तापमानवाढीच्या परिणामामुळे मागील काही वर्षांत उष्णतेच्या लाटांची संख्या वाढली आहे. गेल्या सव्वाशे वर्षांमध्ये २०२२ मधील मार्च महिना देशात सर्वाधिक उष्ण ठरला. राज्यात या वर्षीदेखील उष्णतेच्या लाटा अधिक राहतील, असा अंदाज हवामान खाते आणि अभ्यासकांनी वर्तवला आहे. राज्यातील सरासरी तापमान गेल्या काही दिवसांपासून वेगाने वाढत आहे आणि तापमानाच्या पाऱ्याने अल्पावधीतच चाळिशी पार केली आहे. अधूनमधून कोसळणारा अवकाळी पाऊस आणि त्यातून डोकावणारा सूर्यनारायण यामुळे उन्हाचे चटके जरा अधिकच जाणवत आहेत. खरे तर फेब्रुवारीच्या पूर्वार्धात हवामानखात्याने तापमान वाढ आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. त्यामुळे उष्णतेच्या लाटांमध्ये महाराष्ट्र होरपळणार हे नक्की होते. मात्र, राज्य सरकारला उशिरा जाग आली. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळय़ातील दुर्घटनेनंतर राज्य सरकारने दुपारी मोकळय़ा ठिकाणी कोणताही कार्यक्रम आयोजित करू नये अशा सूचना दिल्या. अमेरिकेतील ‘नॅशनल ओशिएनिक अ‍ॅण्ड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’या संस्थेने हे वर्ष ‘एल निनो’चे आहे असे भाकीत वर्तवले. त्यामुळे पर्जन्यमानात घट आणि तापमानवाढीच्या उच्चांकाची दाट शक्यता आहे. तरीही ‘एल निनो’च्या तीव्रतेवरच सर्व काही अवलंबून आहे. मात्र, ज्या पद्धतीने आणि ज्या वेगाने संपूर्ण राज्यातच तापमानाचा आलेख वरवर चढत आहे, ते पाहता उष्णतेच्या लाटांची संख्या वाढणार हे निश्चित. अवकाळी पाऊस आला तरीही अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचले. पुण्यासारख्या शहरात ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस आणि मार्चच्या सुरुवातीला महाराष्ट्रात उन्हाळय़ाची चाहूल लागते. यावर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस नाही तर दुसऱ्याच आठवडय़ापासून राज्यात उष्मा जाणवू लागला. विशेष म्हणजे हवामान खात्याने १६ फेब्रुवारीलाच तापमानाचा जाहीर इशारा दिला. त्यानंतर कच्छ आणि कोकणच नाही, तर मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर भारतातील काही ठिकाणी नेहमीपेक्षा अधिक तापमानाची नोंद करण्यात आली. अनेक ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळ जाऊन पोहोचले. आता तर हवामान खात्यानेच एप्रिल महिन्यात संपूर्ण भारतातच उष्णतेची लाट असणार, तर पुढील तीन महिने तीव्र तापमानाचे असणार असे भाकीत केले आहे. दक्षिणेकडील किनारपट्टीचा काही भाग आणि ईशान्य भारतातील काही भाग वगळता महाराष्ट्रच नाही, तर दिल्ली, पंजाब, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, गुजरात आणि हरयाणाच्या काही भागांमध्ये तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली. एप्रिल ते जूनदरम्यान संपूर्ण भारतात तापमान हे सामान्य पातळीपेक्षा जास्त असणार आहे. एप्रिलच्या मध्यापासून सर्व राज्यांमधील तापमान वाढण्यास सुरुवात होईल, असा दिलेला इशारा आता प्रत्यक्षात उतरतो आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा उन्हाचा दाह सोसावा लागणार हे निश्चित. ‘एल निनो’ तीन वर्षांनंतर यंदा पुन्हा प्रभावी होत आहे आणि त्याच्या प्रभावामुळेच २०२३ मध्ये तापमानात अचानक प्रचंड वाढ होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात सध्या त्याची अनुभूती येत आहे. खारघरच्या घटनेनंतर राज्य सरकारने उष्णतेपासून बचावासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. वास्तविक हवामान खात्याने फेब्रुवारीत तापमानवाढीचा पहिला इशारा दिला तेव्हाच ती जाहीर करणे अपेक्षित होते. आता राज्य सरकारने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करून त्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. शाळा-महाविद्यालयांच्या वेळेत बदल, कामाच्या तासांमध्ये बदल अशा नानाविध सूचनांचा त्यात समावेश आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात तर यावर्षी एप्रिल महिन्यात उष्णतेच्या लाटेने आपले रेकॉर्ड मोडले आहे. राज्यातील तापणाऱ्या शहरांनी त्याची प्रचीती केव्हाच दिली. त्यातही येत्या शुक्रवार, शनिवार या दोन दिवसांत ही लाट आणखी तीव्र असणार आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद या शहरांमध्ये तापमानाचा पारा ४०-४१ अंश सेल्सिअसमध्ये खेळणार असला तरी उपराजधानी म्हणजेच नागपूरमधील तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतो. तापमानवाढीचा हा खेळ गेल्या काही वर्षांपासून असाच सुरू आहे. ‘एल निनो’ हे केवळ निमित्त आहे. त्यामुळे पारंपरिक उष्माघात कृती आराखडय़ाकडून बदलत्या परिस्थितीनुसार आराखडा तयार करणे अपेक्षित आहे. शासन, प्रशासनाला खारघरच्या दुर्घटनेनंतर तरी जाग येईल हीच अपेक्षा. दरम्यान पुढील चार दिवस राज्यातील कमाल तापमानात सुमारे दोन ते चार अंश सेल्सिअसपर्यंत घट दिसण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण आणि गोव्यात उष्ण हवामानाचे संकेत, तर इतरत्र ही शक्यता वर्तवताना अती ते मध्यम सरींच्या पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.