ग्रामजयंती सर्वाच्या उदयाची पायवाट असून कार्यकर्त्यांना ग्रामविकासाचा वस्तुपाठ घालून देताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘तुमचे कार्य ज्या मार्गाने चालते तो मार्ग राजकारणाचा, पक्षाचा तर मुळीच नाही- हे जर लोकांच्या लक्षात आले तर त्यांना काही फरक जाणवू लागेल. यात आपल्याला आपल्या संप्रदायापासून, आपल्या गुरूपासून वेगळे केले जात नाही, हे त्यांना समजले की कार्यात कोणतीही अडचण राहत नाही. आता प्रश्न कार्यकर्त्यांच्या स्वभावाचा आहे. कार्यकर्ता मनमिळाऊ, स्वत: काही श्रम, काम करणाराही असावा व त्याची दिनचर्या लोकांना अत्यंत आवडणारी असावी. कार्यकर्त्यांत काही गुण असे असावेत की ज्यामुळे, जनता त्यांना शोधत येईल. असे झाल्यास दुधात साखर पडेल. अशा प्रकारे, अनेक गुणांच्या प्रचारासाठी व जनतेला स्वच्छतेची, सद्गुणांची, व्यायामाची, भजनाची, प्रार्थनेची, उद्योग, सहकारीतेची, सामाजिक-आर्थिक- नैतिकत कार्याची गोडी लावण्यासाठी जर हा ग्रामजयंतीचा कार्यक्रम सुरू केला तर हे अखंड कार्य जनतेला आपल्याकडे खेचून आणेल.’’
महाराज म्हणतात, ‘‘आता ग्रामाच्या उन्नतीशिवाय देशातील कोणत्याही संघटनेसमोर काही विशेष कार्य राहिले आहे, असे मला तरी दिसत नाही. देशसंरक्षण, संशोधन काही विदेश व्यवहार, व्यापार व मित्रता निर्माण करणे अशीच कार्ये सरकारकडे असतील. एरवी तर आज सर्वाचे लक्ष ग्रामाकडे लागले आहे. पण जन-शक्तीचा लोंढा पाहिजे तसा तिकडे वळलेला नाही; त्यामुळे बऱ्याच अडचणीही येतात व म्हणूनच ग्रामीण जनता सध्या पुढे सरसावलेली नाही. हेही लक्षात घेऊन जनतेला सावध केले पाहिजे. आपण सर्वासाठी की आपल्यापुरते जातीसाठी की समाजरचनेसाठी, संप्रदायासाठी की राष्ट्रासाठी, धर्मासाठी की समष्टीसाठी? असे प्रश्न जनतेने विचारात घेण्यास सुरुवात केली की मग मात्र हे कार्य फारच सुकर होईल. त्यासाठीच ग्रामजयंतीचे आयोजन आहे. सध्या समाज जे करतो तो सर्व वेडेपण आहे, असे मी मुळीच म्हणणार नाही; पण एवढेच पुरेसे आहे का, असे जर कोणी विचारील तर मात्र मी म्हणेन की जेव्हा आमचे राष्ट्र एक कुटुंब आहे व त्याच्या प्रतिष्ठेतच आमचे धर्म व सुख आहे, तेव्हा त्याचे विश्वाशी मैत्र साधणे हेच आमचे आद्य- कार्य आहे. विश्व शांतीने चालणे; हेच मानवाच्या पूर्णतेचे लक्षण मी मानतो. त्यासाठी हा समाज हळूहळू माणसाने माणसाला शिकवून, मदत करून पूर्णत्वास न्यावयाचा आहे.’’ महाराज ग्रामगीतेत म्हणतात..
विश्वी होऊ शकेल शांतता।
तेथे गावाची कोण कथा?
सामुदायिक प्रार्थना करील एकता।
नित्यासाठी, तुकडया म्हणे।।
राजेश बोबडे
