अमृत बंग

‘युवा बहरणे’ हा शीर्षकातल्या इंग्रजीसाठी मराठी प्रतिशब्द! पण हे बहरणे मोजायचे ते काय केवळ टक्केवारी किंवा पगार यांआधारे? त्यापेक्षा निराळे निकष आहेतच.. ते कोणते?

माझा मुलगा अर्जुन सध्या अडीच वर्षांचा आहे. जन्मल्यापासून आतापर्यंत अर्जुनची वाढ योग्य रीतीने होते आहे की नाही हे बघण्यासाठी पिडियाट्रिक आणि बालमानसशास्त्राच्या विज्ञानाने बाळाच्या वाढीचे आणि विकासाचे विविध टप्पे व लक्षणे सांगितलेली आहेत. त्या मैलाच्या दगडांनुसार अर्जुनची किंवा इतर कुठल्याही बाळाची वाढ तपासता येते. सर्व छान सुरू असेल तर आनंद मानायचा आणि जर कुठे कमतरता असेल तर त्यावर योग्य ती उपाययोजना करायची ही संधी पालकांना (आणि पाल्याला) उपलब्ध असते.

मूल लहान असताना ही मोजमापाची सोय आहे; पण मग मोठे झाल्यावर काय? या देशातल्या २६ कोटी युवांसाठी काय? त्यांचे सर्व आलबेल चालू आहे की नाही हे (त्यांनी व इतरांनी) कसे ओळखायचे? त्यावर गरज असल्यास उपाययोजना कशा करायच्या? मुळात योग्य ‘ट्रीटमेंट’साठी प्रथम योग्य ‘डायग्नोसिस’ कसे करायचे?

दुर्दैवाने आपल्या देशात युवांच्या विकसनासाठी पुरेसे काम केले जात नाही. शासन युवांकडे निव्वळ मतदार म्हणून किंवा रोजगारासंबंधीच्या एखाद्या योजनेचे लाभार्थी म्हणून बघते; तर खासगी क्षेत्राचा युवांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा संभाव्य ग्राहक यापुरता सीमित असतो. सामाजिक क्षेत्रातदेखील बहुतांश वेळा ‘यूथ डेव्हलपमेंट’ हा तुलनेने गौण महत्त्वाचा विषय मानला जातो. कंपन्यांकडून ‘सीएसआर’द्वारा केल्या जाणाऱ्या मदतीमध्येसुद्धा युवाविकासासाठी काम करण्याला फारसे प्राधान्य दिले  गेल्याचे दिसत नाही. एकूणच युवांच्या विकासासाठी आपल्याकडे फारसे जोमदार उपक्रम तर नाहीतच; पण अत्यंत महत्त्वाची एक समस्या म्हणजे यासाठीचे कुठलेही सिद्धांत वा प्रारूपदेखील भारतात नाही. त्यामुळे एखाद्या युवाचा सुयोग्य विकास म्हणजे नेमके काय, तो होतो आहे किंवा नाही, त्याची विविधांगी सक्षम जडणघडण होते आहे की नाही, हे कसे ओळखायचे याबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात व अस्पष्टता राहते.

या संदिग्धतेचा परिणाम असा होतो की मग निव्वळ सहजरीत्या दृश्यमान आणि विनासायास मोजता येण्यासारखे असे जे विकासाचे मापक असतात उदा. परीक्षेतील मार्क/ टक्केवारी, डिग्री वा कॉलेजचे नाव, नोकरी, पगार, घर वा गाडी असणे, इ. त्यांनाच प्राधान्य मिळते. आणि जणू याच बाबी म्हणजे युवा विकासाचे मापदंड व मानदंड आहेत असा समज प्रस्थापित होतो. त्यांचेदेखील काही महत्त्व आहे हे दुर्लक्षून चालणार नाही पण ही मानके म्हणजेच परिपूर्ण असेदेखील मानता येणार नाही. मग असे इतर काय घटक, लक्षणे, वैशिष्टय़े असू शकतात ज्यावरून याची कल्पना करता येईल की एखाद्या युवाचे जीवनात खरोखर छान सुरू आहे, तो किंवा ती ‘बहरत’ आहे (‘फ्लरिश’ होत आहे), युवा विविधांगाने बहरताहेत आणि विकासाच्या / वाढीच्या मार्गावर इष्टतम स्थितीत आहेत? यासाठीचे काही बुद्धिगम्य आणि सैद्धांतिक प्रारूप नसेल तर सखोल समजदेखील शक्य नाही आणि परिणामकारक उपक्रमांची कल्पना सुचणे वा ते प्रत्यक्षात आणणे, त्यांचे मोजमाप करणे हेदेखील अवघड!

युवांच्या विकासासंबंधीचा आपल्याकडील बहुतांश संवाद व चर्चा ही आत्महत्या, बेरोजगारी, अपघात, लैंगिक अत्याचार, मादक पदार्थाचे व्यसन, मोबाइलचा अतिवापर याभोवतीच घोटाळते. या सहा मुद्दय़ांच्या पलीकडे जाऊन आम्ही निर्माण या आमच्या उपक्रमाद्वारे भारतातील युवांसाठी प्रथमच असे एक ‘निर्माण यूथ फ्लरिशिंग फ्रेमवर्क’ तयार केले आहे. हे प्रारूप गेल्या १७ वर्षांत हजारो युवकांसोबतच्या आमच्या कामातून आणि अनुभवातून झालेल्या निरीक्षणांवर तसेच या विषयाबाबतच्या नवीनतम विज्ञानावर आधारलेले असे आहे. या फ्रेमवर्कची व्याप्ती व्यापक असून त्यात सात मुख्य विभाग आणि त्यामध्ये एकंदर ५० विविध घटक अशी विभागणी आहे. क्रिएटिव्ह कॉमन्सच्या अंतर्गत लायसन्स केलेले हे विस्तृत फ्रेमवर्क ‘निर्माण’च्या संकेतस्थळावर  https://nirman.mkcl.org/media/nirman-youth-flourishing-framework येथे बघता येईल.

यातील सात मुख्य विभाग म्हणजे: (१) शारीरिक स्वास्थ्य  Physical Health, (२) मानसिक स्वास्थ्य  Psychological Well- Being (३) चारित्र्य विकास  Character Development, (४) नातेसंबंध   Social Relationships, (५) व्यावसायिक विकास  Professional Developmen, (६) जीवन कौशल्ये Life Skills आणि (७) सामाजिक योगदान  Social Contribution.

या फ्रेमवर्कचा ज्यांना उपयोग होईल असे चार श्रोतृगट आमच्या नजरेसमोर आहेत :

१)  युवांना फ्लरिशिंगच्या या रंगपटावर मी सध्या नेमका कुठे आहे हे शोधता यावे म्हणून तयार केलेली ‘निर्माण यूथ फ्लरिशिंग प्रश्नावली’देखील निर्माणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संपूर्णत: ऑनलाइन अशी ही प्रश्नावली भरल्यानंतर त्यावर आधारित पाच पानांचा अहवाल प्रत्येकाला त्याच्या ईमेलवर मिळतो. युवा स्वत: याचा वापर करून स्वत:च्या बहुआयामी विकासाची सद्य:स्थिती काय, पुढील उद्दिष्ट काय आणि त्यासाठी सुरुवात कशी करता येईल याचा विचार करू शकतात. स्वत:च्या फ्लरिशिंगची जबाबदारी स्वत: घेऊन त्याबाबतीत स्वयंपूर्ण बनू शकतात.

२) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थाच्या सर्वागीण व्यक्तित्व विकासावर भर द्यावा असे सुचवण्यात आले आहे. त्यानुसार विविध महाविद्यालयांमध्ये या प्रश्नावलीचा वापर करून अध्यापक मंडळी विद्यार्थ्यांना मदत करू शकतात. पदवीच्या अभ्यासासोबतच प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक वैयक्तिक ‘ग्रोथ प्लॅन’ तयार करू शकतात. प्लेसमेंट्सच्या वेळी तांत्रिक कौशल्यांसोबतच आपल्या व्यक्तित्व (कॅरेक्टर) आणि व्यक्तिमत्त्वाविषयी (पर्सनॅलिटी) देखील विद्यार्थी नेमकेपणे बोलू शकतील अशी तयारी करून घेता येईल.

३) संशोधक व धोरणकर्ते या फ्रेमवर्कमधील विविध घटकांवर संशोधन, त्यांचे विष्लेषण, उपयुक्त ज्ञाननिर्मिती, शिफारसी, इत्यादींवर काम करू शकतात. यातून उद्या काही नवीन घटकांचा समावेशदेखील या फ्रेमवर्कमध्ये होऊ शकतो.

४) युवांसोबत संबंध येणारा इतर कुठलाही सुजाण भारतीय नागरिक – पालक, नातेवाईक, भावंडे, शिक्षक, सल्लागार, गटप्रमुख, कंपनीतील बॉस वा वरिष्ठ सहकारी, मित्र, जोडीदार – या फ्रेमवर्कचा उपयोग करून त्याच्या/तिच्या संपर्कात येणाऱ्या युवांच्या विकासात हातभार लावू शकतो.

निर्माण असे भविष्य बघू इच्छिते, जिथे भारतातील तरुणाईची प्रगती व उत्कर्ष यांची संकल्पना ही त्यांच्या व इतरांच्या विचारातदेखील, परीक्षेतले मार्क्‍स, पॅकेजचे आकडे, मालकीच्या गाडय़ांची संख्या अथवा  मालमत्तेचा चौरस फुटामधील आकार, यापलीकडे जाते आणि वैविध्यपूर्ण स्वरूप घेते.

मानसिक वा शारीरिक आजारांचा निव्वळ अभाव म्हणजे आपोआप निकोप व निरोगी वाढ असा अर्थ होत नाही. त्यातून फक्त इतकेच कळते की, आपण अक्षाच्या ऋण बाजूला नसून शून्य बिंदूवर आहोत. अक्षाच्या धन बाजूला, सकारात्मक वाढीसाठीच्या अगणित शक्यता आहेत. त्या शक्यतांना वास्तवात आणणे ही युवा पिढीची जबाबदारी आणि आपण बाकी सगळय़ांचे उत्तरदायित्व आहे. या प्रवासामध्ये हे फ्रेमवर्क उपयुक्त मार्गदर्शक ठरेल अशी मी आशा करतो.

या फ्रेमवर्कवर आधारित आम्ही केलेल्या युवांच्या अभ्यासावरील शोध निबंधाची येत्या जून महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या ‘कॉन्फरन्स ऑन इमर्जिग अ‍ॅडल्टहूड’मध्ये सादरीकरणासाठी निवड झाली आहे. भारतातील युवांच्या व्यक्तित्व विकासाबाबत केला गेलेला हा या प्रकारचा पहिला अभ्यास आहे. यापासून सुरुवात होऊन हळूहळू भारतातील युवांच्या विकासाबाबतचे भारतीय परिप्रेक्ष्यातील विज्ञान आणि त्यावर आधारित नीती व उपक्रम विकसित होतील अशी मला आशा आहे. शेवटी ‘बहरते युवा’ हेच बहरत्या भारताचे खरे चिन्ह व पताका असतील आणि देशाच्या भरभराटीचे इंजिन असतील!