scorecardresearch

Premium

आरोग्याचे डोही:अडकलेली रेकॉर्ड

‘‘फरश्यांमधल्या या रेषेवर पाय दिला ना की आई मरते,’’ चौथीतल्या आलोकने सुपर्णला ज्ञानाचा डोस पाजला. नंतर आलोक ते ब्रह्मज्ञान विसरूनही गेला.

arogyachya dohi 2
आरोग्याचे डोही:अडकलेली रेकॉर्ड

डॉ. उज्ज्वला दळवी

मानसोपचारांनी ओसीडी पूर्ण बरा होत नाही. पण त्या उपचारांनी रुग्णाला आणि जिवलगांना होणारा त्रास कमी होतो..

How To Take A Deep Sleep with an eye mask To improve memory and concentration Important Sleeping Guide During 10th 12th Exams
झोपण्याआधी डोळ्यावर ‘ही’ वस्तू लावल्याने स्मरणशक्ती व एकाग्रता सुधारते? परीक्षांच्या काळात तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती
Watching TV While Eating
जेवताना टीव्ही पाहता का? लगेच थांबवा; तज्ज्ञांनी सांगितलेले दुष्परिणाम जाणून घ्या
applications of limited artificial intelligence found in everyday life
कुतूहल : मर्यादित कृत्रिम बुद्धिमत्तेचे दैनंदिन उपयोजन
Loksatta anyatha concepts of Litefest and Sahitya Samelan Jaipur Litefest
अन्यथा: उंटावरची ‘शहाणी’!

‘‘फरश्यांमधल्या या रेषेवर पाय दिला ना की आई मरते,’’ चौथीतल्या आलोकने सुपर्णला ज्ञानाचा डोस पाजला. नंतर आलोक ते ब्रह्मज्ञान विसरूनही गेला. पण सुपर्णच्या मनात ते वाक्य खोलवर घुसलं. तेव्हापासून तो चालताना पायाखाली बघत, टिक्कर खेळल्यासारखा बरोब्बर फरशीवरच पाय देत चालायला लागला. चुकून मधल्या रेषेवर पाय पडलाच तर त्याच्या मनाला घोर लागे. पुढचं पाऊल टाकण्याआधी, आईला सुरक्षित ठेवायला, तो मनात मारुती स्तोत्राचा जप करी. तशा खालमुंडी चालण्यामुळे तो वाटेतल्या वस्तूंना, माणसांना धडक देई; आईचे धपाटे खाई. वक्तृत्व स्पर्धेच्या हॉलमधली जमीन छोटय़ाछोटय़ा फरश्यांची होती. सुपर्णचं नाव पुकारल्यावर तो स्टेजपर्यंत पोचूच शकला नाही! ‘हा सारा आपल्या मनाचा खेळ आहे; आईला खरा धोका नाही,’ हे सुपर्णला समजत होतं. पण मनाच्या त्या खेळापुढे तो हतबल होता.

विघ्नेश हा दुर्गादेवीच्या मंदिरातल्या पुरोहितांचा मुलगा. ‘देवीवरची आपली श्रद्धा कमी पडते,’ असं त्याच्या मनाने घेतलं. त्या विचाराने त्याला भंडावून सोडलं. ‘माझी भक्ती पुरेशी आहे ना?’ असं विचारून विचारून त्याने वडिलांना, इतर पुजाऱ्यांना वैताग आणला. मीहान बारावीतला हुशार मुलगा. त्याला जंतूंची किळस येते. टॉयलेटमध्ये तासंतास बसला तरी पोट साफ झालं, असं त्याला वाटतच नाही. मग हात तर तो धूतच बसतो. साबण संपला; हात पांढरेफटक झाले की मग नाइलाजाने थांबतो. विघ्नेश आणि मीहाननाही आपला वेडेपणा समजत होता, पण ते त्याला जखडले होते.

‘मी माझ्या मुलाला सुरीने मारणार आहे’, ‘मी कुरूप आहे’, ‘खोलीतल्या सगळय़ा वस्तू जागच्या जागी नसल्या तर काही तरी भयानक घडणार आहे’, ‘दार उघडं राहिलं; दरोडेखोर आले’, ‘माझं नवऱ्यावर प्रेमच नाही’ वगैरे बिनबुडाचे विचार, मन अस्वस्थ करणाऱ्या कल्पना किंवा नको त्या प्रबळ इच्छा मनाला घेरून टाकतात. मन चुंबकासारखं त्या एकाच गोष्टीकडे ओढ घेतं, विकृत असोशी लागते. तो मनाला लागलेला चळ अखंडित छळ करतो. त्यालाच ऑब्सेशन म्हणतात. जगातल्या दोन टक्क्यांहून अधिक लोकांना तशा काल्पनिक गोष्टींच्या असह्य काळजीने पछाडलेलं असतं.

मन त्याच्यावर तेवढाच त्रासदायक, तर्काला न पटणारा उतारा शोधतं. रेषेवर पाय पडला तर उपाय म्हणून मारुती स्तोत्र म्हणणं; आपल्या भक्तिभावाबद्दल, प्रेमाबद्दल इतरांकडून निर्वाळा मागणं; जंतूंचा नायनाट करायला हात धूत बसणं; ‘दाराची कडी बंद आहे ना?’ याची दर पाच मिनिटांनी खात्री करणं; एखाद्या वस्तूला न चुकता, जातायेता हात लावणं; सतत वस्तू जिथल्या तिथेच लावत बसणं हे विधी करायला मनाचीच सक्ती होते. ते कर्मकांड म्हणजेच ‘कम्पल्शन’. वाईट घडलं नाही याचं श्रेय त्या कर्मकांडाला जातं. रेकॉर्डच्या अडकलेल्या पिनसारखं मन तेवढय़ातच मागेपुढे जात राहातं. म्हणून त्या मानसिक आजाराला ‘ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसॉर्डर’ ऊर्फ ‘ओसीडी’ म्हणतात. 

काही जणांचा ओसीडी स्वत:च्या प्रयत्नांनीच आटोक्यात राहातो. त्याचा त्यांच्या आणि इतरांच्या जगण्यावर परिणाम होत नाही. पण एरवी सर्वसामान्य माणसांच्या ध्यानीमनी येणार नाहीत अशा गोष्टी ओसीडीच्या माणसांचं कामकाज, कौटुंबिक-सामाजिक जीवन, सगळं जिणंच व्यापून टाकतात. त्यांची कामं वेळेत पुरी होत नाहीत; शिवाय कर्मकांडांमुळे त्यांच्या जिवलगांना त्रास होतो.

ते सगळे हाल खरेखुरे असतात. तरीही ‘जग वेडा म्हणेल,’ या भीतीने आजार दडवला जातो. वरवर बघता त्यांच्यातल्या बऱ्याच संत्रस्त माणसांचं, ‘छान चाललंय की!’ असंच जगाला वाटत असतं. डॉक्टरांनाही मोकळेपणाने सगळं सांगितलं जात नाही. त्यामुळे वेळीच मदत मिळत नाही. चिंता, नैराश्य, अपराधी भाव, वगैरे भावना हे ओसीडीचे परिणाम असतात. कित्येकदा त्यांच्यावरच भर दिला जातो. रुग्णाच्या मनाला छळणारी इत्थंभूत कथा डॉक्टरांना समजली तरच मनाची रेकॉर्ड दुरुस्त होऊ शकेल.

मनाचे खेळ रुग्णाला समजावणारे आणि त्या योग्य समजुतीच्या मदतीने त्याची वागणूक सुधारून देणारे उपचार म्हणजेच ‘कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी’ किंवा सीबीटी. ओसीडीमधल्या मनाला घेरून टाकणाऱ्या भयशंका काल्पनिक आहेत; त्यांच्यातला धोका खरा नाही याची खात्री पटवणं हे कॉग्निटिव्ह भागाचं उद्दिष्ट असतं. प्रत्येक रुग्णाच्या आजाराची वेगळी छटा ओळखून मानसोपचारतज्ज्ञ त्याला समजावतात. धोका खरा ठरायची शक्यता किती टक्के आहे ते गणित मांडायला लावतात. रुग्णाच्या कलाने घेत; त्याचं वय, घरच्यांकडून मिळणारा मानसिक आधार, पूर्वायुष्यातले खडतर अनुभव हे सगळं जमेला धरून उपचारांचं धोरण आखणं आणि टप्प्याटप्प्याने रुग्णाची मनोभूमिका बदलत नेणं हे मोठय़ा कौशल्याचं आणि चिकाटीचं काम असतं. हा समजावण्याचा भाग पुढच्या वागणूक सुधारण्याच्या भागासाठी मनाची तयारीही करतो.

वागणूक सुधारायचा भाग ओसीडीने अडकलेली मनाची रेकॉर्ड सोडवायचा प्रयत्न करतो. काल्पनिक संकटाच्या  काळजीपासून  दूर न पळता तिला सामोरं गेलं तर हळूहळू मेंदू काळजी सोसायला शिकतो; कर्मकांड टळतं. हे सहजासहजी होत नाही. त्या ‘हळूहळू’चा कालावधी काही वर्षांचा असतो.

सुपर्ण आधी आईचा हात धरून, मनातल्या मनात, पायाने रेषा चाचपून बघतो आणि फक्त, ‘मारुती, मारुती’ इतकंच म्हणतो. तसं धीर धरणं वाढवत नेत, त्यापुढच्या लांब पल्ल्याच्या प्रवासात, हळूहळू, ‘त्या रेषेचा आईच्या आयुष्यरेषेशी काही संबंध नाही,’ हे वेडय़ा मनाला पटायला लागतं. सुपर्णने रेषेवर पाय दिला आणि मारुतीचं नावही न घेता, चिंतेचा डोंगर पेलून तो तिथेच उभा राहिला की त्याच्या मनाच्या शहाण्या भागाचा विजय होतो; रेकॉर्ड पुढे सरकते.

वेडं मन कधीकधी भयकथेतल्या खलनायकासारखं त्या विजयध्वजातून प्रकट होतं आणि काही तरी नवंच दुष्टचक्र सुरू करून देतं. पण वागणूक सुधारायचा मार्ग समजल्यामुळे ती नवी लढाई त्यामानाने कमी कठीण ठरते. मानसोपचारांनी ओसीडी पूर्ण बरा होत नाही. पण त्या उपचारांनी त्याचा छळ कह्यात येतो; जगण्याचा असह्यपणा आणि जिवलगांना होणारा त्रास कमी होतो.

ओसीडीच्या लोकांत मेंदूच्या माथ्यावरचं हालचाल-नियंत्रक केंद्र आणि मेंदूच्या गाभ्यातलं भावभावनांचं केंद्र यांच्यातल्या दळणवळणातलं रासायनिक संतुलन बिघडतं. त्यासंबंधीचा, केंब्रिज विद्यापीठाने अद्ययावत तंत्रज्ञान वापरून केलेला अभ्यास २०२३ मध्येच प्रकाशित झाला. मेंदूतली नैराश्याची आणि ओसीडीची वाट जवळजवळ असते. नैराश्यावरच्या ‘फ्लूऑक्सेटीन’सारख्या औषधांच्या परिणामाने ओसीडीचे काल्पनिक चळ कमी छळतात. तो परिणाम दिसायला १२ आठवडय़ांइतका वेळ लागू शकतो. शिवाय प्रत्येकाच्या चोखंदळ मेंदूला नैराश्यावरच्या औषधांतलं कुठलं तरी एकच औषध लागू पडतं. ते ठरायला सुरुवातीला थोडा धीर धरावा लागतो. औषध लागू पडलं तर ते किमान वर्षभर, कधीकधी मधुमेहातल्या इन्सुलिनसारखं जन्मभरही चालू ठेवावं लागतं. काही जणांना फक्त नैराश्यावरच्या औषधांनी आराम वाटत नाही. तेव्हा त्यांच्यासोबत एखादं चिंताहारक औषध किंवा ‘रिस्पेरिडोन’सारखं ‘डोपामीन’ घटवणारं औषध दिलं, तर मदत होते.

यशोदाकाकूंच्या स्वच्छतेच्या वेडाने सगळय़ा घरादाराला वेठीला धरलं होतं. मानसोपचाराने भागेना. औषधाच्या गोळय़ा धुतल्याने वाया जात. अशा लोकांत ‘शॉक’ देणं (ईसीटी),  मेंदूला बाहेरून विजेरी संदेश पोहोचवणं, मेंदूतून चुंबकीय लहरी पाठवणं, अगदी क्वचित मेंदूच्या गाभ्यातल्या लहानशा भागाला गॅमा-किरणांनी नष्ट करणं वगैरे इतर उपचारांचा विचार करावा लागतो. नव्या संशोधनाने त्या उपचारांमागचं वैज्ञानिक स्पष्टीकरण मिळेल.

ओसीडीमुळे मंदारला पीएचडीचा प्रबंध मनाजोगा पुरा करता आला नाही. नंतर डॉक्टरांच्या मदतीने ओसीडी कह्यात आला; अनेक शोधनिबंध लिहून झाले. आता त्यांच्या घरात ओसीडीचा उल्लेख गमतीने होतो. योग्य वैज्ञानिक चाबूक वापरला तर वाघोबाचा वाघ्या करता येतो.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Arogyachy dohi psychotherapy ocd treatments patient amy

First published on: 09-10-2023 at 00:00 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×