दक्षिण अमेरिकी लेखक अमेरिकेत भाषांतरित होऊन मोठ्या प्रमाणात जगभर लोकप्रिय होण्यास दोन हजारोत्तर कालावधी उजाडावा लागला. मार्खेज, बोर्हेस, रॉबर्तो बोलानो, इसाबेल अलांदे, आलेहांद्रो झाम्ब्रा ही नावे माहिती असणाऱ्यांना त्यांच्या लिखाणात येणारे पुस्तकप्रेमाचे, वाचनाचे, पुस्तक खरेदीचे उल्लेखही माहिती असतात. काय वाचतात ते इतके? आणि किती वाचतात? याचे एक उत्तर ब्यूनोस आयरेस शहरातील एका दुकानाकडे पाहून मिळू शकेल.
शंभर वर्षांपूर्वी युरोपीय देशांमध्ये जशी भव्य ‘ऑपेरा हाउस’ उभारली जात, तसे अर्जेंटिनाच्या या राजधानीतही होते… त्या अख्ख्या ऑपेरा हाउसभर पुस्तकांचे दुकान थाटण्यात आले. त्यासाठी त्याच्या वास्तूमध्ये काही बदल करण्यात आले. आता या ऑपेरा हाउसच्या (एके काळच्या) मंचावर कॉफी पिता पिता पुस्तकांचा आस्वाद घेता येतो (रंगमंचाबाहेर मात्र कॉफी नाही- कैक हजार पुस्तकेच). या शहरात देशी आणि विदेशी पुस्तकांची तिथल्या नागरिकांची भूकच अशा प्रकारच्या पुस्तकालयाची निर्मिती करू देऊ शकते. ‘अल अॅटेनो ग्रॅण्ड स्प्लेण्डिड’ हे या दुकानाचे नाव. देशातील लोकांची ग्रंथगरज पुरवताना ते आता इथले एक पर्यटन केंद्र म्हणूनदेखील विकसित झाले आहे. तरीही जगातल्या सर्वात सुंदर पुस्तक दुकानाच्या गणतीत ते दुसऱ्याच स्थानावर आहे (पहिल्या क्रमांकाबद्दल पुढील आठवड्यात). या दुकानाच्या भरपूर लघुचित्रफिती आहेत. दोन महिन्यांपूर्वी यूट्यूबवर अपलोड झालेले थोड्या अधिक काळाचे पर्यटन येथे पाहता येईल.
https://tinyurl.com/2mea9ear