राजेश बोबडे
‘भारतामध्ये सर्व संप्रदाय व सर्व जाती जवळ बसून परस्परांशी मोकळय़ा मनाने हितगुज करीत आहेत; एकोप्याने सुखदु:खांचा विचार करीत आहेत; हे कधीतरी घडले आहे का?’ असा सवाल करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात : ‘‘काही प्रमाणात घडलेच असेल तर ते भयानक आपत्तीच्या वेळी; तात्पुरते अथवा ‘इलेक्शन’चा स्वार्थ साधण्याच्या वेळी मतलबापुरते! मुसलमानांचे सर्वात मोठे संघटन नमाज पढताना दिसून येते. यात त्यांचा कोणताही तात्पुरता स्वार्थ नसतो. दर रविवारी ख्रिश्चनदेखील झाडून सारे प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जमतात. पण तुम्हा हिंदूंचा असा कोणता दिवस आहे की ज्या दिवशी तुम्ही सारे प्रार्थनेसाठी एकत्र जमता? हिंदूंनी जातीचेच नव्हे तर बुवांचे आणि देवांचेही तुकडे केले आहेत. देवाबरोबर मानवातही वेगळेपणा पाहण्याची दृष्टी त्यांनी बळकट केली आहे. ही काय ‘धर्म’ चालविण्याची रीत आहे? अशाने धर्म कसा नि किती दिवस जगेल? माणसांना सोडून धर्म काय हवेत राहणार आहे? माणूस तर प्रेमाचा, सहकार्याचा आसरा पाहतो. तुम्ही त्या गरीब, आदिवासी व मागासलेल्या मानवांना अस्पृश्य समजून नेहमीच दूर लोटीत आला आहात. ही काय धर्माची शिकवण आहे? अशा वेळी तुमच्यापासून ते दूर-दूर गेले, इतर धर्माच्या प्रचारकांनी त्यांना तुमच्यापासून फोडून तुमच्याच विरुद्ध उभे केले किंवा त्यांनी आपल्यासाठी वेगळे ‘स्थान’ तोडून मागितले तर त्याला जबाबदार कोण? या सर्वाना तुम्ही हृदयाशी धरले असते, प्रार्थनादी निमित्तांनी एकत्र आणून त्यांच्यात आत्मीयतेचे प्रेमनिर्माण केले असते, तर हा आजचा भारत कोणत्या वैभवाने नटलेला दिसला असता याची आठवण तरी कोणी करतो का? ही आठवण करणारा साधुसंत तरी आपल्या कर्तव्याला जागू दे, अशी आमची हाक आहे! संत हेच संस्कृतीचे रक्षक असतात, धर्माचे प्रचारक असतात. मानवतेने त्यांचे हृदय ओथंबलेले असते. सर्वात एकात्मता निर्माण करण्याचे कार्य तेच उत्तम प्रकारे करू शकतात. म्हणूनच मी म्हणतो की, सर्व साधुसंतांनी असली-नसली ती सिद्धी, सद्भावना, बुद्धिमत्ता, तेजस्विता व पांडित्य एकत्र करून या भारताचे मन जागृत नि संघटित करावे; माणूसधर्म जागवावा; हिंदूधर्माला पुन्हा तात्त्विकतेने उजाळा द्यावा आणि भारताच्या प्रत्येक नागरिकाला न्याय्यहक्काने जागून आपली उन्नती करण्यास मार्ग मोकळा करून द्यावा. एवढेच केले तरी त्यांनी धर्मसंस्थापनेचे फार मोठे कार्य केले असे मी म्हणेन. लोकांतील गट, पक्ष, जाती, पंथ आदीचे तुकडे एकत्र गुंफण्याचे त्यांच्यात बंधुत्व अथवा एकात्मता निर्माण करण्याचे कार्य संतांना सुलभ रीतीने करता येते. या कार्यासाठी जीवन अर्पण करून साधुसंतांनी खरे धर्मप्रचारक बनावे आणि हस्ते – परहस्ते देशात शुद्ध विचारांची लाट उसळून द्यावी, ही आजच्या युगाची गरज आहे! यानेच देशाचे व सर्वाचे भले होईल.’’
महाराज ग्रामगीतेत लिहितात.
लोक धर्माची व्याख्याच विसरले ।
धर्मे हिंदू-मुसलमान झाले।
मूळचे मानवपणही आपुले। हरविले त्यांनी।।