राजेश बोबडे

मानव कल्याणासाठी साहित्यिकांकडून अपेक्षा व्यक्त करताना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, माणसाला मानव करावयाचे आहे; त्याला दानव होऊ द्यायचे नाही. त्याला सर्व जीवनाचे मनोहर हृदयंगम दर्शन घडवायचे आहे. त्यातले मांगल्य, त्यातले अभिजात सौंदर्य, त्यातले सारे वर्म व मर्म अनुभवावयाचे ज्ञान त्याला द्यायचे आहे. हे एक भव्य व दिव्य कार्य आहे. हे दिव्य कार्य साहित्यिकांनी करायला हवे. परंतु बरेच साहित्यिक विकृतीच्या मार्गाने जातात असे खेदाने म्हणावे लागते. कला, बुद्धी वा भावना यांचा दुरुपयोग होतो, तो होऊ नये. आमच्या साहित्यिकांनीही आपल्या साहित्याचा दुरुपयोग होणार नाही यासाठी जागरूक असले पाहिजे. आम्हाला सर्व गोष्टींची गरज आहे.

साहित्य हे मिरविण्यासाठी, झब्बूशाहीसाठी व दीन-दुबळय़ांच्या झोपडय़ा चिरडण्यासाठी नाही. जगाला जागवण्यासाठी, जगाच्या निरीक्षणासाठी, जगाच्या विशालतेत विलीन होण्याचे शिक्षण घेण्यासाठी साहित्य आहे. साहित्याने भराभर उडय़ा मारत अथवा अंतराळातून उडत जायला नको. अशा तकलादू क्षणजीवी साहित्याचे भवितव्य विनाशाकडे वळणारे असते. असे साहित्य जिवंतही राहत नाही, त्याचा उपयोगही होत नाही व परिणामकारकताही त्यात उरत नाही. लढाईत १०० वीरांवर वार करीत-मारीत समोर चाललात, मागे काय होत आहे इकडे तुमचे लक्ष नाही. वस्तुत: तुम्ही पुढे जात आहात आणि मागचे मरणारे उठून उभे होत आहेत. हे निष्फळ युद्ध आणि परिणाम न करणारी तुमची विनाशी कला एकाच कक्षेत येतात. याप्रमाणे लढणाऱ्या वीरांची गुलामी जशी नष्ट होत नाही तद्वतच तुमची ही वरवरची साहित्यनिर्मिती हीसुद्धा एक गुलामीच ठरते.

आमच्या समाजात उत्तम विचार, उत्तम गरजा यांची पूर्तता करावयाची आहे. तळमळ वाटणाऱ्यांनी हे करायला हवे. साहित्यिक त्यातून सुटत नाहीत. आचार-विचारांचा प्रचार नाही तोवर देशसुधारणेचा विचार व्यर्थ होय! आमच्या येथे शेकडा शंभर लोकांना तसा धर्म-समजतो पण त्यातही वास्तवता शेकडा दहांनाही कळत नाही. साप दिसला, भीती वाटली; झाला तो आमचा देव! झाड पडले, झाले झाड देव! जो आघात करील, जो दाखला देईल, तो आमचा धर्म होतो. आमच्या धर्मकल्पनांची, आमच्या सामाजिक जीवनाची ही अधोगती आहे. ही नष्ट व्हावी असे साहित्यिकास वाटणार नाही तर तो साहित्यिक तरी कसला? संपूर्ण लोकात मानवता वाढावी, विषमतेची दरी मिटावी व अधमता सोडावी ही धर्माची प्रगती आहे. समाजाची उन्नती आहे. साहित्यिकांचा हातभार यासाठी लागावा; नाहीतर ते केवळ भुईला भारच आहेत, असे नाइलाजाने म्हणावे लागेल. rajesh772 @gmail.com