राज्य सरकारचे वागणे पालथ्या घडावरचे पाणी कसे असू शकते याचे ताजे उदाहरण म्हणजे उद्योग विभागाने परराज्यात गेलेल्या उद्योगांबाबत प्रसिद्ध केलेली श्वेतपत्रिका. श्वेतपत्रिकेतून वास्तव समोर यावे ही अपेक्षा असते. पण जुने राजकीय हिशेब चुकते करण्यासाठीच श्वेतपत्रिकेचा उपयोग केला जातो, हे राज्यात आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या श्वेतपत्रिकांवरून अनुभवास आले. सुमारे दीड लाख कोटीची गुंतवणूक असलेला ‘वेदान्त – फॉक्सकॉन’चा प्रकल्प महाराष्ट्रात यावा या दृष्टीने राज्य शासनाने प्रयत्न केले होते. पण गेल्या सप्टेंबरात वेदान्त कंपनीने हा प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करीत असल्याचे जाहीर केले. यापाठोपाठ टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्यात येत असल्याची घोषणा झाली. दोन महाकाय प्रकल्प गुजरातला गेल्याने साहजिकच शिंदे सरकारवर टीका सुरू झाली. राज्य सरकार गंभीर नाही, असा आरोप झाला. तशातच, केंद्राच्या प्रोत्साहन योजनेतून साकारणारा ‘बल्क ड्रग’ प्रकल्प उभारण्यासाठी रायगडचे नाव पुढे असताना केंद्राने गुजरात, हिमाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशची निवड केल्याने महाराष्ट्राच्या पदरी पुन्हा निराशाच आली. नेहमीप्रमाणे नवीन सरकारकडून आधीच्या सरकारवर खापर फोडले जाते. तसाच प्रकार झाला. उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडून गुंतवणुकीकरिता प्रयत्नच झाले नाहीत, असे खापर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फोडले होते. विशेष म्हणजे शिंदे व सामंत दोघेही ठाकरे सरकारमध्ये मंत्री होते. गेल्या वर्षी गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका असल्याने मोदी सरकारने गुजरातला झुकते माप दिले होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

‘वेदान्त-फॉक्सकॉन’ व ‘टाटा-एअरबस’ प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना उद्योगमंत्री सामंत यांनी राज्यातील गुंतवणूक तसेच प्रकल्प बाहेर जाण्याबद्दल श्वेतपत्रिका जाहीर करण्याचे गेल्या सप्टेंबरमध्ये जाहीर केले. त्यानंतर विधिमंडळाची दोन अधिवेशने पार पडली पण श्वेतपत्रिकेला मुहूर्त मिळाला नव्हता. शेवटी पावसाळी अधिवेशनात – म्हणजे नऊ महिन्यांनंतर – सादर झालेली ही नऊ पानी श्वेतपत्रिका म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढण्यासारखाच प्रयत्न. श्वेतपत्रिकेतून सरकार स्वत:ची जबाबदारी झटकून टाकते. ‘टाटा-एअरबस’, ‘वेदान्त – फॉक्सकॉन’ किंवा ‘सॅफ्रन’ या कंपन्यांचे राज्यात प्रकल्प उभारण्याकरिता सामंजस्य करार झाले नव्हते. सबब ‘प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले’ म्हणणे सयुक्तिक ठरणार नाही, असे तर्कट उद्योग विभागाने मांडले आहेत. मात्र हा दावा करताना वेदान्त कंपनीची गुंतवणूक महाराष्ट्रात व्हावी म्हणून केलेल्या प्रयत्नांची जंत्री पाच पानांत देण्यात आली आहे. कोणताही उद्योजक त्याचा फायदा होणार असेल तरच गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊन सामंजस्य करार करतो. यासाठी राज्य सरकारला अनुकूल वातावरण तयार करावे लागते. देण्यात येणाऱ्या सवलती, जमिनीचे दर, वीज, पाणी यांची उपलब्धता यासाठी गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण करावा लागतो. यात महाराष्ट्र सरकार कमी पडले का? वेदान्त कंपनीला सामंजस्य करार करण्याकरिता पत्र पाठविण्यात आले होते, असा उल्लेख आहे. मग कंपनीने प्रतिसाद का दिला नाही, याचाही सरकारने विचार करायला हवा होता. केरळमधील ‘किटेक्स’ उद्योगसमूह काही हजार कोटींची तमिळनाडूत गुंतवणूक करणार याचा नुसता सुगावा लागताच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे पुत्र व माहिती तंत्रज्ञानमंत्री रामाराव यांनी विशेष विमान पाठवून कंपनीच्या प्रवर्तकांना हैदराबादेत पाचारण केले होते. सवलती व सर्व पायाभूत सुविधा पुरविण्याचे नुसते आश्वासन देऊन नाही तर तसे लेखी आदेश काढून गुंतवणूक तेलंगणात होईल याची खबरदारी घेतली होती. राज्यकर्ते तसेच नोकरशाहीला तशी खबरदारी घ्यावी लागते किंवा तेलंगणाप्रमाणे चपळाई दाखवावी लागते. ‘सामंजस्य करार झाले नव्हते, म्हणून गुंतवणूक महाराष्ट्राबाहेर गेली हे म्हणणे सयुक्तिक नाही’ अशा युक्तिवादातून सरकारने किंवा उदय सामंत यांच्याकडील उद्योग विभागाने एक प्रकारे आपल्या अपयशाची कबुलीच दिली आहे.

राज्यात १९७० पासून शिक्षण, ऊर्जा, अर्थ, सिंचन, उद्योग अशा विविध विभागांच्या श्वेतपत्रिका प्रसिद्ध  झाल्या. श्वेतपत्रिकांमुळे संबंधित विभागाच्या कामात सुधारणा व्हावी व जुन्या चुका टाळाव्यात, अशी अपेक्षा असते. १९९९ आणि २०१५ मध्ये सत्ताबदल झाल्यावर वित्त विभागाच्या श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यात खर्चावर नियंत्रण व महसूल वाढविण्यावर भर देण्यात आला. पण गेल्या दोन दशकांत ना खर्च कमी झाला; ना महसुली उत्पन्नात वाढ झाली. सिंचनाची श्वेतपत्रिका प्रसिद्ध होऊन दहा वर्षे झाली; पण सिंचनाचा टक्का किती वाढला याची आकडेवारी आजतागायत नाही ती नाहीच. केवळ उपचार आणि राजकीय विरोधकांवर कुरघोडीसाठीच श्वेतपत्रिकांचा उपयोग केला जातो हे प्रत्येक वेळी अनुभवास आले.