राजेश बोबडे

भारताच्या धार्मिक क्षेत्रातील दुर्दशेला दुरुस्त करण्याचे दोन उपाय सुचवताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘पहिला उपाय निष्काम जीवन-प्रचारकांनी तयार होऊन खेडय़ातून जाऊन लोकांना संघटित केले पाहिजे व दुसरा उपाय हजारोंनी घरावर तुळशीदल ठेवून बाहेर निघून समाजात ही लाट निर्माण केली पाहिजे. सेवक जीवनाची आहुती देऊन जनतेस माणुसकी शिकविण्यासाठी झटणारा असावा. आपण म्हणाल परिस्थिती वाईट आहे. कीर्तनात व व्याख्यानात हीच गोष्ट ऐकावयास मिळते! पण आपण यावर इलाज कोणता सुचविता?  माझ्या मते एकेका गावातून निदान पाच-पाच जीवनप्रचारक तयार करावेत, जे आयुष्यभर सेवामंडळाची योजना निष्ठेने पार पाडतील. त्यांच्यावर संपूर्ण गावाचा विश्वास असेल.’’

‘‘एका गावात असे पाच प्रचारक असतील तर हिंदूस्थानच काय पण जगाला आदर्श दाखविण्याची आपली तयारी राहील. पगारी सेवक नकोत असे सूचित करून महराज म्हणतात, या कार्याला सर्वात मोठी अडचण आर्थिक येते. योजनेसाठी पैसा कोणी देत नाही. संस्थेसाठी माणसे मिळवण्यासाठी फिरलात तर इतर संस्थांवर आघात करण्यासाठी फिरता असा आक्षेप घेतला जातो. यातून बाहेर पडल्यास एकच मार्ग आहे. आज असलेल्या जीवनप्रचारकांनी निष्काम सेवेस स्वत: तयार व्हावे व इतर विश्वासू सेवकांना सेवेस तयार आहात का असे विचारून तयारी दिसल्यास त्यांना प्रतिज्ञा घ्यावयास लावावी. त्यांची वाटेल तेथे जाण्याची तयारी असावी. असे प्रचारक तयार झाले तर काही मिनिटांत काम होईल. पगारी नोकरावरच प्रचाराची संपूर्ण जबाबदारी असलेल्या संस्था हे कार्य करू शकत नाहीत. कारण पैसा अत्यंत विषारी वस्तू आहे. यामुळे माणसे कार्य सोडून पैशाच्या मागे लागतात. तेव्हा पैशाचा प्रश्न स्वत: सोडवून केवळ मार्गदर्शनासाठी नेत्याकडे पाहाणारी सेवक मंडळी हवीत.’’

‘‘भारतीय ऋषींची संस्कृती अमर आहे. ते अमर तत्त्वज्ञान जनतेस देणारे आम्ही दूत आहोत असे निर्भयतेने म्हणण्यास व जिवंत असेपर्यंत प्रचार करण्यास तयार व्हा. गुरू गोविंदसिंहांच्या वेळचा प्रसंग आठवा. त्यांनी स्वधर्माचे रक्षण करण्याची तयारी केली. त्या वेळेस मुघलांनी आघात केले हे पाहून लोकांनी गोविंदसिंहांस विनंती केली की तुमच्यासारखे वीर स्वस्थ बसले तर आमचे संरक्षण कोणी करावे? गोविंदसिंहांनाही असे वाटले की प्रजेवर अन्याय झाला तर राजा बेचैन होतो व व्हावयास पाहिजे आणि धर्मावर आघात झाल्यास महात्मा बेचैन होतो नि व्हावयास पाहिजे. त्यांनी एका सभेत लोकांकडे मागणी केली- मला या कार्यासाठी पाच लोक हवे आहेत की ज्यांचा बळी मी देवीसमोर देऊ शकेन. हे भाषण ऐकल्यावर फक्त एक मनुष्यच निर्भयतेने समोर गेला. गोविंदसिंहांनी त्याला पाठीमागील एका डेऱ्यात लपवून ठेवले व बकऱ्याच्या रक्ताने भिजलेली तलवार घेऊन जनतेसमोर घेऊन फिरून चार माणसांची मागणी केली. त्या सभेत एकामागून एक अशी चार माणसे उठली. व पुढे त्याच पाच माणसांच्या साहाय्याने त्यांनी शीख धर्माचा प्रचार केला.’’