१९४८ मधील एका व्याख्यानात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात : भारताच्या बहुतांश रोगांचे मूळ प्रामुख्याने त्याचे अज्ञान आहे. वर्षांनुवर्षे लोकांची बुद्धी मुर्दाड व भ्रमिष्ट बनवण्यात आली! धर्म- पंथ- जाती- वर्ण- संप्रदाय- रूढी- चमत्कार- देवावतार- स्वर्ग- पुण्यकर्म इत्यादी अनेक नावांनी भलत्याच गोष्टींचे किटण त्यांच्या बुद्धीवर चढवले गेले असून खऱ्या तात्त्विकतेपासून त्याला दूर ठेवण्यात आले आहे! उठणे, बसणे, बोलणे इत्यादी सामान्य व्यवहाराचेही यथार्थ स्वरूप बहुजन समाजास कळेनासे झाले, इतका त्याचा अध:पात झाला आहे! जाणत्याने आपल्या बुद्धिमत्तेने स्वार्थ साधावा त्यापेक्षा दुसरे पतन नाही! जो समाजाशी समरस होऊन त्यास ज्ञान देईल तोच खरा पंडित व विद्वान, अशी व्याख्या रूढ करून त्यांचीच प्रतिष्ठा वाढविली पाहिजे आणि इतरांच्या विद्वत्तेस ‘अजागळ’ ठरविले पाहिजे! व्यासपीठावरून व्याख्यान झोडणारा किंवा पाटावर पोथी वाचणारा तो विद्वान किंवा पंडित, ही कल्पना आता फेकून दिली पाहिजे. प्रसंगी प्रभावी भाषण करील, पोथी वाचील आणि योग्य वेळी समाजाच्या तुच्छ व घृणित वाटणाऱ्या सेवेसाठी झाडू घेऊनही सज्ज राहील तोच खरा ज्ञानी! भगवान श्रीकृष्णाप्रमाणे विश्ववंद्य तत्त्वज्ञान सांगणाराच गोरक्षण व घोडय़ांचा खरारा करू शकतो. प्रसंगी उष्टावळी काढून अंगण साफ करू शकतो व अवश्य तेव्हा हातात शस्त्र धरून सत्यरक्षणासाठी लढूही शकतो! ही गोष्ट आदर्शभूत म्हणून आम्ही समोर ठेवली पाहिजे! यासाठी महाराज ‘प्रत्येक जाणत्या, सुशिक्षित, बुद्धिमान व विद्वान भारतपुत्रास’ विनंती करतात की, आपली विद्वत्ता तुम्ही एका घरात डांबून ठेवू नका किंवा तिचा उपभोग केवळ स्वत:च घेऊ नका; तर त्या ज्ञानगंगेच्या प्रवाहास जनतेत वाहू द्या! ज्ञानदानाइतके पवित्र दान कोणतेही नाही; प्राणदानापेक्षादेखील याचे महत्त्व फार मोठे आहे. कथाकीर्तन करा, व्याख्याने- प्रवचने द्या की अन्य साधनांचा अवलंब करा; पण त्या सर्वामधून भोळय़ाभाबडय़ा समाजात चैतन्य ओता! त्याला जागृत करून जीवनाची खरी दृष्टी द्या! तुमच्यापैकी प्रत्येक जण आपल्या जीवनात पाच-पन्नास लोकांना जरी याप्रमाणे सुज्ञ नागरिक बनवू शकला तरी ती गोष्ट दहा पदव्यांपेक्षा अधिक भूषणावह आहे असे मी समजेन! कुठेही असा, कोणत्याही संस्थेत असा, पण लोकजागृतीचे हे व्रत घेऊन आपले आदर्श जीवन जनतेसमोर ठेवा! ‘नेणत्यांना जीवनदृष्टी देऊन स्वतंत्र बुद्धीचे बनवणे, हे कर्तव्य जर तुम्ही जाणते भारतपुत्र तातडीने बजावणार नसाल, तर भारताच्या नशिबी या ना त्या स्वरूपात फिरून गुलामगिरी व दु:ख-दुर्दशा यांचा वनवास आल्याशिवाय राहणार नाही हे कटू सत्य विसरून चालणार नाही!’ असा इशारा महाराज देतात. राजेश बोबडे