राजेश बोबडे
निष्काम कर्मयोग या संकल्पनेबद्दल विचार व्यक्त करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात- प्रत्येक सद्ग्रंथातून व शास्त्रांतूनही निष्काम कर्माची महती वर्णिली आहे. निष्काम कर्माचरणाशिवाय साधकांना मोक्ष मिळणे दुर्लभ, असेही सांगण्यात येते. प्रत्येक प्रवचनकार आणि सांप्रदायी लोक या विषयाला आपापल्या कुवतीनुसार नटविताना दिसतात, मात्र हा निष्काम कर्माचा सक्रिय पाठ अमलात कसा आणावयाचा, याचा विचार सांगणारे व ऐकणारे मात्र हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेही दिसत नाही.
कारण जो- तो ही शंका व्यक्त करताना म्हणतो – ‘काय हो! निष्काम कर्म म्हणजे काय? कर्म करा तर सर्वच म्हणतात, पण – हेतुरहित कर्म कसे करावयाचे हे काहीच कळत नाही. आम्हाला अनुभव तर येतो की, हेतू मनात आल्याशिवाय कर्माची धारणाच सुरू होत नाही. बरे, कर्म केल्यावर कृष्णार्पण करावे तर त्याची परिणाम-स्वरूप सुखदु:खात्मक प्रक्रिया शरीरातून निघत नाही. जरी जबरीने ‘न मम’ म्हटले तरी मनुष्य ते विसरत नाही आणि जर विसरण्याची स्थिती आली तर कर्म करण्याची प्रवृत्ती होत नाही. तेव्हा ‘कर्माला प्रवृत्त होणे आणि हेतुरहित कर्म करणे’ हे सर्व कोडेच वाटणार, हे उघड आहे. आता याची यथार्थ संगती कशी लावावी हा मोठा प्रश्न आहे.
महाराज म्हणतात – मी तर असे म्हणेन की, मला जर पायही उचलावयाचा झाला तर हेतू व आसक्तिरूप आकर्षण दिसल्याशिवाय तो जागेवरून हलवणे सुद्धा कठीण वाटते, मग पाय हलवणे व हेतू नसणे यात किती विसंगती आहे! बरे, भगवान् श्रीकृष्णाच्या बोधावरून तर असे दिसून येते की, ‘तुला हे कार्य करावयाचेच आहे,’ असे अर्जुनास ठामपणे सांगून व प्रवृत्त करूनही नंतर म्हणतात की ‘तू त्याचा अभिमान मात्र धरू नकोस, पण कर्म तर केलेच पाहिजेस,’ मला हे समजत नाही की, कर्माला प्रवृत्त होणाऱ्या माणसात हेतू नसेल किंवा अभिमान नसेल, तर त्याचा बाणच लक्ष्यभेद करू शकेल? खेळ खेळणारेही खेळात अगदी अलिप्त राहून खेळू शकत नाहीत. स्वत:च्या बऱ्या-वाईटाचा जेथे प्रश्न येतो तेथे म्हणे आसक्तिरहित कर्म करावे, ते कसे संभवणार? मात्र सेवाभावी काम करून निष्काम कर्म कसे साध्य होईल याचे सूत्र आपल्या ग्रामगीतेत महाराज लिहितात,
खरी सेवा म्हणजे निष्काम कर्म।
परस्परांच्या सुखाचे वर्म
समजोनि करील जो त्याग-उद्यम।
तोचि सेवाभावी समजावा