हरदीप सिंग निज्जरया खलिस्तानवादी नेत्याच्या गतसाली कॅनडात झालेल्या खूनप्रकरणी कॅनडातील तपास यंत्रणांनी चौथ्या भारतीय नागरिकाला अटक केल्याचे नुकतेच जाहीर केले. खलिस्तानवाद्यांचा प्राध्यान्याने कॅनडा आणि काही प्रमाणात अमेरिकेतील वावर आणि त्यांच्या मागावर असलेल्या भारतीय गुप्तहेरांच्या कथित कारवायांविषयी बातम्यांचे प्रतिबिंब भारत व कॅनडा आणि भारत व अमेरिका यांतील संबंधांवर उमटू लागले आहे. यातही कॅनडाच्या बाबतीत परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आहे. त्या देशाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी गेल्या वर्षी या मुद्द्यावरून थेट भारतीयांचे नाव घेऊन खळबळ उडवून दिली होती. ट्रुडो अगदी अलीकडेच याविषयी पुन्हा बोलते झाले. त्यांच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही, हे त्यांच्या विधानांवरून स्पष्ट होते. कॅनडात निज्जरची हत्या किंवा तिकडे अमेरिकेत गुरपतवंत सिंग पन्नू या आणखी एका खलिस्तानवादी नेत्याच्या हत्येचा प्रयत्न या दोन्ही घटनांमध्ये भारतीयांचा हात असल्याबाबत दोन्ही देशांच्या तपासयंत्रणांमध्ये मतैक्य आहे. पण या कारवाया भारत सरकारच्या संमतीने सुरू होत्या अशी कुजबूज मोहीम गेले काही महिने सुरू आहे. त्यातही प्रथम ‘द फायनॅन्शियल टाइम्स’ आणि अगदी अलीकडे ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या प्रतिष्ठित आणि जबाबदार पत्रांनी भारतीय गुप्तहेर संस्था ‘रॉ’चे थेट नाव घेतले असल्यामुळे कुजबूज मोहीम वेगळ्या वळणावर गेली आहे. त्या संदर्भात निव्वळ मुत्सद्दी स्वरूपाच्या प्रतिक्रिया देऊन भागण्यासारखे नाही, हे आपण ओळखायला हवे.

हेही वाचा >>> उलटा चष्मा : पार्कात पक्षपाताचालवलेशही नाही

उदाहरणार्थ, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतेच मुंबईत ‘निज्जरप्रकरणी आमच्याकडे अधिकृतरीत्या कॅनडाकडून तपासाविषयी विनंती झाल्यास आम्ही तिचा विचार करू’ असे सांगितले. निज्जर खून प्रकरणाविषयी यापूर्वी भारताने ‘शिखांमधील अंतर्गत टोळीयुद्ध’ अशी भूमिका घेतली होती. ज्यावेळी केवळ कॅनडाकडूनच कथित भारतीय हस्तक्षेपाविषयी आरोप झाले, त्यावेळी भारताची भाषा आक्रमक होती. परंतु काही महिन्यांपूर्वी अमेरिकी तपासयंत्रणांकडून याविषयी तेथील कागदपत्रांमध्ये थेट उल्लेख झाल्यानंतर भारताची भाषा काहीशी बदलली. अशा प्रकारे भूमिका बदलल्याने संदिग्धता वाढते. परदेशांमध्ये भारतविरोधी व्यक्तींचा काटा काढण्याची भारताची परंपरा नाही, ही भूमिका भारताकडून पुरेशा सक्षमपणे मांडली गेलेली नाही. या सगळ्या प्रकरणात सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा संदिग्धतेचा ठरतो. अमेरिकी कागदपत्रांमध्ये भारतीयांचा उल्लेख आहे, पण जो बायडेन प्रशासनाने अद्याप तरी याविषयी भाष्य करणे टाळले. याउलट बायडेन यांच्या तुलनेत अपरिपक्व असलेले आणि कॅनडास्थित शिखांच्या मतपेढीवर राजकीय अस्तित्वासाठी अवलंबून असलेले ट्रुडो भारतावर थेट आरोप करण्यास मागेपुढे पाहात नाहीत. त्या दोन्ही देशांनी काहीएक भूमिका घेतलेली आहे आणि त्यात सातत्य दिसते. भारताने भूमिकेतील नि:संदिग्धतेबाबत त्यांचा कित्ता गिरवायला हरकत नाही. देशविरोधी व्यक्ती, मग त्या विभाजनवादी दहशतवादी का असेनात, पण रशिया-अमेरिका-इस्रायल शैलीमध्ये गुप्तहेरांमार्फत त्यांचा दुसऱ्या देशांमध्ये काटा काढण्यासारखे बेजबाबदार कृत्य भारताने टाळणे केव्हाही हितकारक. कारण त्यापेक्षा अधिक जबाबदार आणि विधायक मार्ग अनेक आहेत.

हेही वाचा >>> पहिली बाजू : ‘त्यांना काय वाटेल?’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘‘निज्जरसारख्या पुंडाविरोधात जेथे इंटरपोलनेही शोध नोटीस काढली होती, तेथे त्याला कॅनडाचे नागरिकत्व मिळालेच कसे,’’ यासारखा प्रश्न भारत विचारू शकतोच. ‘‘अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन या देशांतील भारतीय दूतावास, वाणिज्य कचेऱ्यांच्या परिसरात बिनदिक्कत मोडतोड किंवा दूतावास कर्मचाऱ्यांशी धसमुसळेपणा हे प्रकार आघाडीच्या प्रगत लोकशाही देशांतील यंत्रणा चालवून कशा घेतात’’ असे आपण या मंडळींना खडसावून विचारलेच पाहिजे. त्या देशांचे नागरिकत्व बहाल झालेल्या, तरीही अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन भारतविरोधी कारवाया सुरू ठेवणाऱ्या व्यक्तींविषयी सर्व संबंधित देशांकडे आपण पाठपुरावा केला पाहिजे. पंजाबमधील खलिस्तान चळवळ क्षीण झाली, कारण भारतीय शिखांनी त्यातील फोलपणा ओळखला. तेव्हा भारतात ज्या चळवळीचे अस्तित्व संपले, तेथे परदेशात तिचे प्रयोजन काय याविषयी आपण प्राधान्याने कॅनडाला जाब विचारू शकतो. निज्जर हत्याप्रकरणी आतापर्यंत चार भारतीयांना अटक झालेली आहे. तो धागा पकडून आपण स्वत:हून कॅनडाला तपासामध्ये साह्य केले पाहिजे. त्याऐवजी आपली भूमिका संदिग्ध राहिली, तर त्यातून निष्कारण कुजबूज मोहिमेला बळ मिळेल आणि ट्रुडोंसारख्या तोंडाळ नेत्यांचेच फावेल.