scorecardresearch

चिंतनधारा : लोकोद्धारासाठी ‘बाजी’ हवीच!

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बुवा व बाजी याविषयी विवेचन करताना म्हणतात : संतांची व देवाची ‘कृपा’ तर एवढय़ा मोठय़ा लोकसमुदायाच्या तोंडात आहे.

thoughts of rashtrasant tukdoji mahara
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

राजेश बोबडे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बुवा व बाजी याविषयी विवेचन करताना म्हणतात : संतांची व देवाची ‘कृपा’ तर एवढय़ा मोठय़ा लोकसमुदायाच्या तोंडात आहे की ज्यांना ‘लोकांचे पुढारी’ नव्हे ‘देव’ असे मानले जाते, त्यांना त्यात सहभागी व्हावे लागते. आणि त्याचा अर्थ काही लोक तर असा करतात की- ‘‘आम्ही काहीही न करता वा हातही न हलवता संत सर्व करून देतात; अशी संतांची कृपा लांबलचक असते’’ हा लोकांचा तयार झालेला समज आहे. हे सर्व समज, गैरसमज काढण्यासाठी, तेही भोळय़ा नि लोभी स्वार्थी लोकांतून काढण्याकरिता काय थोडा प्रयत्न करावा लागेल असे आपल्याला वाटते? आणि तो करतानाही तुम्हाला एक ‘बाजी’च निर्माण करावी लागणार नाही का? अहो, रुतलेल्या काटय़ालाही काटय़ानेच काढावे लागत असते; मग लोभी समाजात आपल्याला निव्वळ लेख लिहून आणि एखादे व्याख्यान देऊन कसे भागेल? महाराज प्रश्न करतात की, चांगले सांगा अथवा वाईट. पण सांगाल तर त्याच लोकांच्या जवळ ना! आणि लोकांच्या जवळ सांगताना ते लोक तर तुमच्याशी संबंध ठेवतीलच आणि संबंध ठेवला की त्यांच्या भावना तुम्ही तलवारीने वा यंत्राने तर काढूच शकणार नाही; त्यांच्या समजाप्रमाणेच त्यांना समजवावे लागेल ना?  महाराज आपला अनुभव सांगतात की दुसऱ्या बुवांच्या काही भक्तिभावाचे लोक माझ्याजवळ एकदा आले व डोक्याला चंदन लावून फुले ठेवून तीर्थ घेण्याकरिता बसले. मी त्यांना मोकळय़ा मनाने सांगितले की- ‘‘बंधूंनो! मला असल्या अवडंबर व व्यक्तिस्तोम वाढविणाऱ्या गोष्टी आवडत नाहीत. आपण असे करणे बरे नाही. या, भेटा, वाटल्यास माझ्या हाती फूल द्या व सर्व लोक जसा उभ्याने ‘नमस्ते’ करतात तसाच मलाही तुम्ही नमस्ते करा, मीही त्याचा स्वीकार माणुसकीच्या नात्याने तुम्हाला ‘नमस्ते’ म्हणूनच करीन,’’ पण त्यातील एक महिला होती, ती  महाराजांना प्रश्नाच्या स्वरात म्हणली- ‘‘वा! कुणाच्या भक्तिभावास तुम्ही का अडथळा करावा? काय देव आपल्या मनाचा असतो? तो तर असतो भाविकाचा जसा ठेवला तसा! मग त्यांना आपण तीर्थ का घेऊ देत नाही?’’ मी म्हणालो – ‘‘बाईसाहेब! तो प्रश्न असेल देवाचा; मी माणूस आहे. माणसाची देवाप्रमाणे अभिषेक करून व सहस्र तुळशी वाहून पूजा करणे नि तीर्थ घेऊन लोकांत फेकणे मला जहरापेक्षाही खराब वाटते.’’ असे ऐकल्यावर बाकीचे लोक काय ते समजले, पण ती काही ऐकेना! शेवटी ती म्हणते- ‘‘जसा तुमचा नियम, तसाच आमचाही नियम आहे ना? त्याला आपण काय कराल?’’ असे म्हणून तीर्थ घेण्याला तिने आपला ग्लास पुढे केला व ‘मी काय करू’ असे ठरवण्यास माझे काही दिवस गेले असा महाराजांना अनुभव आला. लोक आपल्या स्वार्थाकरिता काय करतील हे लक्षातच येणे दुर्लभ आहे!

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 00:02 IST

संबंधित बातम्या