राजेश बोबडे

धर्माची अपूर्ण कार्यसिद्धी व संस्थांच्या जबाबदारीबाबत श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचारकांना बौद्धिक देताना राष्ट्रंसत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, लोकांना एक वाईट खोड आहे. प्रत्येक जण दुसऱ्यावर टीका करतो. स्वत:चे दोष कधीच पाहत नाही. ही गोष्ट ठीक नाही. संस्थासुद्धा या वृत्तीला अपवाद नाहीत. त्यांनी परस्परांवर टीकाटिप्पणी करत बसण्यापेक्षा कामाला लागावे. प्रत्येक संस्थेच्या कामाचा संबंध सामाजिक विकासाशी असावा. संस्थेमुळे समाजाचा प्रत्येक विभाग विकसित व्हावा. हाच नियम श्रीगुरुदेव सेवा मंडळालाही लागू आहे. सेवा मंडळाच्या प्रार्थनेच्या आणि भक्तीच्या प्रक्रियेत सामाजिक विकासाचे दर्शन घडले पाहिजे. समाजाला कशाची गरज आहे आणि त्या गरजांची पूर्तता कोणत्या मार्गानी होणार आहे याचे चिंतन हा केंद्रिबदू असला पाहिजे.

ही प्रेरणा आम्हाला प्रार्थनेने मिळेल. आम्ही आमच्या कामासाठी परमेश्वराकडे शक्ती मागतो. परंतु याचा अर्थ असा नाही की सारे देवाने करावे आणि आम्ही निष्क्रिय व्हावे. आता आपला भारत स्वतंत्र आहे. येथे अनंत संप्रदाय असावेत आणि त्यांनी देशाचा कोपरा न् कोपरा विकसित करावा. जनतेला सरळ मार्ग सांगावा. या देशाचे लोक अंधश्रद्धेने कोणाच्याही मागे धावतात. प्रार्थनेचा सुद्धा तोल सुटू नये. लहान माणसाची प्रार्थना कराल तर लहान वस्तू हातात पडेल. डॉक्टरांची प्रार्थना कराल तर औषध मिळवाल. पहिलवानाची प्रार्थना कराल तर डावपेच शिकाल. परंतु ईश्वराची प्रार्थना कराल तर सारी दुनिया तुमची होईल. प्रार्थनेमुळे आम्ही विकसित व्हावे, सत्याकडे ओढले जावे आणि वाईटाचा त्याग करावा. प्रार्थनेचा संबंध स्वत:च्या आणि समाजाच्या विकासाशी आहे, हे लक्षात ठेवून आम्ही प्रार्थना करू ती एक मोठी शक्ती बनेल. अशी शक्ती सर्व धर्माच्या, संप्रदायांच्या, प्रत्येक संस्थेच्या आणि प्रत्येक संघटनेच्या संग्रही असावी. असे झाले म्हणजे मग या संस्था आणि संघटना समाजाला भार न वाटता आपल्या विकासाचे वाटाडे वाटतील. गुरुदेव सेवा मंडळालाही हाच नियम लागू आहे. अशा प्रार्थनेतूनच धर्माचे अपूर्ण कार्य पार पडेल. महाराज ग्रामगीतेत म्हणतात..

सर्व धर्माचा समन्वय।

विश्वशांतीचा उपाय।।

लोकसुधारणेचे विद्यालय।

 सामुदायिक प्रार्थना।।

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rajesh772@gmail.com,