्या, वैचारिक बैठक नसणाऱ्या लोकांकडून सोशल मीडिया अल्गोरिदमवर स्वार होऊन चळवळ दुर्बळ बनविली जाते. उजवे लोक एआयचा वापर विरोधकांमध्ये दहशत आणि पाळत ठेवण्यासाठी करतात तर पुरोगाम्यांनी स्वत:च्याच गटातील लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी सुरू केला आहे.

एकूणच उजवे असोत वा पुरोगामी, अल्गोरिदमच्या जमान्यात दोघांनी आपली क्षेत्रे निश्चित केली आहेत मात्र त्यांची कार्यपद्धती एकसारखीच आहे. राष्ट्रीयत्व, धर्म, राष्ट्रीय सुरक्षा या गोष्टीमध्ये उजव्यांनी तर पुरोगाम्यांनी जात, लिंगभाव, समाजवाद, दुर्बल घटक या क्षेत्रांमध्ये आपला आनंद शोधला आहे. मात्र गुणात्मक पतन होऊन दशकांची चळवळ, वैचारिक वारसा आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोन यांच्या अभावाने सामाजिक प्रश्नांचे रूप केवळ कोल्हेकुईपुरते मर्यादित झाले आहे. उजवे आणि डावे हे दोन्ही विकृत जुळे भाऊ ऑनलाइन इको चेंबर्समध्ये अडकल्यामुळे त्यांचे आकलन एकांगी झाले आहे. त्याचप्रमाणे, दोन्हीकडे विचारसरणीपेक्षा अस्मितेला अधिक महत्त्व दिले जाते. जेव्हा एखादी व्यक्ती स्वत:ला हिंदू राष्ट्रवादी किंवा पुरोगामी उदारमतवादी मानते, तेव्हा धोरणे किंवा वर्गाशी संबंधित मुद्दे दुय्यम ठरतात. दोन्ही गट तर्कापेक्षा धर्म, वंश, जात किंवा इतर कोणत्याही अस्मितेच्या आधारावर अधिकाधिक एकत्र येत आहेत. आणि दोन्ही बाजू पुराव्यांऐवजी भावनांना बळी पडत आहेत.

एआयच्या युगात हे युद्ध उजवे विरुद्ध डावे/ पुरोगामी असे मर्यादित नाही तर चिकित्सक वृत्ती आणि तर्कहीन अस्तित्व यांतील आहे. विनय हर्डीकरांनी २० वर्षांपूर्वी ‘सुमारांची सद्दी’ या लेखात समाजातील वैचारिक अध:पतनावर अचूकपणे बोट ठेवले होते. दुर्दैवाने आता चिकित्सकता गुंडाळून ठेवून सुमारांच्या सद्दीची पुढची आणि डिजिटल आवृत्ती सुरू झाली आहे.

लेखक तंत्रज्ञान आणि राजकारण यांच्या अंत:संबंधाचे विद्यापीठीय संशोधक

phanasepankaj@gmail.com