मागचे कित्येक आठवडे आपण रोममध्ये घालवले. पार त्या रोमुलसपासून सुरुवात करून पोप ग्रेगरी तेरावे यांच्यापर्यंतचा प्रवास पाहिला. त्याचे काही अध्याय बाकी आहेत अजून. पण आज एक वेगळा विषय.
आजची दिनदर्शिका पाहा. त्यात ‘अगस्ती दर्शन’ असा उल्लेख आढळेल. कुठे आहे हे अगस्तीचं देऊळ? आणि त्याचं दर्शन आजच का घ्यायचं?
अगस्तीचं देऊळ कुठे आहे काही कल्पना नाही. पण दिनदर्शिकेत ‘अगस्ती दर्शन’ म्हणून जो उल्लेख आहे ते आहे ‘अगस्ती’ या ताऱ्याचं दर्शन. तेव्हा, हे अगस्ती दर्शन खुल्या आकाशात करायचं. इंग्रजीत या ताऱ्याला ‘कॅनोपस’ असं म्हणतात. करिना तारकासमूहात हा तारा मोडतो.
पण ताऱ्याचं दर्शन घ्यायचं तर त्यासाठी आकाश कसं पाहायचं हे जाणून घेणं गरजेचं. ‘आकाश कसं पाहायचं’ असं म्हटलं आहे. कारण कोणतीही गोष्ट ‘दिसणं’ आणि ती ‘पाहणं’ यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. ‘दिसणं’ म्हणजे फक्त नजरेला पडणं. आणि हेच ‘पाहणं’ ही जाणीवपूर्वक केलेली कृती आहे.
सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. आणि चंद्र? तोदेखील पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेलाच मावळतो. आणि बाकीचे तारे? त्यांचा प्रवासदेखील पूर्वेकडून पश्चिमेकडे असाच होतो. का? कारण पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते! साहजिकच, बाकी समस्त खगोलांचा प्रवास पूर्वेकडून पश्चिमेकडे! अर्थात, याला एक अपवाद आहे — ध्रुव तारा. हा मात्र कायम उत्तर दिशेलाच दिसतो. असो.
आता ‘अगस्ती’ या ताऱ्याविषयी. आपल्याला दिसणाऱ्या ताऱ्यांपैकी हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात तेजस्वी तारा. तसं पाहिलं तर हा तारा सूर्यापेक्षा दहा हजार पट अधिक प्रखर आहे. अशा प्रचंड प्रखर ताऱ्यांना इंग्रजीत ‘सुपरजायंट’ म्हणतात. पण हा आहे पृथ्वीपासून सुमारे ३१० प्रकाशवर्ष अंतरावर. सूर्य याच्याइतका प्रखर नाही. पण आहे अवघी ८ प्रकाशमिनिटं एवढ्या अंतरावर. त्यामुळे इतका प्रखर असूनदेखील सूर्यापुढे अगस्ती हा अगदीच काजवा ठरतो आणि दिवसा दिसू शकत नाही.
महाराष्ट्रातलं (किंवा खरं तर, भारतातलं) कुठलंही गाव घ्या. त्याच्या आकाशात वर्षाच्या कुठल्याही दिवसात अगस्ती तारा असतोच असतो. पण दररोज तो दिसेल याची मात्र खात्री नाही. का? तो रात्रीच्या वेळेस आकाशात असला तर दिसणार. दिवसा दिसणारा तारा एकच – सूर्य!
हा तारा खूप दक्षिणेकडे कललेला आहे. रोज तो साधारण आग्नेय दिशेला उगवतो आणि साधारण र्नैऋत्य दिशेला मावळतो — हा प्रवासदेखील पूर्वेकडून पश्चिमेकडे असाच आहे! पृथ्वीवरून पाहताना सूर्याची गती अगस्तीच्या गतीपेक्षा कमी आहे. त्यामुळे सूर्य रोज थोडा-थोडा उशिरा उगवतो. कालपर्यंत अगस्ती उगवायचा त्याच्या आधीच सूर्य उगवलेला असे. किंवा साधारण त्याच सुमारास सूर्योदय होई. पण आज मात्र अगस्ती उगवला तरी सूर्य उगवलेला नसेल. थोडक्यात, या पुढच्या काही दिवसांत सूर्योदयापूर्वी काही काळ आग्नेय दिशेला क्षितिजाच्या अगदी जवळ अगस्तीचा हा तेज:पुंज तारा दिसू लागेल. हेच ते अगस्ती दर्शन.
जसजसे दिवस पुढे सरकतील तसतसा हा अधिकाधिक लवकर उगवू लागेल. काही दिवसांनंतर इथे सूर्य मावळला आणि तिथे अगस्ती उगवला असं होऊ लागेल. त्याच्याही नंतर दिवसा कधीतरी अगस्ती उगवेल. ते अर्थातच दिसणार नाही. पण सूर्यास्ताच्या वेळी तो दक्षिण दिशेच्या आसपास दिसू लागेल. आणि र्नैऋत्येकडे प्रवास करून तो मावळेल. मे महिन्याच्या साधारण पंधरा तारखेपर्यंत सूर्यास्ताच्या सुमारास तो र्नैऋत्य क्षितिजाजवळ असेल. म्हणजे सूर्य मावळेल तेव्हा संधिप्रकाशात र्नैऋत्य दिशेला क्षितिजाच्या अगदी जवळ अगस्ती दिसेल आणि सूर्यास्तानंतर काही काळातच तोही मावळेल. या घटनेला ‘अगस्ती लोप’ असं म्हणतात.
आणि त्याच्यापुढे? त्याच्यापुढे अगस्तीचा आकाशातला सगळा प्रवास सूर्य आकाशात असतानाच होईल. अर्थात, अगस्ती अजिबात दिसणार नाही. ते पुन्हा असंच चालू राहील साधारण ऑगस्ट महिन्याच्या १० तारखेपर्यंत.
आता या सगळ्या गोष्टींचा ‘काळाचे गणित’ सोडवताना कसा वापर केला आहे पाहा. अगस्ती दर्शन झालं म्हणजे समुद्र नौकानयनाला अनुकूल झाला आणि हेच अगस्तीचा लोप झाला म्हणजे नौकानयन टाळणं हिताचं असा ठोकताळा शतकानुशतकं वापरात आहे. किती सोपं आहे पाहा सगळं. कॅलेंडरं नकोत, महिने नकोत आणि कुठलं किचकट गणित नको. नुसत्या डोळ्यांना पहाटे आग्नेय दिशेला अगस्तीचा तारा दिसू लागला, हाकारा जहाजं. हेच, सूर्यास्ताच्या आसपास अगस्तीही अस्त पावला, घ्या होड्या बंदरात!
केवळ निरीक्षणशक्तीचा वापर करून कोणत्याही बाह्य साधनांशिवाय, कोणत्याही तंत्रज्ञानाशिवाय आपल्या पूर्वजांनी किचकट ‘काळाचे गणित’ किती सोप्या पद्धतीने सोडवलं होतं पाहा. विश्व अफाट आहेच पण मानवी बुद्धी आणि प्रतिभा या विश्वालाही गवसणी घालते ती ही अशी.