सहा राज्यांमधील सात मतदारसंघांतील पोटनिवडणुकांच्या निकालांवरून राजकीय अंदाज वर्तविणे शक्य नसले तरी वारे कोणत्या दिशेने वाहात आहेत याची चुणूक दिसते. सातपैकी चार जागा भाजपने जिंकल्या तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), तेलंगणा राष्ट्र समिती आणि राष्ट्रीय जनता दल या तीन प्रादेशिक पक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाली. असलेल्या दोन जागा गमावून काँग्रेसची पाटी कोरी राहिली. ‘भारत जोडो’ यात्रेतून राहुल गांधी काँग्रेस पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न करीत असले तरी जनतेचा गमाविलेला विश्वास अद्यापही संपादन करता आलेला नाही. पोटनिवडणुकीत भाजपला एका जागेचा फायदा झाला. लवकरच होणाऱ्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश, पुढील वर्षांच्या सुरुवातीला होणाऱ्या कर्नाटक, त्यानंतर मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांमधील निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेस अशी लढत अपेक्षित असताना काँग्रेसच्या पराभवाची मालिका खंडित होत नाही. महाराष्ट्र आणि बिहारमधील सत्ताबदलांनंतर होणाऱ्या पहिल्याच निवडणुकांत दोन्ही राज्यांमध्ये जास्त उत्सुकता होती. पण अंधेरीत भाजपने आधीच एक पाऊल मागे टाकले. तेथील एकतर्फी विजयानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाला नैतिक बळ मिळाले. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत अंधेरीच्या निकालाचा फार परिणाम होणार नाही. पण शिवसैनिकांचे मनोबल उंचावण्यास मदतच होईल. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडून पुन्हा एकदा लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केली. पण या नव्या युतीचा फारसा प्रभाव पडलेला नाही हाच त्या राज्यातील दोन पोटनिवडणुकांच्या निकालाचा अर्थ काढला जातो. भाजप आणि राष्ट्रीय जनता दलाने आपापल्या जागा कायम राखल्या.बिहारमधील राजकीय समीकरणे बदलल्यानंतरही भाजपला आशावादी ठरावा असाच हा निकाल. तेलंगणात लागोपाठ दोन पोटनिवडणुकांमध्ये विजय संपादन करणाऱ्या भाजपची घोडदौड रोखली. यामुळे सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीला अधिक समाधान. तेलंगणात पराभव झाला तरी काँग्रेसची जागा आता भाजपने घेतली आहे. काँग्रेस आमदाराच्या राजीनाम्यामुळे ही पोटनिवडणूक झाली, पण नव्या काँग्रेस उमेदवाराला अनामतही वाचवता आलेली नाही. तेलंगणा राष्ट्र समिती आणि भाजपमध्येच पुढील वर्षी विधानसभा निवडणुकांमध्ये लढत होईल अशीच चिन्हे दिसतात. हरियाणामध्ये माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे नातू भाजपकडून निवडून आले. १९६८ पासून गेली पाच दशके आदमपूर या मतदारसंघावर भजनलाल घराण्याचे वर्चस्व. भजनलाल यांच्या पुत्राची नाराजी दूर करण्यात काँग्रेस नेतृत्वाला अपयश आले. काँग्रेसला हक्काची जागा गमवावी लागली. हरियाणाच्या निकालावरून आम आदमी पार्टीच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. केजरीवाल यांनी वातावरणनिर्मिती करूनही हरियाणात आपचा उमेदवार चौथ्या क्रमाकांवर पडला. ओदिशात भाजपने जागा कायम राखून, पोटनिवडणुकीत विजय संपादन करण्याची बिजू जनता दलाची परंपरा खंडित केली. ओदिशातही काँग्रेसची पीछेहाट होत भाजपने मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. उत्तर प्रदेशातील जागा कायम राखून भाजपने वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. भाजपच्या विरोधात काँग्रेसची डाळ शिजत नसताना प्रादेशिक पक्ष मात्र टक्कर देतात, हे या सात जागांवर दिसून आले.