scorecardresearch

Premium

बुकबातमी: ‘जेसीबी प्राइझ’साठी यादी जाहीर

हिंदी लेखक मात्र दोघे आहेत. दोघांचाही महाराष्ट्राशी संबंध होता वा आहे, हे विशेष.

book
बुकबातमी: ‘जेसीबी प्राइझ’साठी यादी जाहीर ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

बुलडोझर बाबा-मामांचा उदय होण्यापूर्वी- म्हणजे २०१७ मध्येच भारतीय लेखकांच्या इंग्रजी (मूळ अथवा अनुवादित) ललित पुस्तकांसाठी ‘जेसीबी प्राइझ’ची जुळवाजुळव सुरू झाली आणि प्रत्यक्षात पहिलं ‘जेसीबी प्राइझ’ २०१८ च्या नोव्हेंबरात देण्यात आलं.. २५ लाख रुपये आणि मानचिन्ह असा हा पुरस्कार. त्यासाठी (‘बुकर’प्रमाणेच) आधी १० पुस्तकांची यादी, मग चार-पाच पुस्तकांची लघुयादी जाहीर होते. यंदा १० पुस्तकांची दीर्घयादी गेल्या महिन्यातच जाहीर झाली. त्यापैकी चार पुस्तकं अनुवादित असली, तरी मराठीतून इंग्रजीत गेलेलं पुस्तक एकही नाही.

हिंदी लेखक मात्र दोघे आहेत. दोघांचाही महाराष्ट्राशी संबंध होता वा आहे, हे विशेष. गीत चतुर्वेदी यांनी मुंबईजवळच्या शहाड- मोहने- गाळेगाव परिसरात उमेदीचा काळ घालवला. ‘जेसीबी प्राइझ’च्या दीर्घयादीत त्यांची ‘सिमसिम’ ही – हिंदीतही त्याच नावानं आलेली  कादंबरी आहे. या कादंबरीला आंतरराष्ट्रीय ‘पेन ट्रान्स्लेशन अ‍ॅवॉर्ड’ आधीच मिळालेल्या असल्यामुळे अनिता गोपालन यांनी ती इंग्रजीत आणली. हिंदीतल्या ‘काले अध्याय’चे मूळ लेखक मनोज रुपडा हे नागपूरचे. मुंबईतही दादर परिसरात ते काही काळ राहात होते. ‘काले अध्याय’चा अनुवाद हंसदा सौमेन्द्र शेखर (‘आदिवासी विल नॉट डान्स’चे लेखक) यांनी ‘आय नेम्ड माय सिस्टर सायलेन्स’ या नावानं केला असून हे पुस्तक दीर्घयादीत आहे.

sanjay raut slams devendra fadnavis (1)
“मनोज जरांगेंचा बोलविता धनी कोण हे फडणवीसांना माहीत नसेल तर..”, संजय राऊत यांची टीका
rahul narvekar
राष्ट्रवादी पक्षफुटीच्या निर्णयावर राहुल नार्वेकरांचं महत्त्वाचं भाष्य; म्हणाले, “मी कोणाच्या…”
Rashmi Shukla letter to Maharashtra
Rashmi Shukla :”जनतेचा पोलीस दलावरचा विश्वास कमी झाला आहे, पण..”, रश्मी शुक्लांचं जनतेला पत्र
Sharad Pawar
‘थकणार नाही, झुकणार नाही, कुणाला सांगताय म्हातारा झालोय’, राष्ट्रवादीने पोस्ट केला शरद पवारांचा ‘तो’ व्हिडीओ

मनोरंजन ब्यापारी हे बंगालीतले महत्त्वाचे दलित लेखक. त्यांचं ‘नेमेसिस’ हे पुस्तक त्यांनी लिहिलेल्या ‘चंडाल पुस्तकत्रयी’मधल्या दुसऱ्या पुस्तकाचा अनुवाद. त्यांच्याच याआधीच्या पुस्तकाचाही अनुवाद जेसीबी लघुयादीपर्यंत (२०१९ मध्ये) पोहोचला होता. यंदा ‘नेमेसिस’ दीर्घयादीत तरी आहे. गाजलेले तमिळ लेखक पेरुमल मुरुगन यांनीही याआधी (२०१८) लघुयादीत स्थान मिळवलं होतं, त्यांच्या ‘आळंदपाची’ या तमिळ कादंबरीचा ‘द फायर बर्ड’ हा जननी कण्णन यांनी केलेला अनुवाद यंदा दीर्घयादीत आहे.

तिघा लेखकांच्या पहिल्याच कादंबऱ्या दीर्घयादीत आहेत. यापैकी तेजस्विनी आपटे- राह्म यांच्या ‘द सीक्रेट ऑफ मोअर’चा परिचय ‘बुकमार्क’च्या वाचकांना प्रसाद मोकाशी यांनी (७ जानेवारी २०२३च्या अंकात) करून दिला होता. ‘द ईस्ट इंडियन’ ही ब्रिन्दा चारी यांची कादंबरी, तसंच बिक्रम शर्मा यांची ‘द कॉलनी ऑफ श्ॉडोज’ ही कादंबरी यंदा दीर्घयादीत असून दोघांची ही पहिलीच पुस्तकं आहेत.

तनुज सोळंकी हेही तरुण लेखक. २०१९ मध्ये साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळवणारे. तो ‘दिवाली इन मुजफ्फरनगर’ या पुस्तकाला मिळाला होता, त्याआधीच २०१८ मध्ये ‘ द मशीन इज लर्निग’ ही त्यांची कादंबरी ‘जेसीबी प्राइझ’च्या दीर्घयादीत होती, लघुयादीत नाही. आता  त्यांचीच ‘मांझीज् माय्हेम’ ही तरी लघुयादीत येईल का? किंवा जॅनिस पॅरिया या मेघालयातल्या कवयित्री. त्यांचं ‘एव्हरीथिंग द लाइट टचेस’ हे चार जणांची समांतर आयुष्यं मांडणारं पुस्तक लघुयादीपर्यंत जाईल का? विक्रमजीत राम यांची ‘मन्सूर’ ही कादंबरी मुघलकाळातल्या एका चित्रकाराची गोष्ट..  बेगम नूरजहाँच्या चित्राचा अवघड प्रवासाच्या या कादंबरीचा लघुयादीपर्यंतचा प्रवास तरी सुकर होईल का? – या प्रश्नांची उत्तर आणखी एक शनिवार सोडून त्यापुढल्या शुक्रवारी मिळणारच आहेत. तोवर वाट पाहूच, पण ‘बुकर’प्रमाणे याही ग्रंथ-पारितोषिकाच्या लघुयादीतल्या पुस्तकांची ओळख ‘बुकमार्क’नं करून द्यावी असं किती जणांना वाटतंय, हे ‘लोकसत्ता’कडे आलेल्या प्रतिसादावरून ठरेल!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Booknews list announced for jcb prize amy

First published on: 07-10-2023 at 00:24 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×