‘क्रिकेटवेडय़ा’ भारताला २०१३नंतर क्रिकेटमधील एकही महत्त्वाची स्पर्धा जिंकता आलेली नाही. याउलट ‘फुटबॉलवेडय़ा’ इंग्लंडने गेल्या चार वर्षांत दोन वेळा आयसीसी जागतिक अजिंक्यपदाच्या स्पर्धा जिंकून दाखवल्या. हे कसे घडले? यंदाच्या स्पर्धेत तर आयर्लंड, नमिबिया, झिम्बाब्वे, नेदरलँड्स या संघांनीदेखील काही संस्मरणीय विजय नोंदवले. अंतर्गत अस्थैर्यातून अजूनही बाहेर येऊ न शकलेल्या पाकिस्तानने अंतिम फेरी गाठली. या धक्कादायक निकालांमागील कारण काय? याउलट फुटबॉलविश्वाच्या परिभाषेत ज्या संघाला ‘गॅलॅक्टिकोस’ किंवा तारकापुंज म्हणता येईल, अशा एकाहून एक वलयांकित खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय संघाला पुन्हा एकदा विजेतेपदाने चकवा दिला. या सर्व घटनाक्रमाचे काहीएक संगतीघन प्रारूप मांडता येऊ शकते. ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे अजिंक्यपद इंग्लंडने पटकावले. २०१९मध्ये त्यांनी एकदिवसीय क्रिकेटमधील जगज्जेतेपद पटकावलेले आहेच.

दोन्ही प्रकारांमध्ये जगज्जेता ठरलेला हा क्रिकेटमधील आजवरचा पहिलाच संघ. याउलट क्रिकेट मंडळ आणि क्रिकेटपटूंची श्रीमंती या(च) निकषांवर बाकीच्या देशांना पुरून उरलेल्या भारताची गेल्या काही वर्षांत उपान्त्य फेरीत गाशा गुंडाळण्याची परंपरा कायम आहे. विश्लेषकांनी आणखी एका महत्त्वाच्या विरोधाभासावर बोट ठेवले आहे. २००७मध्ये भारताने पहिलावहिला टी-२० विश्वचषक जिंकला. त्यानंतर या प्रकारातील लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होऊन २००८मध्ये सुरू झालेली इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल म्हणजे क्रिकेटच्या वाटचालीतील एक मैलाचा दगड ठरली. मात्र, आयपीएलच्या उगमानंतर भारताला एकदाही टी-२० या क्रिकेटच्या लघुत्तम प्रकारात जगज्जेते बनता आलेले नाही! याचे कारण बहुधा या प्रकाराकडे आपण खेळ म्हणून पाहिलेले नसून, त्याचे ‘सोहळेकरण’ करण्यातच आपल्याकडच्यांना रस दिसून येतो. ‘फ्रँचायझी’ आधारित क्रिकेटमध्ये कामगिरीपेक्षा बोलीला, किमतीला अधिक महत्त्व आले. त्यामुळे गुणवानांपेक्षा आपल्या संघात बोलीच्या वजनदारांना प्राधान्याने स्थान मिळते. पण ही मंडळी एकत्र येऊन विजयी संघाचे रसायन सादर करतीलच, असे नव्हे. रोहित शर्मा, के. एल. राहुल, विराट कोहली, हार्दिक पंडय़ा, आर. अश्विन हे सगळे वेगवेगळय़ा फ्रँचायझी संघांचे कर्णधार होते किंवा आहेत. परंतु एक संघ म्हणून या गुणवानांना जागतिक स्पर्धेत एकही करंडक जिंकून देता आलेला नाही, हे ढळढळीत वास्तव आहे. बाकीच्या संघांमध्ये – विशेषत: इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांमध्ये भर ओसरलेल्या किंवा प्रभावहीन ठरू लागलेल्या कोणत्याही बडय़ा खेळाडूची तमा बाळगली जात नाही. पुन्हा या संघांमध्ये असे खेळाडूदेखील जन्मदत्त अधिकार असल्यासारखे संघाला चिकटून राहात नाहीत, स्वत:हून बाजूला होतात. जॉस बटलरच्या इंग्लिश संघासमोर समस्या नाहीत किंवा तो फारच परिपूर्ण संघ आहे अशातला भाग नाही. पण प्रत्येक आव्हान निराळे, तसा त्यावरील तोडगाही निराळा हे साधे तत्त्व या संघाने संपूर्ण स्पर्धेत पाळले. पाकिस्तानला नशिबाची साथ लाभली म्हणणाऱ्यांना या संघाच्या जिद्दीकडे, हार न मानण्याच्या वृत्तीकडे डोळेझाकच करायची असावी. आमच्याकडे वर्षांनुवर्षे तेच खेळाडू, तेच तंत्र-डावपेच आणि अपेक्षाही त्याच. अशा मानसिकतेतून विजेतेपद हाती कसे येणार? तशात आता रोहित-विराट प्रभृतींनी भविष्याबाबत काय ठरवायचे, याविषयी मंडळ त्यांच्याशी चर्चा करणार आहे! धन्य ती वलयासक्ती आणि व्यक्तिपूजा!