एलन गॉटस्चॉक रॉय (१५ ऑगस्ट, १९०४ – १३ डिसेंबर, १९६०) या मानवेंद्रनाथ रॉय यांच्या पत्नी. त्यांचा जन्म पॅरिस (फ्रान्स)मध्ये झाला. वडिलांचे नाव ऑस्कर गॉटस्चॉक, तर आईचे एडेल फिजरल. एलनला शिक्षणाबरोबर संगीत, गायनाची आवड होती. पहिल्या महायुद्धात त्या तरुणपणी कट्टरपंथी संघटनेत सहभागी झाल्या. १९२७ मध्ये त्या जर्मन कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्य झाल्या.
एलन आणि मानवेंद्रनाथ यांची भेट १९२८ मध्ये जर्मनीत झाली. एलन या बहुभाषी होत्या. त्यांना जागतिक कम्युनिस्ट घडामोडींची चांगली जाण होती. राजकीय विश्लेषणात्मक लेखन हा त्यांचा आवडीचा प्रांत होता. आपण मानवेंद्रनाथ रॉय यांना जीवनसाथी म्हणून का निवडले याचा खुलासा एलन यांनी मानवेंद्रनाथ रॉय यांचे १९५४ मध्ये निधन झाल्यावर केल्याची नोंद तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘नवभारत’ मासिकाच्या एप्रिल, १९५४ च्या अंकात करून ठेवली आहे. त्यात एलननी म्हटले आहे की, ‘‘विवाहित होऊन कोणा एका पुरुष व्यक्तीला जीवित समर्पित करून जीवन जगण्याची कल्पना मला आवडत नव्हती. अनेक मित्र भेटले. परंतु, विवाहबद्ध होण्याची भावना उपजली नाही. परंतु, रॉय यांचे व्यक्तिमत्त्व सामर्थ्यशाली, त्यामुळे माझे मन दिपून गेले. विचारमय प्रकाशाची नवनवी क्षितिजे नित्य दाखविणारी ही व्यक्ती होती. ते प्रकाशमय जीवन जगत होते. त्यांच्या सहवासात वर्षे क्षणाप्रमाणे निघून गेली!’’
तर्कतीर्थांनी लिहिलेल्या अन्य एका लेखातून स्पष्ट होते की, या दाम्पत्याने दारिद्र्याचा मुकाबला करत भारतातील दिवस काढले. आलेली संकटे त्यांचा उत्साहभंग करू शकली नाहीत. रॉय आणि एलन हे २४ तास काबाडकष्ट करणारे मजूर होते. भारतातील सहा वर्षांच्या कारावासात (१९३१ ते १९३६) मानवेंद्रनाथ यांची प्रकृती ढासळली. तेव्हा एलन यांनी त्यांच्या सुटकेसाठी (त्या वेळी त्या विदेशात होत्या.) आंतरराष्ट्रीय स्तरावर पत्रमोहीम राबविली. विशेष म्हणजे या मोहिमेत जवाहरलाल नेहरू यांनी सहभाग घेतला होता.
एलन ही मानवेंद्रनाथ यांची सखी, सचिव, साथी सर्व काही होती. सकाळी साडेसातला चहाचा घोट घेऊन आकरापर्यंत एलनच्या टाइपराइटरची खटखट अखंड सुरू असायची. मग दोघेही मिळून स्वयंपाक करत. बहुधा ब्रेड, बटर, जाम इतकाच आहार उभयता घेत. तर्कतीर्थ विचारत, ‘‘शरीराला मानवेल असा आहार का नाही घेत?’’ रॉय उत्तर देत, ‘‘या प्रश्नाचा मला काय उपयोग? गरिबास मिळेल तेच खाणे भाग आहे.’’
एलन भारतात आल्या नसत्या, तर मानवेंद्रनाथ यांचे इथले जगणे दुर्धर झाले असते. एलन दुभाषी म्हणून जर्मनीत रॉय यांच्या सहवासात आल्या; पण एलननी केलेले लेखन, वैचारिक जाण यामुळे रॉय एलनकडे आकर्षित झाले होते. त्या काळात एलन ‘इंडिपेंडंट इंडिया’ या रॉयिस्ट नियतकालिकात युरोपीय राजकारणाविषयी विवेचक, विश्लेषक लेख लिहीत. त्यांचे इंग्रजी ‘झुळझुळीत’ असल्याची नोंद तर्कतीर्थांनी करून ठेवली आहे. तशी एलनची मातृभाषा इंग्रजी नव्हती. ती होती जर्मन. देशभाषा होती फ्रेंच. मजूर वर्गातील चळवळीचे साहित्य वाचून एलनने इंग्रजीवर हा अधिकार कमावला होता. परराष्ट्रीय राजकारण व इतिहास या विषयांत एलनच्या बुद्धीची सूक्ष्मता व विचारक्षमता पंडितास चकित करते, असे तर्कतीर्थांनी एके ठिकाणी म्हटले आहे.
मानवेंद्रनाथ रॉय यांच्याबद्दल एलनचे एक मत तर्कतीर्थांनी नोंदवून ठेवले आहे की, ‘‘त्यांचा स्वभाव फार सरळ आहे. त्यांना एवढ्याशा छोट्या काळात कितीतरी देशांत व समाजांत काम करावे लागले. प्रत्येक ठिकाणी त्यांनी पहिल्या प्रतीच्या माणसांचा विश्वास संपादन केला.’’
१३ डिसेंबर, १९६० रोजी एलन रॉय यांची एका परिचिताने हत्या केली. त्याबद्दल हळहळ व्यक्त करत तर्कतीर्थ म्हणाले होते की, ‘‘जन्माने परदेशी असलेल्या एका विदुषी आश्रमवासिनी, प्रशांत, तेजस्विनीची ही हत्या आहे. स्वदेशाबद्दल अभिमान वाटणाऱ्या कोणत्याही भारतीय माणसाला या खुनामुळे खाली मान घालावीशी वाटेल. माझ्या देशात अशा प्रकारचा खून व्हावा काय? असे चिंतेचे शल्य मनातून केव्हाही जाणे शक्य नाही…’’