अमोल परांजपे

मुंबईची संमिश्र संस्कृती १९६०च्या दशकात जशी होती तशी आता नाही, याचे कारण ‘१९९२’मध्ये शोधता येते..

Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
Journalist Limesh Kumar Jangam arrested for demanding ransom of five lakhs
चंद्रपूर : पत्रकार लिमेशकुमार जंगमला पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक
Why did Nitin Gadkari say that blockade the forest officials in Gadchiroli
“वनविभाग ‘झारीतील शुक्राचार्य’; त्यांच्या अधिकाऱ्यांना घेराव घाला”, नितीन गडकरी गडचिरोलीत असे का म्हणाले…

 ‘बदल ही जीवनातील एकमेव स्थिर घटना आहे,’ हा ग्रीक तत्त्ववेत्ता हेराक्लिटस यांचा सिद्धांत आपल्या शरीरातील पेशींपासून ब्रह्मांडापर्यंत प्रत्येक सजीव-निर्जीव वस्तूला लागू आहे. हे बदल कधी नैसर्गिक असतात तर कधी एखादी गोष्ट त्यासाठी उत्प्रेरकाचे काम करते. १९९२ साली अयोध्येमधील बाबरी मशीद पाडली गेली आणि आता तेथे राममंदिराची उभारणी सुरू आहे. ही तीन दशके देशामध्ये प्रचंड राजकीय, सामाजिक उलथापालथ झाली. देशाचे प्रतििबब समजली जाणारी मुंबई त्याला अपवाद नाही. पत्रकार जितेंद्र दीक्षित यांचे ‘बॉम्बे आफ्टर अयोध्या’ हे पुस्तक शहरातील या बदलांचा दस्तावेज ठरावा.

अमेरिकेतील गणितज्ञ एडवर्ड नॉर्टन लॉरेन्झ यांनी १९६०-७०च्या दशकात एक सिद्धांत मांडला होता. ‘एखाद्या फुलपाखराने पंख फडकविल्यामुळे त्यापासून कितीतरी दूर अंतरावर वावटळ निर्माण होऊ शकते,’ असे सांगणारा हा काल्पनिक सिद्धांत ‘बटरफ्लाय इफेक्ट’ म्हणून प्रसिद्ध आहे. याचा अर्थ इतकाच, की जगाच्या एका कोपऱ्यात घडणारी घटना दूरवर कुठेतरी मोठा बदल घडवू शकते. मुंबईपासून साधारणत: दीड हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या अयोध्या या पौराणिक शहरात ६ डिसेंबर १९९२ रोजी घडलेल्या बाबरी मशीद पतनामुळे आपला देश बदलला. त्याला मुंबई अर्थातच अपवाद नाही. दीक्षित यांनी हा बदल एका पत्रकाराच्या नजरेतून टिपला असल्यामुळे त्याला वेगळे महत्त्व आहे.

पुस्तकाचे नाव ‘बॉम्बे आफ्टर अयोध्या’ असले तरी या कथेची सुरुवात डिसेंबर १९९२च्या बरीच आधी होते. पहिल्या प्रकरणात ७०च्या दशकातील मुंबई, शिवसेनेचा उदय याचे वर्णन करताना दीक्षित यांनी हा इतिहास रटाळ होणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. आपल्या आजोबांनी एका स्थानिक शिवसेना नेत्याला (की गुंडाला?) कसा धडा शिकवला याची गोष्ट आहे. अर्थात, ही आपल्या आजोबांची गोष्ट आहे, हे लेखकाने सुरुवातीला सांगितलेले नाही. या छोटय़ाशा कथेमधून पुढे अयोध्येनंतरच्या घटनांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘शिवसेने’ची पायाभरणी कशी झाली असावी, हे दीक्षित सांगून जातात. पुढे शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात अत्यंत संवेदनशील अशा मस्जिदबंदर भागातील युसूफ मेहेरअली मार्गावर राहिल्यामुळे दीक्षित यांना अनेक घटनांचे साक्षीदार होता आले. मुंबईमध्ये ब्रिटिश राजवटीपासून हिंदू-मुस्लीम खटके उडत असले, तरी स्वातंत्र्यानंतर पहिला मोठा हिंसाचार झाला तो १९८९मध्ये. विशेष म्हणजे हा हिंसाचार हिंदू विरुद्ध मुस्लीम असा नव्हताच.. सलमान रश्दी यांच्या ‘द सेटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकाविरोधात मोहम्मद अली मार्गावर मुस्लिमांनी मोठा मोर्चा काढला. हा मोर्चा हिंदूंविरोधात नव्हे, तर रश्दी आणि त्यांना शरण देणाऱ्या ब्रिटनविरोधात होता. मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागले आणि त्यातून पोलीस-मोर्चेकरी यांच्यामध्ये मोठा संघर्ष उफाळून आला. हा मोर्चा हाताळताना पोलिसांकडून झालेल्या काही गंभीर चुकांमुळे हे घडल्याचे नंतरच्या तपासामध्ये निष्पन्न झाले असले तरी या घटनेने एक मोठा बदल घडविला. मुंबईतील मुस्लिमांच्या मनामध्ये पोलीस दलाबद्दल कटुता आणि अविश्वास निर्माण करण्याचे काम त्या दंगलीने केले. अयोध्येनंतर झालेल्या घटनांकडे बघताना ही पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे.

‘अयोध्या’ हा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचला तो १९९०च्या लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेनंतर. रथयात्रा मुंबईमध्ये आली तेव्हा तिचे झालेले स्वागत, अडवाणींच्या सभा, प्रमोद महाजन यांनी केलेली भाषणे याचे वर्णन तिसऱ्या प्रकरणात आहे. त्यानंतरचे चौथे प्रकरण हे खऱ्या अर्थाने या कहाणीची सुरुवात म्हणता येईल. त्यावेळी महाविद्यालयीन शिक्षण घेणारे दीक्षित हे अयोध्येतील बाबरी-पतनानंतर मुंबईत उसळलेल्या दंगलींचे प्रत्यक्ष साक्षीदार होतेच, पण पत्रकार म्हणून नंतरच्या काळात अनेक पोलीस अधिकारी, राजकीय नेते (यात खुद्द बाळासाहेब ठाकरे हेदेखील आले) यांच्याशी मारलेल्या गप्पांमधून समोर आलेले अनेक पैलू दीक्षित उलगडून दाखवतात. या डिसेंबर १९९२ आणि जानेवारी १९९३ मध्ये झालेल्या दंगलींमुळे मुंबईमध्ये हिंदू विरुद्ध मुस्लीम अशी कधीही न भरून येणारी दरी निर्माण केली, असे त्यांचे मत आहे. आजही हिंदू आणि मुस्लिमांचे व्यावसायिक संबंध असले, तरी एकमेकांबद्दल मनात संशय असण्याचे मुख्य कारण म्हणजे १९९२ची दंगल. या दंगलींमध्ये शिवसेनेचा असलेला सक्रिय सहभाग अधोरेखित झाला आणि भाजपच्या जोडीने हिंदूत्ववादाची शाल बाळासाहेब ठाकरे यांच्या या पक्षाने पांघरली, ती याच काळात. बाबरी पतन आणि जातीय दंगलींनंतर या कहाणीतील पुढला महत्त्वाचा अध्याय म्हणजे मुंबईवर झालेला पहिला मोठा दहशतवादी हल्ला. १२ मार्च १९९३चा काळा शुक्रवार.. शहरात तब्बल १२ मोक्याच्या ठिकाणी झालेल्या स्फोटांनी केवळ मुंबईच नव्हे, तर सगळा देश हादरला. दुबईमध्ये बसून दाऊद इब्राहिमने टायगर मेमन याच्याकरवी हा कट अमलात आणला. त्यानंतर सुरू झाला तो संघटित गुन्हेगारीचा काळ. त्यापूर्वी मुंबईमध्ये अनेक गुन्हेगारी टोळय़ा सक्रिय होत्या. मात्र या स्फोटाच्या खटल्यामुळे, त्यात संजय दत्तचे नाव आल्यामुळे, परविन बाबी यांनी लिहिलेल्या पत्रातील खबळजनक दाव्यांमुळे या टोळय़ांना ‘वलय’ प्राप्त झाले आणि ते पुढे अनेक वर्षे टिकले. पुस्तकातील एकूण तीन प्रकरणे ही अंडरवल्र्डचा उदयास्त, त्यामध्ये असलेली पोलिसांनी (विशेषत: दया नायक यांच्यासारख्या एन्काऊंटर स्पेशालिस्टनी) बजावलेली भूमिका यावर आहेत.

मुंबईचा चेहरामोहरा बदलत असताना अयोध्या, दंगली आणि बॉम्बस्फोटांमुळे आणखी एक मोठा बदल राज्यात घडत होता. तो आधी जाणवला नाही; पण १९९५च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आले आणि त्यावेळी राज्याच्या राजकारणाने एक नवे महत्त्वाचे वळण घेतल्याचे स्पष्ट झाले. दंगलींमुळे राज्यात घडलेल्या धार्मिक ध्रुवीकरणाचा हा अटळ परिणाम होता. या सरकारच्या काळात शहरात झालेला एक मोठा बदल म्हणजे नामांतर.. आतापर्यंत इंग्रजीमध्ये बॉम्बे आणि हिंदीमध्ये बम्बई अशी नावे सहज वापरली जायची. मात्र युती सरकारने शहराचे मुंबई असे अधिकृत नामांतर केले. दीक्षित यांनी या नामांतराची आपल्या पुस्तकात वेगळय़ा पद्धतीने दखल घेतली आहे. नामांतरापूर्वी शहराचा उल्लेख करताना त्यांनी (पुस्तक इंग्रजीत असल्यामुळे) बॉम्बे असा शब्दप्रयोग केला आहे, नंतर पुस्तकाच्या मजकुरात मात्र त्यांनी शहराचे ‘मुंबई’ हे अधिकृत नावच वापरले आहे.

बाळासाहेब ठाकरेंनंतर त्या काळात राज्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव असलेली दुसरी व्यक्ती म्हणजे प्रमोद महाजन. एक वेगळेच राजकीय रसायन असलेल्या महाजनांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे राजकारण आणि अखेर त्यांची झालेली हत्या यासाठी दीक्षित यांनी एक स्वतंत्र प्रकरण बहाल केले आहे. देशाचा पंतप्रधान होण्याची क्षमता असलेल्या या नेत्याची स्वत:च्या भावाकडून झालेली हत्या, त्यानंतर लढविले गेलेले तर्कवितर्क, अफवा, महाजनांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावर एकामागोमाग एक आलेली संकटे याची पत्रकाराच्या नजरेतून पुस्तकात करण्यात आलेली मांडणी चिंतनीय आहे.

मधली काही वर्षे शांततेत गेल्यानंतर २००२ साली देशात आणखी एक मोठी घटना घडली. गुजरातच्या गोध्रा येथे गाडीचा डबा पेटला/पेटवला गेला, त्यात जळालेले सारे मृतदेह कारसेवकांचेच असल्याचे गुजरातच्या राज्य सरकारने जाहीर केले आणि त्यातून गुजरातमध्ये प्रचंड मोठी जातीय दंगल झाली. त्यापैकी काही खटले आजतागायत या ना त्या स्वरूपात सुरू आहेत. त्या दंगलीची धग त्यावेळी संवेदनशील मुंबईला फारशी बसली नाही, हे खरे असले तरी त्यामुळे शहरात पुन्हा एकदा दहशतवादाने प्रवेश केला. बस, लोकलमधले स्फोट, टॅक्सी-स्कूटरमध्ये स्फोटके ठेवून घातपात, बस अपहरण अशा घटना घडत राहिल्या. यावर कळस चढविला तो २६/११च्या हल्ल्याने. पाकिस्तानातून आलेल्या दहा अतिरेक्यांनी तीन दिवस देशाची आर्थिक राजधानी वेठीस धरली. दीक्षित त्यावेळी प्रत्यक्ष मैदानात वार्ताकन करत असल्यामुळे अनेकांना ठाऊक नसलेल्या घटना, गोष्टी यांचे वर्णन या हल्ल्यावरील प्रकरणात आपल्याला वाचायला मिळते. मोहम्मद अजमल कसाब याला जिवंत पकडतानाचा थरार, पोलीस निरीक्षक संजय गोविलकर यांनी दाखविलेली समयसूचकता, तुकाराम ओंबळे यांचे बलिदान याचे वर्णन अंगावर काटा आणल्याशिवाय राहात नाही.

‘बॉम्बे आफ्टर अयोध्या’ची खासियत अशी की या पुस्तकात ‘क्रोनोलॉजी’ने घटना देणे दीक्षित यांनी टाळले आहे. एका विषयाला हात घातल्यानंतर त्यासंबंधित सर्व घटना ते देतात. उदाहरण द्यायचे तर शिवसेनेवरील प्रकरणामध्ये त्यांनी थेट २०२२च्या एकनाथ शिंदे यांच्या बंडापर्यंत पक्षाचा प्रवास रंगविला आहे. गुन्हेगारी आणि राजकारणासोबतच इतर अनेक घटनांचा हे शहर साक्षीदार राहिले आहे. देशातील सर्वात मोठी चित्रपटसृष्टी, अर्थात बॉलीवूडमधील घटना, आर्थिक गुन्हे, डान्सबार, लालबागचा राजा यांच्यासाठी स्वतंत्र प्रकरणे देताना दीक्षित यांनी या वैशिष्टय़ांचे मुंबईतील अढळ स्थान अधोरेखित केले आहे. २६ जुलै २००५च्या महापुराचा उल्लेख केल्याशिवाय शहराचा इतिहास लिहिलाच जाऊ शकत नाही.

मुंबईचा चेहरा कितीही बदलला, लोक बदलले, राहणीमान बदलले, राजकारण बदलले तरी या शहरातील एक गोष्ट अढळ आहे.. ती म्हणजे शहराचा मानवी चेहरा. दीक्षित यांनी पुस्तकाचा समारोपही याच ‘मुंबई स्पिरिट’च्या गुणगानाने होतो आणि आपणही शहराचा तीन दशकांचा इतिहासाचा शब्दपट ‘पाहिल्या’च्या समाधानाने पुस्तक बंद करतो!

‘बॉम्बे आफ्टर अयोध्या – अ सिटी इन फ्लक्स’

लेखक :  जितेंद्र दीक्षित

प्रकाशक :  हार्पर कॉलिन्स इंडिया

पृष्ठे : ३५६ ; किंमत :  ५९९ रुपये

amol.paranjpe@expressindia.com