दर्जेदार चित्रपट देणाऱ्या इराणी चित्रपट-दिग्दर्शकांची परंपरा मोठी आहे. माजिद मजीदी, अब्बास किआरास्तोमी, मोहसिन मखमल्बाफ हे या परंपरेचे अग्रदूत ठरले. ‘इस्लामी क्रांती’नंतरच्या काळात, १९८०च्या दशकात या साऱ्यांनी चित्रपट हे माध्यम वापरून अस्तित्वाचे प्रश्न हाताळले. परिणामी, जगभरच्या दर्जेदार चित्रपट महोत्सवांमध्ये दर खेपेला एकातरी इराणी चित्रपटाचा समावेश असतो आणि स्वतंत्र बाण्याच्या इराणी चित्रपटांची परंपरा आज कुठे आहे हेही यातून जोखले जाते. या परंपरेतले नवे लक्षवेधी नाव म्हणजे सोहेल बैराघी.
वयाची चाळिशीही न गाठलेल्या सोहेल बैराघी यांनी आजवर चार चित्रपट केले आहेत. त्यांपैकी सर्वात नव्या आणि जाचक इस्लामी राजवटीने बंदी घातलेल्या ‘बिदाद’ या चित्रपटाला ‘कार्लोव्हि व्हॅरी चित्रपट महोत्सवा’त यंदा परीक्षकांनी सर्वोच्च पुरस्काराच्याच तोडीचा, ‘क्रिस्टल ग्लोब : परीक्षक-पसंती’ पुरस्कार जाहीर केला. झेक प्रजासत्ताकातल्या निसर्गरम्य आणि गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी प्रख्यात अशा कार्लोव्हि व्हॅरी येथील या महोत्सवाचे यंदा ५९वे वर्ष होते.
‘बिदाद’ म्हणजे आर्त हाक. सोहेल बैराघी यांच्या या चित्रपटाला, इराणमध्ये ‘मुली व महिलांनी एकटीने हिजाब काढून लोकांसमोर गाणी गाण्यास बंदी’ची पार्श्वभूमी आहे. हिजाबची सक्ती न पाळणाऱ्या महासा अमीनीच्या मृत्यूनंतर जशी इराणमध्ये निदर्शने झाली, तसे काही या गायनबंदीविरुद्ध झालेले नाही. गाता गळा असलेल्या महिलांची कुचंबणा सुरूच आहे.
हिजाबसक्तीच्या विरोधात २०१७च्या डिसेंबरमध्ये तेहरानच्या इंघलाब मार्गावरल्या भरचौकात, दूरध्वनी आदींच्या तारांसाठी जी लोखंडी खोकी रस्त्यावर असतात त्यांपैकी एका खोक्यावर उभे राहून विदा मोवाहिद या तरुणीने काही तास एकटीने निदर्शने केली होती. तेव्हा कुणीही तिला साथ दिली नाही, विदा मोवाहिद तुरुंगात गेली. पण अशी एकटीदुकटी तरुणीच पुढल्या काही वर्षांमध्ये लोकांना धैर्य देत असते, ही सोहेल बैराघींच्या ‘बिदाद’ची प्रेरणा. या चित्रपटाची नायिका सेती ही विदा मोवाहिदचे अनुकरण करते.
ती त्या खोक्यावर उभे राहून गाते! सेती तरुण आहे, ‘जेन झी’मधली आहे… तिच्यावर विचारधारेचे किंवा अमुकच एका सांस्कृतिक परंपरेचे शिक्के बसूच शकत नाहीत अशा काळात वाढलेली आहे. ती गात असलेली गाणीसुद्धा अॅमी वाइनहाउसची जाझ गाणी, पॉप, पंक संगीत इथपासून ते कुर्दिश लोकसंगीतापर्यंत कुठलीही आहेत. स्वत: गाण्याची क्रिया तिला महत्त्वाची वाटते. त्यासाठी सरकारी जाच सहन करावा लागेल तो का, हे तिला आधी कळत नसले तरी, जेव्हा कळते तेव्हाही ती गाणे सोडत नाही. हा चित्रपट अवघ्या ७० जणांच्या पथकानिशी आणि भररस्त्यांत भराभरा चित्रीकरण करत सोहेल बैराघी यांनी पूर्ण केला, तेव्हाच इराणी राज्ययंत्रणेची वक्रदृष्टी त्यांच्यावर गेली.
मग पडद्यामागच्या अनेक सहकाऱ्यांनी ‘आमची नावे श्रेयनामावलीतून वगळा’ अशी विनंती केली! सोहेल यांच्यावर कारवाई सुरू झालीच, पण तूर्तास कोठडीची वेळ त्यांच्यावर आलेली नाही. या चित्रपटाला रोखले जाण्याची शक्यता गृहीत धरून त्यांनी कार्लोव्हि व्हॅरीच्या आयोजकांना ‘‘बिदाद’चा समावेश जाहीर न करताच तो दाखवा’ अशी विनंती केली होती. ‘आय (मी)’, ‘कोल्ड स्वेट’ आणि ‘पॉप्युलर’ हे त्यांचे याआधीचे तीन चित्रपटही अनेक महोत्सवांत या ना त्या पुरस्काराचे मानकरी ठरले होते… आणि इराणी राज्ययंत्रणेच्या रोषालाही पात्र ठरले होते.