scorecardresearch

चिंतनधारा: निष्काम कर्मातील प्रचलित गैरसमज

कर्माला प्रवृत्त होणाऱ्या माणसात हेतू नसेल किंवा अभिमान नसेल तर त्याचा बाण लक्ष्यवेध करू शकेल? असा प्रश्न राष्ट्रसंत तुकडोजी महाराज करतात.

chintandhara - tukdoji maharaj

कर्माला प्रवृत्त होणाऱ्या माणसात हेतू नसेल किंवा अभिमान नसेल तर त्याचा बाण लक्ष्यवेध करू शकेल? असा प्रश्न राष्ट्रसंत तुकडोजी महाराज करतात. निष्काम कर्माची महती सांगतानाच ते त्यातील प्रचलित गैरसमजांबाबत सांगतात, ‘आसक्तिरहित कर्माचे समाधान करणारे काही लोक म्हणतात- अहो! एवढेही नाही समजत तुम्हाला? की फक्त कर्माच्या फलाची इच्छा करू नये, काय होईल ते प्रभू जाणे, पण मग एवढे निराशेचे दगड वाटेत लागलेच पाहिजेत हे सांगण्याचे धाडस तरी कुणी का करावे? काही का असेना, हाच अर्थ लोकांनी घेतलेला असावा हे मात्र खरे- असे स्पष्ट करून महाराज म्हणतात जो कोणी भक्ती करितो तो कर्तव्याविषयी इतका उदासीन असतो की, त्याचे खाणेपिणेही दुसऱ्यावरच अवलंबून असते.
अशा लोकांना जर कोणी विचारले- आपण काय उद्योग करता?- तर ते म्हणतात – काय भगवान करून घेईल ते! भजन करतो आणि आपला असतो अनासक्त!- पण जरा जोर देऊन विचारले की- मग भोजनही प्रयत्नाशिवायच मिळत असते की प्रयत्न करून पोटात घालावे लागते?- तेव्हा ते म्हणतात- ते चालते कसे तरी! जे मिळते तेच घ्यावे आणि रहावे आपले हरि हरि करीत!’

पण त्यात तरी पूर्ण समाधान आहे काय, हे पाहू जाता मनातील इच्छा मात्र ‘सर्व ऐश्वर्य मिळावे अशीच असलेली दिसून येते. कर्माकरिता मात्र अगदीच उदास झालेले लोक असतात ते व गीता तर रोज वाचून काढतात की- अर्जुना! तू कर्म कर व ते कर्म मला अर्पण कर, पण कर कशाला व मोकळा हो कशाला नि कसा, याचा पाठ मात्र लवकर समजत नाही. समजावून देणारेही सांगत नाहीत, असा अनुभव नेहमीच येतो. कर्माची निश्चित माहिती न सांगता केवळ कर्माला प्रवृत्त होण्यास सांगणाऱ्या सांप्रदायिकांना उद्देशून महाराज आपल्या मार्मिक भजनात म्हणतात साधो! नाम जपे क्या होता?
जब तक करनी करे न कोई, लाभ उसे नहीं पाता।
नेक रहो, उद्योग करो,
तब घर बैठे प्रभु आता।।
कृष्ण नाम अर्जुनने बोला,
भरे युद्ध जस पाता।
खाली नाम कार्य नहीं होवे,
कार्य धरे तब होता।।
कूद पडो जन-सेवा करने,
तब कहीं राम सुहाता।।
राम-नाम जप किया गाँधी ने,
स्वराज्य घर पर आता।
तुकडय़ा कहे भोजन के जपसे,
तृप्ति नहीं कोई पाता।।

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-03-2023 at 00:39 IST