राजेश बोबडे

‘धर्माविषयी विपरीत कल्पना करून घेऊन ‘तो जगाला नाडवणारा आहे’ असे म्हणू नका, धर्माच्या कोणत्याही भागाबद्दल तसे म्हणता येत नसून, धर्माने वागण्याचा आव आणून आपला स्वार्थ साधणाऱ्या लोकांवरूनच तसे विधान केले जाते, कारण धर्माच्या तत्त्वांची उज्ज्वलता धार्मिक लोकांकडूनच घोषित केली जात असते. परंतु त्यांच्या आचरणाशी त्या तत्त्वांचा मेळ मात्र दिसत नाही. असेच बहुदा सर्वत्र दिसून येते,’ असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज धर्माविषयीच्या विपरीत कल्पना स्पष्ट करताना म्हणतात.

‘वास्तविक मनुष्यप्राणी स्वभावत: आपमतलबी असल्यामुळे प्रसंगी त्रेधा उडून त्याच्याकडून अधार्मिक वर्तन घडणे आणि त्याच्या वृत्तीत वेळोवेळी परिवर्तन होणे हे ठरलेलेच आहे. या न्यायाने काही लोक स्वभावविवश होऊन किंवा बुद्धिपूर्वक दंभवृत्तीने तसे वागले तर ती धर्माची चूक आहे, असे कसे समजता येईल?’ असा प्रश्न करून महाराज म्हणतात, ‘धर्म म्हणजे आपल्यासहित समाजाची सर्वागीण उन्नतिकारक धारणाच ना? मग जगातील अशी कोणती श्रेष्ठ उन्नती आहे की, जी धर्माला संमत नाही? धर्माचे बंधन तोडल्याशिवाय आम्हास स्वैर अनैतिकता मिळत नाही, असेच जर म्हणावयाचे असेल तर या म्हणण्याला प्रामाणिकपणा किंवा माणुसकी तरी साक्ष देईल का? मग धर्म हा तुमची कोणती उत्तम गोष्ट ग्राह्य मानत नाही, कोणती उन्नती इच्छित  नाही, ते तरी सांगा. धर्म क्षात्रतेज नको म्हणतो का, की वेदाधिकार नको म्हणतो, की समाजाकरिता त्याग नको म्हणतो? तो उद्योगाविषयी औदासीन्य पसरवितो की, माणसाचे आचरण पवित्र असताही त्याचा विटाळ मानण्यास सांगतो की, राष्ट्र स्वत्वाने जिवंत नको म्हणतो? धर्म म्हणतो तरी का हे? मुळीच नाही! धर्म असे केव्हाही म्हणणार नाही. मग उगीच जगाला नाडवून चैन करू इच्छिणाऱ्या काही भोंदूंनी वा कित्येक सांप्रदायिक महंतानी धर्माच्या नावे सुरू केलेल्या धंद्यावरूनच – धर्माची अथवा परमार्थाविषयीची वाईट कल्पना आपण का करून घ्यावी? तसेच असेल तर संसारात काही लोक चोर आहेत म्हणून ‘संसार हा चोरीच शिकवतो’ असे समजून कोणी आपले घरदार सोडून पळून जावे की काय? खरोखर अशीच विचित्र दृष्टी धर्माबद्दल अनेकांची झालेली आहे, ती दूर व्हावी असे महाराजांना वाटते. भजनात इशारा देताना महाराज म्हणतात,

अपनी-अपनी नेकिसे चलना,

    यहि तो ना धर्म सिखाता?

तुकडय़ादास कहे फिर दिनदिन,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

    क्यों पाप सरपे उठाता।।