रघु राय यांनी टिपलेल्या छायाचित्रांची पुस्तकं बरीच आहेत, पण रचना सिंह यांनी लिहिलेलं हे चरित्र मात्र या छायाचित्रकारामागच्या ‘दिव्यत्वाच्या प्रचीती’चा वेध घेणारं…

 ‘दर्शनहा भारतीय तत्त्वज्ञान, धर्म, भक्ती आणि लोकव्यवहाराच्या सर्व भल्याबुऱ्या आविष्कारांच्या लोकाभिमुखतेच्या चौकटींसाठी वापरलेला शब्द आहे. ‘पाहणे किंवा दिसणे’ या क्रियेची ही अभिव्यक्ती अगदी वैदिक काळातील ऋषींपासून ते अवकाश-संशोधकांपर्यंत आणि एखाद्या चित्रमहर्षीपासून ते सवंग रीलसंस्कृतीच्या शिलेदारांपर्यंत सर्वांच्या जाणिवांचा अवकाश व्यापून शंभर अंगुळे उरली आहे. ‘दिसणे’ या क्रियापदाचे भारतीय ज्ञानव्यवहार आणि लोकव्यवहारातील गहन-गंभीर अशा विश्वात्मक ज्ञानाचं दर्शन, एखाद्या विषयासंबंधीची अंतर्दृष्टी, आकलन, जाणवणं असे वेगवेगळे अर्थ आपल्या समाजात आहेत. मात्र ‘दर्शन’ या शब्दाचा अक्षरश: अर्थ ‘एखादी प्रतिमा/दृश्य डोळ्याला दिसणं त्याविषयी मेंदूला ज्ञान होतं त्याचा आपापल्या पद्धतीने अर्थ लावणं/लावता येणं’ हा आहे. ईश्वराच्या दर्शनानं जसा भाविकाला ईश्वरत्वाचा स्पर्श होतो अशी जाणीव सश्रद्ध समाजमनामध्ये असते, तशीच कुठल्याही चित्राची/घटनेचं दृश्यांकन करणारी प्रतिमा पाहून संबंधित घटनेचा मानवी मनाच्या पटलावर थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. लॉरेन्स बॅब या विख्यात मानववंशशास्त्रज्ञानं भारतीय लोकव्यवहारामध्ये ‘पाहणे’ या गोष्टीचं महत्त्व अधोरेखित करताना ‘दर्शन/पाहणे ही माणसाला बाह्यजगाशी जोडणारी (एक्स्ट्रुझिव्ह) अशी महत्त्वाची बाब आहे. या प्रक्रियेतून संबंधित माध्यम (उदा. मूर्ती, संकेत, चित्रप्रतिमा, दृक्- श्राव्यफीत), त्या माध्यमाचा वापर करणारा/पाहणारा आणि दृश्यसंदर्भचौकटीतील घटक एकमेकांच्या संपर्कात येतात आणि काही अर्थाने, संबंधित काळापुरते एकमेकांमध्ये मिसळतात व एकरूप होतात.’ असं म्हटलं आहे. यामुळेच मुद्रणकला, चित्राविष्कारांची उत्क्रांती हे विषय भारतीय लोकव्यवहाराच्या आणि संस्कृतिव्यवहाराच्या इतिहासाचं अविभाज्य अंग म्हणून अभ्यासावे लागतात.

वासाहतिक आधुनिकतेशी आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी ओळख झाल्यावर भारतीय उपखंडामधील राजकीय आणि आर्थिक गणितंच बदलली असं नाही; तर, उपखंडातील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक बाबींशी संबंधित जाणिवांच्या कक्षांचं स्वरूप बदलायला/ विस्तारायला या आधुनिकतेनं सर्वांनाच बेमालूमपणे भाग पडलं. या बदलत्या जाणिवांच्या कक्षा संबंधित क्षेत्रांतले पिढीजात अधिकार, सांस्कृतिक निर्बंध इत्यादी बाबींवर परिणाम करू लागल्याचं दिसून येऊ लागलं. यातून केवळ राजकीय जाणिवा, सामाजिक हक्कांची सार्वत्रिकता, कला, साहित्य ही क्षेत्रंच नव्हे तर त्यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक स्तरावरल्या आध्यात्मिक जाणिवादेखील या बदलत्या, व्यापक होत चाललेल्या कक्षांनी प्रभावित झालेले दिसतात. त्यातूनच विविध क्षेत्रांतील धुरीणांच्या त्यांच्या त्यांच्या क्षेत्रांतील जाणिवांप्रमाणेच कलाकारांच्या कलाविषयक जाणिवांची कक्षादेखील अनेक अंगांनी समोर येऊ लागली.

रघु राय हे आधुनिक किंवा उत्तराधुनिक त्यातही स्वातंत्र्योत्तरकालीन भारतीय समाज, राजकारण, इतिहास आणि संस्कृतीच्या विविध अंगांचे दृश्यआविष्करण करणारे अत्यंत महत्त्वाचे असे फोटोग्राफर. भारतीय फोटोग्राफी क्षेत्राचे ‘भीष्म पितामह’ असाही त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. अलीकडेच दिल्लीतील ‘हवाकाल प्रकाशना’तर्फे प्रकाशित झालेल्या, रचना सिंह या लेखिका-संपादिकेनं लिहिलेल्या ‘रघु राय: वेटिंग फॉर द डिव्हाइन’ या पुस्तकात या फोटोमहर्षीच्या आयुष्याचा परामर्श घेताना त्यांचं बालपण, त्यांनी समाजात वावरताना घेतलेले धडे, फोटोग्राफर म्हणून सुस्थापित झाल्यावरचे विविधांगी अनुभव, त्यांचा साक्षेप, वैयक्तिक आयुष्यातील तपशील आणि त्यांच्या सामाजिक- राजकीय- सांस्कृतिक आणि आध्यात्मिक धारणा-जाणिवा अशा विविधांगांचा तपशिलात्मक पट उभा केला आहे. हे तपशील आणि त्यांचे अर्थ समजून घेताना फोटोग्राफर आणि कलासक्त अशा रघु राय या माणसाची ‘दृष्टी’ कोणकोणत्या अंगाने, कसकशी ‘उन्नत’ आणि तीक्ष्ण होत गेली हे लेखिकेनं हृद्या शैलीत वाचकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहे. ‘रघु राय: अॅन अनफ्रेम्ड पोर्ट्रेट’ या नावाने राय यांच्याच मुलीनं निर्मिती केलेला माहितीपट पाहून लेखिकेला हे चरित्र लिहिण्याची प्रेरणा मिळाली. स्वतंत्र भारताच्या सुमारे आठ दशकांच्या इतिहासातली जवळपास सहा दशकं आपल्या कॅमेऱ्यातून राजकारण, कला, साहित्य, व्यापार-उद्याोग यांसारख्या क्षेत्रांतील सुखद, दु:खद अशा-देशाला बदलून टाकणाऱ्या घटना, व्यक्ती त्यांच्या विविध आयामांसहित टिपणाऱ्या या माणसानं दृश्यमाध्यमांतलं आपलं कसब वापरून एक प्रकारे आधुनिक भारताचा दृश्य-इतिहास सर्वांसाठी खुल्या माध्यमातून उभा केला आहे. भारतीय भूभागाच्या इतिहासाच्या विविध अंगांचं प्रत्ययकारी चित्रण करणारा दस्तावेज निर्माण करणाऱ्या या महनीय व्यक्तीचं हे चरित्र वाचताना राय यांचा व्यक्तिगत इतिहास पाहणं लेखिकेला महत्त्वाचं वाटतं.

या व्यक्तिगत इतिहासाद्वारे रघु राय यांच्यासारख्या मनस्वी कलाकाराचं अंतरंग उलगडण्याची ही प्रक्रिया लेखिकेनं त्यांच्या सश्रद्ध जाणिवांच्या चित्रणातून केली आहे. मूळचे नास्तिक किंवा बुद्धिप्रामाण्यवादी असल्याचं सांगणाऱ्या राय यांच्या आयुष्यात त्यांचे आध्यात्मिक गुरू आले आणि त्यांच्याद्वारे मिळालेल्या पारलौकिक ‘अनुभव’ किंवा ‘प्रचीती’नंतर ते निस्सीम सश्रद्ध झाल्याचं राय यांच्या हवाल्यानं लेखिका मांडते. जगभर वावर असलेल्या, जगातील अनेक भीषण समस्या, घटनांचे प्रत्ययकारी अनुभव घेतलेल्या या कलाकाराला त्याच्या सामाजिक-राजकीय जाणिवा आणि त्यांना त्यांच्या गुरूकडून आलेले विविध अतींद्रिय अनुभव किंवा त्यातून घडलेल्या पारलौकिक जाणिवा यांची सुसंगती राखण्यात फारशी अडचण येत नाही, असं या भागात वाचकाला सांगितलं जातं. पुस्तकाच्या ‘वेटिंग फॉर द डिव्हाइन’ या उपशीर्षकाशी अनेक अंगांनी सुसंगत अशा या तपशिलात्मक चित्रणातून पुढे जात राय यांचं बालपण, त्यांचं तारुण्य इत्यादी बाबींचा परामर्श लेखिका घेते. ते तपशील राय यांच्या कामाचे चाहते असलेल्या वाचकांना आवडतील असेच आहेत.

राय यांचा जन्म फाळणीपूर्व भारतातल्या, त्यातही आज पाकिस्तानात गेलेल्या ‘झंग’ या पंजाबातील गावातला. फाळणीच्या दु:खद स्मृतींचं गाठोडं घेऊन भारतात आलेल्या अनेक व्यक्तींनी भारतीय कलाक्षेत्रात मोलाची भर घातली आहे. रघु राय यांच्या दृश्यकलाक्षेत्रामध्येच थोड्या वेगळ्या अंगानं काम करणाऱ्या ज्येष्ठ चित्रकार, शिल्पकार, वास्तुरचनाकार आणि लेखक म्हणून ख्यातकीर्त असलेल्या सतीश गुजराल यांची आणि त्यांच्या कलेची आठवण होणं अगदी स्वाभाविक आहे. गुजराल यांच्या कलेमध्ये फाळणीच्या दु:खद स्मृतींतून रुजलेल्या व्यक्तिगत आणि सामूहिक वेदना, कणव आणि चिंतन यांचं दर्शन होतं. याच जाणिवांतून जागतिक पातळीवर सर्व राष्ट्रसमूहांची मानवी हक्क आणि पर्यावरणाशी बांधिलकी असणारी एक सामायिक संविधानात्मक चौकट असावी या हेतूनं गुजराल यांनी वैश्विक संविधान आणि वैश्विक संसद आकाराला आणण्यात अनमोल भूमिका बजावली. त्याच जाणिवेतून रघु राय यांनी १९८४ सालच्या भीषण ‘भोपाळ वायू दुर्घटने’चं केलेलं छायाचित्रीकरण जगभर प्रसृत झालं आणि त्याच अंगानं ‘ग्रीनपीस’ या जागतिक स्तरावर काम करणाऱ्या संस्थेद्वारे यासंबंधी माहितीपट बनवून याविषयी जागृती निर्माण करण्याचं काम करण्यात आलं. हिंसा आणि सामूहिक संघर्ष यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या बहुसंख्य मंडळींनी जुन्या कटू स्मृती बाजूला सारून आपल्या अंगभूत कलेद्वारे संवेदनशीलतेचं प्रकटन करणं हे त्यांच्या कलेला निराळी उंची मिळवून देतं, हे अशा उदाहरणांतून दिसून येतं.

राय यांच्या गुरूंशी असलेल्या संबंधांप्रमाणेच त्यांचा मदर तेरेसा आणि तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्याशी आलेल्या संबंधांविषयी दोन प्रकरणं वाचायला मिळतात. त्यांच्याकडून राय यांना झालेला विविधांगी ‘बोध’ याविषयीची माहिती राय यांच्या व्यक्तित्वातील भाविक अंगाची त्याच्याशी सुसंगत असलेल्या त्यांच्या कलात्मक ‘स्व’ची सामाजिक- आध्यात्मिक (सोशिओ-स्पिरिच्युअल) बाजू समोर आणते. ५५ वर्षांहून अधिक सक्रिय व्यावसायिक आयुष्यात राय यांचा इंदिरा गांधी, सत्यजित रे, एम. एफ. हुसेन, शबाना आझमी, मल्लिकार्जुन मन्सूर, आंरी (हेन्री) कार्तिए-ब्रेसाँ, अमृता प्रीतम, संगीत क्षेत्रात भीमसेन जोशी, बिस्मिल्ला खान यांसारख्या महनीय व्यक्तित्वांशी व्यावसायिक आणि व्यक्तिगत संबंध आला. या साऱ्या व्यक्तींचं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात असलेलं वलय राय यांना कसं जाणवलं हे आपल्याला एरवी त्यांच्या चित्रांतून समजलेलंच होतं. मात्र लेखिकेनं रघु राय यांच्या शब्दांत यांपैकी अनेक भेटी, राय यांची त्यांच्याविषयी मतं समोर आणली आहेत. ही मतं वाचकांपुढे आणताना राय संबंधित व्यक्तींना आणि त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाला समकालीन सांस्कृतिक, राजकीय संदर्भात कसं स्थापित करतात हे लेखिकेनं उत्कृष्टरीत्या दाखवलं आहे. राय यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या घटस्फोटासारख्या बाबी, त्यांच्या सध्याच्या कुटुंबाविषयीच्या त्यांच्या जाणिवा, त्यांच्या मुलीनं चोखाळलेली त्यांचीच वाट याविषयीचे तपशीलदेखील वाचनीय आहेत. फोटो-जर्नलिस्ट किंवा छायाचित्र-पत्रकारिता क्षेत्रात असल्यानेच सईद नक्वी आणि अन्य पत्रकार मंडळींशी असलेले त्यांचे मैत्रीसंबंधदेखील खुसखुशीत रीतीनं शब्दांकित केलेले आहेत.

अगदी अलीकडेपर्यंत, बरीच वर्षे रघु राय यांच्याविषयीच्या माझ्या (प्रस्तुत लेखाचा लेखक) स्मृती त्यांच्या भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, बिस्मिल्ला खान, गुलजार इत्यादी कलाकार किंवा इंदिराबाईंसारख्या राजकारण्यांची छायाचित्रे टिपणारा छायाचित्रकार अशी होती. भोपाळ दुर्घटनेच्या त्यांनी काढलेल्या छायाचित्रांतून त्यांच्यातला शूर आणि कर्तव्यतत्पर फोटो-जर्नलिस्टदेखील माहिती होता. ही ओळख पुष्कळ अंशी पांढरपेशी आणि त्यांच्या फोटोंतून दिसणाऱ्या मोठाल्या व्यक्तित्वांच्या भोवती केंद्रित झालेली होती. लेखिकेनं दिलेल्या तपशिलांमधून राय यांच्या व्यक्तित्वाचे (त्यांच्या तोडीच्या कलाकारासाठी फार अभिनव, वेगळे नसले तरी) महत्त्वाचे पैलू अनेकांना या पुस्तकातून मिळू शकतील, ही या पुस्तकाची (उत्कृष्ट शब्दांकनासोबतची) जमेची बाजू आहे. स्वत: राय यांनी अनेक ठिकाणी ‘अमुक तपशील माझ्या व्यक्तित्वाचं चपखल चित्रण करणारा आहे, अमुक परिच्छेदात माझ्या स्वभावाचा अर्क नेमकेपणाने उतरला आहे’ आशा शब्दांत लेखिकेचं केलेलं कौतुक राय यांच्या चाहत्या-वाचकांना आनंद देऊन जाऊ शकतं.

मात्र फोटोग्राफी ही कला, जागतिक परिप्रेक्ष्यात राय यांच्या कलेचं औचित्य इत्यादी बाबींची चर्चा या चरित्रात दिसत नाही. अर्थात्, हे राय यांचं चिकित्सक चरित्र नाही. (त्यांच्यावर त्यांच्या मुलीनं केलेल्या माहितीपटापासून लेखन प्रेरणा मिळाल्यावर हा ग्रंथ लेखिकेनं लिहायला घेतला, हे वर नमूद केलं आहेच.) पण राय यांच्या फोटोग्राफीची अगदी काटेकोर समीक्षा/चिकित्सा नाही तरी त्यांच्या कलाकार म्हणून भूमिका, जाणिवा, कलात्मक आकलन यांविषयी लेखिका फार लिहीत नाही. एकुणात भारतीय समाजात, कलाविश्वात व्यक्तिगत इतिहास मांडण्याची एक पूर्वापार, काहीशी साचेबद्ध अशी पद्धत आहे. या पद्धतीतून समोर येणारा संबंधित व्यक्तीचा/व्यक्तिसमूहाचा इतिहास सांस्कृतिक-राजकीय गौरवीकरण/विरोध यांभोवती केंद्रित आहे. महनीय व्यक्तींचं चिकित्सक अंगानं चरित्रलेखन करण्याची रीत पाश्चात्त्य देशांमध्ये पुरेशी रुजली आहे. भारतातील अभ्यासविश्वातदेखील व्यक्तिगत इतिहास (पर्सनल हिस्टरी) या इतिहासलेखनाच्या उपशाखेच्या अंगानं इतिहास लिहिण्याची पद्धत अजूनही रूढ नाही. रघु राय किंवा त्यांच्यासारखे दिग्गज कलाकार आपल्या कलाकृतींतून आणि कलेव्यतिरिक्त अन्य सार्वजनिक कृतींतून त्यांना आकळलेल्या वर्तमानावर कळत-नकळत भाष्य करत असतात आणि समकालीन घटनांचा इतिहास किंवा कोश (आर्काइव्ह्ज) निर्माण करून ठेवत असतात. रचना सिंह यांनी तसा प्रयत्न केल्याचं या पुस्तकात फारसं जाणवत नसलं तरी, भारतीय लेखकांनी चिकित्सक चरित्रं लिहिण्याची रीत सुरू करून ती रुजवायला हवी हे यानिमित्तानं मांडणं सयुक्तिक ठरेल. चिकित्सक चरित्रं ही या महनीय कलाकारांवर टीका नसतात, उलट अशा चरित्रांतून संबंधित व्यक्तित्वांच्या कामाचं औचित्य संबंधित समकालात मांडून ही व्यक्तित्वं समकालाचं प्रॉडक्ट म्हणून समोर आणली जातात आणि केवळ कलाविषयकच नव्हे तर मानव्यविषयक जाणिवा अधिक उन्नत आणि प्रगल्भ होण्यात अशी चरित्रं महत्त्वाची भूमिका बजावतात.

रघु राय : वेटिंग फॉर द डिव्हाइन

लेखिका : रचना सिंह

प्रकाशक : हवाकाल पब्लिशर्स प्रा. लि.

पृष्ठे : २६० किंमत : ७५० रु.

rajopadhyehemant@gmail.com