‘बुक्स ऑन बुक्स’ या प्रकारात मराठी लेखकांनी गेल्या दोन दशकांत सर्वाधिक भर पाडली. त्यांत जगभरातील पुस्तकवेड अंगी बाणवलेल्या अभिजात-समकालीन पुस्तके येतात. इंग्रजी पुस्तकांत त्यांहून अद्यायावत असलेली अन् या प्रकारातील ताजी कोणती, हे सांगणारे हे सुझन कोल यांचे टिपण. सहा कादंबऱ्या गाठीशी असलेल्या आणि पुस्तकांच्या दुकानात काम करण्याचा भरघोस अनुभव असलेल्या सुझन कोल यांची सर्वाधिक ओळखीची कादंबरी ‘बुकिश पीपल’ ही २०२२ सालची. त्यात पुस्तकांच्या दुकान मालकिणीच्या नजरेतून ग्रंथविश्व मांडले आहे. तर लिंक दिलेल्या या टिपणात नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘सर्व्हिस’ या पुस्तक दुकानातील कर्मचाऱ्याचे निवेदन असलेल्या ग्रंथासह आणखी कादंबऱ्यांची ओळख आहे. पुस्तकवेड्यांना वाचनदुवे कमीच पडतात. तर त्यांना भरपूर काळ व्यग्र ठेवू शकणाऱ्या या निवडी येथे वाचता येतील.
https://tinyurl.com/3w6jpwxy
शेक्सपिअर महोत्सव…
विल्यम शेक्सपिअर याच्या नावाने गेली नव्वद वर्षे जॅक्सन कण्ट्री ऑरेगॉन येथे महोत्सव भरवला जातो. खुद्द ब्रिटनमधील नवी पिढी या अभिजात नाटककाराच्या प्रभावाला निवृत्त करण्याच्या मानसिकतेत असताना अमेरिकेत मात्र या लेखकाची भक्तिभावाने पूजा साजरी करण्यासाठी हा महोत्सव म्हणजे सु-योग असतो. तर या महोत्सवाच्या प्रत्येक दिवशी काय होते, याचा हा वृत्तान्त मांडणारा लेख पॅरिस रिव्ह्यूच्या डेली ब्लॉगवर सादर झालाय. आपल्याकडेदेखील ‘लाडके व्यक्तिमत्त्व’ पु. ल. देशपांडे यांची भक्तिभावाची आवर्तने गिरवणारी शेवटची पिढी नव्वदोत्तरीनंतर कमी कमी होत चाललीय, हे भले की बुरे, हा प्रश्न सदरहू लेख वाचून पडूही शकेल.
https://tinyurl.com/5n7b3j6p
जेन ऑस्टिनचे महागडे पत्र…
जेन ऑस्टिन हिच्या अडीचशेव्या जन्मशताब्दीनिमित्ताने वर्षभर लेख-चित्रपट-पुस्तके आणि चरित्रांचा पाऊस पडत असताना ‘सदबीज’ या प्रख्यात ब्रिटिश लिलाव संस्थेच्या संकेतस्थळावर ऑक्टोबर महिन्याचा पंधरवडा हा जेन ऑस्टिनच्या हस्ताक्षरातील पत्राच्या विक्रीसाठी सादर करण्यात आला आहे. जेन आणि तिच्या बहिणीमध्ये लेखन कारकीर्दीत तीन हजार पत्रांचे आदान-प्रदान झाले. ऑस्टिनच्या मृत्यूनंतर तिच्या बहिणीने बहुतांश पत्रे जाळून टाकली. मात्र त्यातली १६१ पत्रे आगीपासून बचावली. त्यातीलच एक पत्र- ज्यात कौटुंबिक आणि तत्कालीन सामाजिक व्यवहाराचे तपशील आहेत, ते खासगी संग्रहकाकडून लिलावासाठी उपलब्ध झाले. तीन ते चार लाख डॉलर (सुमारे दोन कोटी ६४ लाख ८० हजार रु. ते तीन कोटी ६३ लाख ८०० रुपये) इतक्या किमतीपासून होणारा लिलावथांबा नंतर बातम्यांचा विषय असेल. तूर्त त्या पत्रातला मसुदा मोफत ‘स्मिथसोनियन’ नियतकालिकाच्या या वृत्तात वाचता येईल.
https://tinyurl.com/5dd6nah3