डॉ. उज्ज्वला दळवी
चांचल्यदोष बरा होत नाही, मात्र मानसोपचार आणि काही औषधांनी तो नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. आयुष्य शांत होऊ शकतं..
‘‘अनुज, बाबा मारतील!’’ १० वर्षांचा अग्रज सहा वर्षांच्या धाकटय़ा भावाला विनवत होता. रेल्वेच्या फलाटावर अनुजने इतर प्रवाशांचं सामान विस्कटलं; एकाला धक्का देऊन त्याचा चहा सांडला; वजनाच्या काटय़ावर चढ-उतर केली; दुरून येणाऱ्या आईने ती पाहिली. तिने तिरीमिरीत आधी अग्रजला धपाटा घातला, अनुजच्या कानाखाली लगावली आणि मग रडवेली होत दोघांनाही जवळ घेतलं.
अनुज एक जिताजागता धुमाकूळ होता. त्याला हायपर अॅक्टिव्हिटी ऊर्फ शारीरिक चांचल्यदोष होता. रौनक अनुजइतका धुमाकूळ घालत नसे. पण शाळेत तास सुरू असतानाही तो वर्गभर फिरे; कुणाची वहीच घे; कुणाची पेन्सिल उचल; कुणाला टपली मार असे धंदे चालत. इतिहासाच्या तासाला त्याला समरगीत म्हणावंसं वाटे. काळकामवेगाचं गणित सोडवताना तानाजीची घोरपड आठवे. गुरुत्वाकर्षण शिकताना जिभेवर सफरचंदाच्या रायत्याची चव येई. तिथून मन कुठल्या कुठे भरकटत जाई. चालू असलेला विषय मेंदूपर्यंत पोहोचत नसे. घरी अभ्यास करतानाही त्याचा मेंदू अनंत उचापती करत असे. साधा सोपा धडा समजायला तासचे तास खर्ची पडत. त्याला वेळाचंही भान नसे. शाळेत, अगदी परीक्षेलाही वेळेवर पोहोचणं त्याला जमत नसे. वेळाच्या नियोजनाचा अभाव आणि मेंदूच्या टिवल्याबावल्या यांच्यामुळे येत असलेलंसुद्धा परीक्षेत लिहायचं राहून जाई. रौनकला शारीरिक चांचल्यदोष तर होताच, पण अटेन्शन डेफिसिट किंवा मानसिक चांचल्यही होतं.
शिवाय शिक्षकांवर नेम धरून बाण मारणं; समोरच्या मुलाच्या पांढऱ्या शर्टावर रंगाचे फराटे ओढणं; मित्राचं पुस्तक चालत्या बसमधून फेकून देणं वगैरे गोष्टी करायची रौनकला अनावर हुक्की (इम्पल्सिव्ह वागणं) येई. इतरांना होणारा त्रास त्याला समजतच नसे. समीरने न विचारता पेन्सिल घेतली म्हणून रौनकने त्याच्यावर कातर उगारली. त्यामुळे त्याची कुणाशीही मैत्री टिकत नसे. शिक्षक रागावले की त्याचं मन बंडच करून उठे. मग तो बेगुमानपणे उलट बोले; अधिकच खोडय़ा करी.
चांचल्यदोष असलेल्या प्रत्येक मुलात ते सगळे दुर्गुण कमीअधिक प्रमाणात असतात. त्या दोषाचं शास्त्रीय नाव ‘अटेन्शन डेफिसिट हायपर अॅक्टिव्हिटी डिसॉर्डर’ किंवा एडीएचडी असं आहे. सध्या जगातल्या आठ टक्के मुलांना तो त्रास आहे. नंतरच्या काळात तशी चंचल मुलं शाळा सोडतात; त्यांच्याकडून एखाद्या अनावर ऊर्मीमुळे गुन्हा घडू शकतो; त्यांना व्यसनं लागतात. म्हणून त्यांना वेळीच समजून घेऊन, त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करून वळण लावणं गरजेचं असतं.
मोठेपणी मेंदूच्या केंद्रांची नीट वाढ झाली तर काही जणांत शारीरिक चांचल्य कमी होतं; काही जणांना मानसिक शांती लाभते. पण तसे भाग्यवान विरळा. बहुतेकांत ते चांचल्य जन्मभर टिकून राहातं. मधुमेह, दमा यांच्यासारखीच चांचल्यपीडाही कधी बरी होत नाही; ती कह्यात ठेवता येते. त्याच्यासाठी आयुष्यभर उपचार सुरू ठेवावे लागतात.
अनुजच्या बुद्धिमान आईला, वासंतीलाही मानसिक चांचल्यदोष होता. ती सरकारी नोकरीत मोठय़ा पदावर होती. घरचं आवरून कामावर पोहोचायला तिला नेहमी उशीर होई. तिथेही ती मोबाइल फोनवर वेळ घालवे; कामात चुका करी; काम पुरं करायला खूप वेळ लावी; वरिष्ठांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी विसरे. घरी पोहोचल्यावर ती पदर खोचून कामाला लागत नसे; उगाच इथेतिथे करी. एखादी गोष्ट मनात आली की ती झपाटल्यासारखी त्याच गोष्टीच्या मागे लागे. घरात वस्तूंचा ढिगारा, अस्ताव्यस्त पसारा असे. स्वयंपाक राहून जाई. उपाशी मुलांना धोपटणं, नवऱ्याशी भांडण हे रोजचंच होतं. त्यात अनुजच्या उपद्वय़ापांची भर पडल्यामुळे बिचारा अग्रज भरडून निघत होता.
गेल्या १५ वर्षांत चांचल्यदोषाचा मोठा अभ्यास झाला आहे. चांचल्यदोषाचं कारण असलेला जनुक एकच नसतो. जनुककोशात विखुरलेल्या अनेक जनुकांच्या एकत्रित परिणामाने तो त्रास होतो. त्या लोकांच्या मेंदूचा नव्या प्रतिमातंत्रांनीही अभ्यास झाला. त्यांच्या मेंदूतली, हालचालींवर नियंत्रण ठेवणारी महत्त्वाची केंद्रं फार हळूहळू वाढतात. मेंदूच्या गाभ्यात, भावना-हुक्की वगैरे सांभाळणारी केंद्रं असतात. अनुज-रौनकसारख्या मुलांत हालचाल-केंद्रं आणि भावनाकेंद्रं यांच्यातल्या दळणवळणाच्या रस्त्यांतही बिघाड असतो. तिथल्या दळणवळणात डोपामीन हे मेंदूला शाबासकी देणारं, आनंददायी रसायन कमी पडतं.
मिथाइलफेनिडेट आणि डेक्स्ट्रोअँफेटामीन ही चांचल्यदोषावरची दोन मुख्य औषधं मेंदूतलं डोपामीन वाढवतात; हालचालींना लगाम लावणाऱ्या केंद्रांना कामाला लावतात.
अनुजच्या आईबाबांनी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेतला. त्यानुसार वासंतीने मेडिटेशन, मिथाइलफेनिडेट आणि मानसोपचारही सुरू केले. आता ती बाबांच्या मदतीने आठवडय़ाच्या स्वयंपाकाची तयारी रविवारी करून ठेवते; येणाऱ्या दिवसाचं वेळापत्रक आदल्या रात्री आखते; वेळ पाळायची शिकस्त करते; त्यासाठी गजर लावते. ज्या गोष्टींनी मन भरकटतं त्या गोष्टींचा विचार सजगपणे टाळते. कुठलाही मोठा निर्णय बाबांच्या सल्ल्याशिवाय घेत नाही. औषधांमुळे ते जमत आहे.
वागणुकीवरचे उपचार अगदी वयाच्या चौथ्या वर्षांपासून, घरच्या घरी सुरू करता येतात. मुलाला सुधारायचं काम आईबापांचंच असतं; तिथे पळवाट नसते. अनुजच्या आईबाबांनी डॉक्टरांच्या मदतीने ते शिवधनुष्य पेलायचं ठरवलं.
‘‘माझा पहिला नंबर आला तर मला काय मिळणार?’’ हा प्रश्न वासंतीनेही लहानपणी विचारला होता. चांचल्यदोषाच्या मुलांना खाऊ-खेळणं-पुस्तक असं दिसणारं-हातात येणारं बक्षीस द्यावं लागतं. वासंतीने खोटे कागदी पैसे वापरले. चांगलं वागलं की ‘पैसे’ मिळणार आणि वाईट वागलं की ‘पैसे’ वजा होणार असा हिशेब ठेवून तशा ५० रुपयांचं खेळणं, शंभर रुपयांचं पुस्तक असा सौदा ठरवला. चांगलं काय आणि वाईट काय ते आई-बाबा-अग्रजने एकजुटीने, स्पष्ट शब्दांत, पुन:पुन्हा सांगितलं; ठळक अक्षरांत भिंतीवर लिहून ठेवलं. अनुजलाही त्याच्या अनावर धुमाकुळाचा त्रास होतच होता. त्याला आईबाबांची, दादाची मदत हवीच होती.
‘‘अनुज, ऊठ. पाच मिनिटांत दात घास.’’, ‘‘आता दहा मिनिटांत ‘शी’ला जाऊन ये.’’, ‘‘दहा मिनिटांत आंघोळ उरक.’’ असे सकाळच्या तयारीचे छोटेछोटे तुकडे पाडून एक-एक तुकडा वेळ आखून करायला दिला. प्रत्येक काम पुरं झाल्याचे ‘पैसे’ जमा केले, कौतुक केलं. कधीही न रागावता-मारता, व्याख्यान देऊन त्याचा स्वाभिमान खच्ची न करता चुकांसाठी फक्त ‘पैसे’ कापले. मध्येच थट्टामस्करी केली; उडय़ा मारायला दिल्या. शाळेची तयारी वेळेत झाली. त्या सगळय़ात अग्रजने आनंदाने हातभार लावला.
‘‘अनुज, कशी झाली तयारी?’’
‘‘वेळेत! मस्त!’’
‘‘शाब्बास! आता रोज अशीच करूया हं!’’ अनुजचा स्वाभिमान खुलला.
कामांची चालढकल टाळायला वासंतीने अनुजचं दिवसाचं वेळापत्रक त्याच्याच मदतीने बनवून, ठळक अक्षरांत लिहून दारावर लावून ठेवलं. तिने आणि अनुजने मिळून त्या कामांच्या क्रमाचं खेळगाणं बनवलं. खेळत-गात-मजेत काम वेळात संपवायची अनुजला सवय लागली.
बारा वर्षांच्या रौनकला मिथाइलफेनिडेट सुरू केलं. त्याने त्याला फार धडधडलं. म्हणून डेक्स्ट्रोअँफेटामीन दिल्यावर त्याला त्रास झाला नाही. हळूहळू प्रमाण वाढवत नेऊन डॉक्टरांनी वयानुसार जास्तीत जास्त डोस चालू ठेवला. शिवाय त्याच्या आईवडिलांनी मानसोपचार-तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्याला वागणुकीवरचे उपायही सुरू केले.
पालक आणि शाळा यांच्यात सुसंवाद असला तर वागणुकीची पथ्यं शाळेतही पाळता येतात. परीक्षेच्या वेळी पर्यवेक्षकांनी वेळेचं भान, प्रोत्साहन यांची जबाबदारी उचलली तर मोठीच मदत होते. चांचल्यदोषाच्या मुलांना मोठय़ा सरकारी हॉस्पिटलांकडून मंदग्रहणशक्ती (स्लो-लर्नर)चं सर्टिफिकेट मिळतं. ते दाखवलं तर बोर्डाच्या, विद्यापीठाच्या परीक्षांतही मदत आणि सवलती मिळतात.
त्या मुलांचा प्रत्येक गोष्टीबद्दलचा दृष्टिकोन खास असू शकतो. त्यांच्या आवडीचं काम मिळालं तर तिथे ती त्यांच्या वेगळेपणाचा आनंद अनुभवतात; मन लावून काम करतात; त्यांचं कौतुक होतं.
वासंतीचं कामात कौतुक व्हायला लागलं. ती गहिवरून म्हणाली, ‘‘डॉक्टरांचा सल्ला माझ्या लहानपणीच घेतला असता तर मला खूप फायदा झाला असता.’’ डॉक्टर म्हणाले, ‘‘जाग आली की त्या क्षणाला सूर्योदय म्हणावं आणि कामाला लागावं. दिवस सत्कारणी लागतो.’’ चांचल्याच्या भोवऱ्या-धबधब्यांत धडपडल्यावर आता वासंती-अनुजचं आयुष्य संथ नदीसारखं शांतपणे पुढे चाललं आहे.