राजेश बोबडे
वरील संतवचनाबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात ‘‘सर्वावर प्रेम करावं, कोणाला चोर म्हणू नये, कोणाला भला म्हणू नये, कोणी नीच नाही, कोणी उच्च नाही, कोणी सत्ताधारी नाही आणि कोणी प्रजाधारी नाही- वगैरे वगैरे. हे सर्व डोळे लावून घरात बसून समजून घ्यायला उत्तम आहे; पण अनेकांना भेटण्याचा, अनेकांना घेऊन चालण्याचा, संघटन करून ते टिकविण्याचा प्रसंग येईल तेव्हा कळेल की- कसे सर्वाना वागविता ते!’’
‘‘‘न म्हणे कोणासी उत्तम – वाईट’ – म्हणणारे संत तुकारामादि, जेव्हा लोककल्याणाच्या शाळेत उतरतात तेव्हा त्यांचे शब्द ऐकले का तुम्ही? तेच म्हणतात- ‘काय माय गेली होती भुतापासी, हरि न ये मुखासी अरे मूढा!’ मग सांगा-कुणाला वाईट न म्हणताच लोक – संघटन करणारा, कुणाला दंड न देताच राज्य चालविणारा व कुणाला तुच्छ न लेखताच उत्तम कामाची निपज करणारा मनुष्य आढळू शकतो काय? मग जे सर्वानाच उत्तम मानतात; त्याचा तरी अर्थ वेगळा असला पाहिजे ना? नाहीतर गधे आणि घोडे एका रांगेत बसवून ‘मला सर्वत्र गधे दिसतात’ हेही खरे नव्हे व ‘सर्वत्र घोडे आहेत’ हेही म्हणणे इष्ट नव्हे. तेव्हा सर्व बरोबर दिसतात, हे म्हणायला त्यांना निराळे नाव तरी ठेवावे लागेल, की- जे तत्त्व दोघांनाही समान आहे, जे व्यवहारात कधीच उतरत नाही व पाहणाऱ्यांची दृष्टी त्याच तत्त्वाची असावी लागेल. तर मग ते स्वत:ही व्यवहारात राहणे, कसे शक्य आहे- जर आत्मतत्त्वच त्यांना सर्वत्र दिसते.’’
‘‘अशा अवस्थेतही जर त्यांना जेवण दिसते, भूक दिसते, संत-देव-राक्षस-माणूस दिसतात तेव्हा त्यांच्यातील ही आत्मवत्-दृष्टी स्वानुभूतीने कशी काम करते? असे अनेकानेक प्रश्न जर साधकाने विचारले तर त्यांचे समाधान आपण कसे करणार? त्यांचे असे समाधान आपण करू शकतो की ‘व्यवहारात आपण तसेच भिन्नपणाने वागावे पण परमार्थात मात्र तसे बोलू नये, कारण त्याने वेदांताचा अपमान होईल!’ हे म्हणणे तुम्हाला आवडेल का? आंधळय़ाने ‘काय वेडगळपणा चालला आहे?’ असे म्हणणे क्षम्य होईल, कारण त्याला निदान हे जग दृष्टिगोचर झालेले तरी नाही, पण डोळसाने, चूक करणाऱ्याला- ‘तुम्ही बरोबर आहात’ व चूक न करणाऱ्यालाही ‘बरोबर आहात’, असे म्हणून भागेल काय? जर तो तसे म्हणाला, तर ऐकणारे म्हणतील- ‘‘या ‘बरोबर’ म्हणणाऱ्याला आधी हिमालयात पाठवा, नाहीतर कोंडून तरी ठेवा!’’ तेव्हा ‘साधूंनी कशाला या फंदांत पडावे की एकाला म्हणावे, तू मूर्ख आहेस व दुसऱ्याला म्हणावे – शहाणा! – हे म्हणणे बरोबर वाटते का तुम्हाला?’’
‘‘मित्रहो! माझे मन तर या विचाराने गोंधळून गेले आहे; कारण मी जनतेपेक्षा पुष्कळ पटींनी ‘सर्वच बरोबर आहे’ असे मानणारा व मानत आलेला माणूस आहे. पण जेव्हा ‘नाटक सुरळीत चालविले पाहिजे, कुणावर कुणाची कुरघोडी नको व यासाठी समभावनेने, न्यायाने वागणारे लोक हवे आहेत,’ असे वाटते व त्यासाठी अशा प्रकारे प्रत्यक्ष कार्यात उतरावे लागते तेव्हा ही समाधी भंग पावल्याशिवाय राहत नाही. त्या वेळी पुन्हा एक त्रास सुरू होतो.