राजेश बोबडे डॉ. राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रपती भवनात गेले होते. तिथे रक्तबंबाळ लढाईचे तैलचित्र पाहून ते राजेंद्रबाबूंना म्हणाले, ‘‘हे चित्र माणसाचे नव्हे, रक्तपाताचे आहे; आणि हाच आदर्श समोर ठेवून मानवाने जीवनाला संग्रामाचे रूप दिले आहे.’’ माणसाचे चित्र केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न महाराजांना पडला. या प्रसंगाला अनुसरून महाराज म्हणतात : मनुष्याला खराखुरा मानव बनविण्यासाठीच सर्व धर्मकर्मे, तीर्थव्रते आणि ग्रंथपंथ वगैरे थोर पुरुषांनी लोकांत रूढ करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच साधनांचा आधार घेऊन ‘तुझ्यापेक्षा माझे श्रेष्ठ’ म्हणून माणूस माणसाशी लढू लागला. स्वार्थासाठी, स्त्री-धन-मान-सत्ता यासाठी लढण्याची लत लागलेला माणूस देवधर्मपंथ यांचेसाठीही लढतच आला. अर्थात् खरी मानवता त्याच्या हृदयात प्रगट करण्याचा जो संतश्रेष्ठांचा हेतू आजही पूर्ण झालेला नाही. ओढाताण, शोषण, युद्ध, रक्तपात यांचीच पुन:पुन्हा पुनरावृत्ती होत आलेली आहे. माणसाचे चित्र अजून अपुरेच आहे. माणसाचे हे चित्र पूर्ण केव्हा होणार? माणूस दुसऱ्यास पूर्ण करण्यासाठी धाव घेईल तेव्हाच! त्याने लाठीपासून तोफा, मशीनगन व अणुबाँबपर्यंत नवनवी शस्त्रास्त्रे शोधली, पण यांनी जग सुखी झाले आहे का? आपले लहानसे कुटुंब, छोटीशी जात किंवा एवढेसे राष्ट्र याच्या अहंकारात गुरफटून न जाता, ‘जगातील काही कोटी माणसे हेच माझे कुटुंब आहे’ असे समजून सर्वाच्या सुखाचा विचार का करू नये? ज्या दिवशी मानव आपली भावना इतकी विशाल करील त्याच दिवशी त्याचे चित्र पूर्ण झाले असे म्हणता येईल. माणसाला आदर्श माणूस बनविण्यासाठीच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास किंवा गोस्वामी तुलसीदास यांसारख्या सर्व महापुरुषांनी फार मोठे कार्य त्या त्या काळाला अनुसरून केले. परंतु एकीकडे काही लोकांनी ‘टाळकुटे’ म्हणून त्यांची उपेक्षा केली तर दुसरीकडे लाखो भाविकांनी त्यांचा जयघोष करूनही त्यांच्या उद्देशांना हरताळ फासला. आजही करोडो लोक त्यांच्या नावावर तीर्थस्थानी मोठय़ा श्रद्धेने जमतात, पण थुंकावे कोठे याचा विचारदेखील त्यापैकी बहुतेकांना करता येत नसतो, मग माणसांचा विकास होणार तो केव्हा आणि कसा? यासाठी आजच्या सर्व विधायक कार्य करू इच्छिणाऱ्या संस्थांनी विचार करून निश्चित दिशा आखली पाहिजे. संस्थाबळ वाढवणे निराळे व त्यातून जिव्हाळय़ाचे कार्यकर्ते कामास लावणे निराळे ! लाखो लोकांसमोर व्याख्यान देताना हर्ष वाटला तरी दहा लोकही त्यातून कार्यासाठी मिळत नाहीत; हा अनुभव कटू वाटतो, पण तो खरा आहे. उत्तम कार्यकर्ती माणसे कशी निर्माण करता येतील हा प्रश्न सर्वानी मिळून सोडवला पाहिजे व अशा सेवाभावी लोकांकडून मानवाचे अपूर्ण चित्र सुंदर रूपात पूर्ण करण्याचे महत्कार्य सर्वानी करून घेतले पाहिजे. सगळय़ा सेवाभावी व राष्ट्रधर्मी संस्था मनावर घेतील तर, महापुरुषांचे हे अपूर्ण राहिलेले कार्य ताबडतोब पूर्ण झालेले दिसेल.