scorecardresearch

Premium

चांदनी चौकातून : मोठय़ा आंदोलनातून छोटी आंदोलनं

जंतरमंतरवर कुस्तीगीर महिनाभर ठिय्या देऊन आहेत. तिथं गेल्यावर वाटतं की, इथं फार गर्दी नाही. मग, हे कुस्तीगीर आंदोलन कसं करताहेत?

delhiwala

दिल्लीवाला

जंतरमंतरवर कुस्तीगीर महिनाभर ठिय्या देऊन आहेत. तिथं गेल्यावर वाटतं की, इथं फार गर्दी नाही. मग, हे कुस्तीगीर आंदोलन कसं करताहेत? अर्थात या महिला कुस्तीगिरांना जंतरमंतरवर ठाण मांडलंच पाहिजे असं नाही. हरियाणातील शेतकरी संघटना, खाप यांचा आंदोलकांना पाठिंबा आहे. त्यामुळं शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, त्यांचे स्थानिक पुढारी जंतरमंतरवर असतात. कोणी कोणी तिथं येऊन भाषणं करत असतं. असं चित्र शाहीन बागेच्या आंदोलनाच्या वेळी पाहायला मिळालं होतं. दुपारी तिथं गेलं तर महिला बसलेल्या असायच्या. व्यासपीठावर कोणी ना कोणी आंदोलनाला पाठिंबा देणारं भाषण करत असायचं. तिथं वातावरणनिर्मिती झाली होती. ठिकठिकाणाहून लोक येत असत, राबता होता. तसा इथं राबता नाही, पण कुस्तीगिरांनी आंदोलनाची दखल घ्यायला लावली आहे. दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यापासून याच शेतकरी संघटना केंद्र सरकारच्या विरोधातील कुठल्याही आंदोलनाला पाठिंबा देत असतात. शेतकऱ्यांच्या आंदोलनानं केंद्र सरकारला धडकी भरली होती. कुस्तीगिरांचं आंदोलन छोटं असेल, पण शेतकऱ्यांमुळं ते जिवंत राहिलेलं आहे. त्याचा केंद्रावर दबाव कायम राहिलेला आहे. जितकं त्यांचं आंदोलन लांबेल तितकी सहानुभूतीही वाढत जाईल. नव्या संसद भवनाचं रविवारी उद्घाटन होईल, तिथं जाऊन आंदोलन करण्याचा कुस्तीगिरांचा इरादा आहे. पोलीस त्यांना जंतरमंतरच्या बाहेर जाऊ देणार नाहीत, पण नव्या संसदेवर पहिला मोर्चा काढण्याच्या निर्धाराचं श्रेय महिला कुस्तीगिरांना द्यावंच लागेल.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!

तुला शिकवेन चांगलाच धडा!

एखाद्या लोकप्रतिनिधीविरोधात हक्कभंगाचं प्रकरण किती रेंगाळावं याला काही मर्यादा असते की नाही? पण, बघतोच तुमच्याकडं असं म्हणून कोणी हात धुऊन मागं लागलं असेल तर काय करणार? सत्ताधाऱ्यांकडं अनेक आयुधं असतात. त्यांचा वापर कसा, कधी, किती करायचा हे त्यांच्यावर अवलंबून असतं. संसदेमध्ये लोकसभा वा राज्यसभेची विशेषाधिकार समिती हीदेखील आयुधासारखी वापरता येते. सध्या या समितीचा तसाच वापर केला जात असल्याचं दिसतंय. राज्यसभेतील दोन मराठी खासदारांविरोधातील प्रकरणं राज्यसभेच्या विशेषाधिकार समितीकडं गेलेली आहेत. काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत. संसदेच्या सदस्यांनी कितीही बेजबाबदारपणा केलेला असेल तरीही अधिवेशन संपलं की, निलंबन मागे घेतलं जातं. निलंबन करून भत्ता न मिळण्याची शिक्षा खरं तर पुरेशी असते. आता मात्र निलंबन झालं की, ते मागे घेतलं जाईल याची खात्री कोणी देऊ शकत नाही. रजनी पाटील यांच्याविरोधात भाजपनं हक्कभंग आणल्यानंतर हे प्रकरण आपोआप विशेषाधिकार समितीकडं गेलं. सभागृहात गोंधळ नेहमीच होतो, कधी कधी त्या गोंधळाचं चित्रीकरणही होतं, पण भाजपला भलताच राग आला कारण पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी काँग्रेसवाल्यांनी गोंधळ घातला आणि चित्रीकरण करून चित्रफीत व्हायरल केली. भाजपचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार नरसिंहा यांच्या पक्षनिष्ठेबद्दल कोणी शंका घेऊन शकत नाही. काही जण राजापेक्षा राजनिष्ठ असतात! त्यांनी निलंबनाचं प्रकरण गांभार्यानं घेतलं. आत्तापर्यंत विशेषाधिकार समितीच्या तीन बैठका झाल्या आहेत. भाजपकडून नरसिंहा, राकेश सिन्हा या दोन सदस्यांनी कमालीची आक्रमक भूमिका घेतली असल्याचं म्हणतात. त्यांचा आविर्भाव ‘तुला शिकवेन चांगलाच धडा’ असा असल्यानं निलंबन मागं घेतलं जात नाही, असं म्हणतात. त्यात संजय राऊतांची भर पडेल की काय अशी शंका घेण्याजोगी परिस्थिती आहे. विधिमंडळानं त्यांचं प्रकरण राज्यसभेच्या सभापतींकडं पाठवलं. त्यांनी ते विशेषाधिकार समितीकडं. जुलैमध्ये पावसाळी अधिवेशनात नव्या संसद भवनात नवी प्रथा सुरू होते की काय बघायचं!

तुम्हीच माझे गुरू!

पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियाला गेले होते. तिथल्या भारतीय लोकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात तिथले पंतप्रधानही आले होते. ते खूप भारावून गेले असावेत, त्यांनी मोदींचा उल्लेख ‘बॉस’ असा केला. भाजपचे नेते नेहमी म्हणतात, जगभरात मोदींना किती मान मिळतो.. ते खरे विश्वगुरू आहेत! त्याची प्रचीती ऑस्ट्रेलियात आली. मोदींच्या कौतुकाबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेली प्रतिक्रिया म्हणजे फुगा कसा फोडायचा याचा उत्तम नमुना म्हणता येईल. मोदींना विदेशी प्रमुख ‘बॉस’ म्हणतो, यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे? या प्रश्नावर, हे नेते म्हणाले, त्यात काय एवढं. फक्त मोदींचंच कौतुक झालं असं समजू नका. आमच्या पंतप्रधानांचंही झालेलं आहे. मी साक्षी आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. २००९ मध्ये मी केंद्रीय मंत्रिमंडळात होतो. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग विदेशात गेले होते. त्यांच्यासोबत मीही गेलो होतो. तिथं अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामांनी मनमोहन सिंग यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर ओबामांनी मनमोहन सिंग यांना ‘तुम्ही माझे गुरू आहात,’ असे म्हटले होते. ओबामांनी त्यांचा किती मान राखला हे बघा. बॉस म्हणणं आणि गुरू म्हणणं यामध्ये फरक आहे की नाही?.. काँग्रेसच्या या नेत्यांचं म्हणणं एका अर्थाने योग्य होतं असं म्हणता येईल. गुरू हा शब्द विश्वगुरूच्या नजीक जाणारा आहे! हे नेते म्हणाले, विदेशात गेल्यावर अशा वेगवेगळय़ा उपमा दिल्या जातात. त्या ऐकायच्या असतात. त्याला फार महत्त्व द्यायचं नसतं. असं सगळं होत असतं.. खरा मुद्दा आहे की, चीनशी तुमचे संबंध कसे आहेत? चीनच्या समोर मान झुकलेली आहे. पाकिस्तानला वगळून टाकू. श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूतान या शेजारच्या राष्ट्रांशी तुम्ही कसे संबंध ठेवले आहेत? कुणी तरी बॉस म्हणतं म्हणून तुम्ही बॉस होत नाही.. मोदींविरोधात बोलताना या नेत्यांचं रक्त सळसळतं. मध्येच त्यांनी जी-२० चा विषय काढला. जी-२० चा नुसता तमाशा करून ठेवलाय. या गटात जेमतेम २० देश. १८ देशांकडं यजमानपद येऊन गेलंय. आपण १९वे. जी-२० चं यजमानपद कधी तरी आपल्याकडं येणारच होतं. आपल्यानंतर राहिलेल्या अखेरचा देशही यजमान होईल. त्यात काय एवढं?  काँग्रेस नेत्यांच्या या भावना भाजप नेत्यांच्या मनातही असतील, पण ‘बॉस’पुढं कुणाचं काय चालणार?

चेहरा काय असतो?

मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाली म्हणून भाजपनं पत्रकारांसाठी भोजन समारंभ आयोजित केला होता. या वेळी वातावरणात उत्साह कमी होता, काही पदाधिकारी हजेरी लावून परतले. राजनाथ, जे. पी. नड्डा होते, पण खरे उत्सवमूर्ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कार्यक्रमात नव्हते. ते आसाममध्ये होते. अशा अनौपचारिक गप्पांमध्ये अमित शहा मोकळेपणानं बोलतात. त्यांना जे पोहोचवायचं असतं ते अचूक पोहोचतं. २०१८ मध्ये शहा भाजपचे पक्षाध्यक्ष होते. भाजप भलताच फार्मात होता. २०१९ मध्ये भाजपला अभूतपूर्व यश मिळणार हे प्रत्येक नेत्याच्या देहबोलीवरून समजत होतं. भाजपचं लक्ष पश्चिम बंगालकडं होतं. अनौपचारिक गप्पांमध्ये शहांनी सांगितलं होतं, पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ पैकी भाजप २२ जागा जिंकेल. आणि भाजपनं १८ जागा जिंकल्या! या वेळी कर्नाटकमध्ये दणका बसल्यामुळं कदाचित वातावरण थोडं नरम असावं. पण, त्याआधी विधानसभेच्या निवडणुका आहेत. भाजपला राजस्थानमध्ये विजयाची खात्री आहे. आत्ता तिथं काँग्रेसविरोधी वातावरण असल्याचं दिसतंय, पण गेल्या वर्षी उदयपूरला काँग्रेसचं महाअधिवेशन भरलं होतं तेव्हाही राजस्थानी लोक काँग्रेसचं काही खरं नाही असं म्हणत होते. भाजपला खरी चिंता मध्य प्रदेशची आहे. तिथं शिवराजसिंह चव्हाण ऊर्फ मामांच्या विरोधात वातावरण निर्माण होऊ लागलंय. भाजपला आत्ताच नव्या चेहऱ्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विचारलं की तुमच्याकडं मामांशिवाय दुसरा चेहरा आहेच कुठं? त्यावर, त्यांचं म्हणणं होतं, चेहरा असतो काय? हरियाणा, महाराष्ट्र, उत्तराखंड बघा. इथं कुठं चेहरा होता का? मोदी ठरवतील तो चेहरा. मध्य प्रदेशात नवा चेहरा हवा असेल तर तो मिळेल. मामांचं काय होतंय बघायचं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chandani chowkatun agitations the wrestlers stayed at jantarmantar for a month ysh

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×