भारताच्या अर्थव्यवस्थेने २०२२ सालच्या एप्रिल ते जून तिमाहीत १३.५ टक्क्यांच्या दराने वाढ साधली. प्रगतीच्या अनेक मापदंडांपैकी आर्थिक विकासदर हा एक महत्त्वाचाच निकष. बुधवारी त्या संबंधाने पुढे आलेल्या या आकडेवारीला आशा आणि निराशा असे दोन्ही पैलू आहेत. त्यामुळेच त्या संबंधाने उमटलेल्या प्रतिक्रियाही दोन टोके गाठणाऱ्या आहेत. विविध जनमाध्यमांत, नव्या अर्थ-गतिमान भारताबाबत भक्तमंडळींकडून ऊर भरून येऊन दिसलेले गुणगान एकीकडे, तर ‘सेन्सेक्स’च्या सहस्रांशांच्या गटांगळीने भांडवली बाजाराने घेतलेला धसका दुसरीकडे दिसत आहे.

सर्वप्रथम साडेतेरा टक्क्यांचा वृद्धिदर हा वर्षांतील सर्वात वेगवान वाढ दर्शविणारा आहे, हे खरेच. जगाचा विकसित कप्पा हा करोना साथ, तत्पश्चात युरोपातील युद्ध आणि भू-राजकीय अस्थिरतेच्या आघाताचे घाव सोसत ढेपाळला तो अद्याप वर उठू शकलेला नाही. त्या तुलनेत भारताची ही दमदार दोन अंकी वाढीची कामगिरी निश्चितच उठावदार आहे. अमेरिकेच्या सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीने मागील सलग तीन तिमाहीत वाढ सोडाच, प्रत्यक्षात नकारार्थी म्हणजे शून्याखालील दर नोंदवला आहे. ब्रिटनमधील अर्थस्थिती मंदीच्या वेशीवर आहे. शेजारच्या चीनची रयाही पार गेली असून, जगातील सर्वात गतिमान अर्थव्यवस्था म्हणून गत दोन तिमाहीत भारताचे स्थान अबाधित आहे.

पण तरीही ही आकडेवारी निराशदायीच आहे, ती का? एक तर, आधीच्या जानेवारी ते मार्च २०२२ तिमाहीत जीडीपी वाढीचा ४.१ टक्क्यांचा दर पाहता, नंतरच्या जून तिमाहीत दोन अंकी दराने तो वाढणे अपेक्षित होते. तशी वाढ दिसली हे आश्चर्यकारक नाही. कारण ही दोन अंकी झेप मागील वर्षांतील तळ गाठलेल्या आधारभूत परिणामांच्या तुलनेत आहे. पण ही वाढ बहुतांश अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त केल्या गेलेल्या १५ टक्क्यांच्या आणि खुद्द रिझव्‍‌र्ह बँकेच्या १६.२ टक्क्यांच्या पूर्वानुमानाच्या तुलनेत खूप कमी आली, हे धक्कादायक आहे. थोडे तपशिलात डोकावल्यास, साडेतेरा टक्क्यांचा आकडा म्हणजे भ्रमाचा भोपळाच ठरेल. एप्रिल-जून २०१९ तिमाहीत भारताचा जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादन ३३.०५ लाख कोटी रुपये होता, जो सरलेल्या एप्रिल-जून तिमाहीत ३४.४२ टक्के नोंदविला गेला. म्हणजेच तीन वर्षांत त्यातील १.०९ लाख कोटींची आणि वाढीचा हा टक्का ३.३ इतकाच भरतो. हर्षोल्हास व्यक्त करावा असा हा आकडा नक्कीच नाही. अर्थचक्र करोनापूर्व पदाला पोहोचले असेही हे आकडे दर्शवत नाहीत. विशेषत: व्यक्ती संपर्कावर आधारित (ऑनलाइन शक्य नसलेल्या) सेवा उद्योग आणि बांधकाम उद्योगाचे सकल मूल्यवर्धनातील अनुक्रमे ४.८ टक्के आणि ३.८ टक्के असे भिकार योगदान आहे तसेच निर्यात आघाडीवरील स्थिती उत्साहवर्धक नाही. भयंकर उष्ण राहिलेल्या यंदाच्या उन्हाळय़ाचा पीक उत्पादनाला विलक्षण फटका बसण्याचे कयास होते. प्रत्यक्षात तिमाहीत कृषी क्षेत्राने ४.५ टक्के दराने साधलेले मूल्यवर्धन हा आश्चर्यकारकच ठरते. किंबहुना असह्य महागाईचा सुरू असलेला पाठलाग पाहता, आगामी काळात हेच क्षेत्र अर्थव्यवस्थेला तारणारे ठरेल. उच्च वाढीच्या आकडय़ाचा भ्रम दूर होऊन भानावर आणणारे आत्मपरीक्षण मात्र आवश्यक ठरेल.