राजेश बोबडे

आपल्या सोयीप्रमाणे धार्मिकतेचा अर्थ लावणाऱ्या प्रवृत्तीवर प्रहार करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘स्वत:ला धार्मिक म्हणवणारा जगावर कोणताही प्रसंग गुदरला तरी डोळे भरून पाहून द्रवून तो गरिबांना किंवा मजुरांना मदत किंवा सवलतसुद्धा कधी देणार नाही. कारण तो समजत असतो की हा धर्म नव्हे व हे मजूर म्हणजे काही बुवा किंवा अमावास्या- पौर्णिमा सांगणारे नव्हेत, तसेच नात्यागोत्याचे किंवा मला खूश करणारे (खुशमस्करे) नव्हेत. मग मी त्यांना का द्यावे? असे म्हणून तो लोकांचे हाल मोठय़ा आनंदाने पाहतो. तेव्हा भुकेले लोक कोठवर भुकेच्या कळा सोसतील? ते चिडून घरात घुसू लागले की मग रावसाहेबांची तारांबळ पाहून घ्यावी. तो चिडून ओरडतो- अरे! थांबा, कशाला जाता तिकडे? माहीत नाही का तुम्हाला तिथे माझे देव- माझी गीता आहे ती? माझ्या पूजेची आहे ती. खबरदार तिला हात लावाल तर- असे बडबडत चिडलेल्यांच्या धाकाने मागे मागे सरत बाहेर निघून येतो आणि लोक जेव्हा अन्नान्नदशेमुळे धान्य लुटून नेऊ लागतात तेव्हा हातपाय आपटून क्रोधाने म्हणतो की- या देवात आणि धर्मात काय अर्थ आहे? हे मरतुकडे लोक माझ्या घरात घुसून खुशाल धान्य नेत आहेत. मग या देवाचा महिमा राहिला तरी कुठे? धिक्कार असो या सर्व देवाधर्माचा, असे म्हणून खुशाल देवपाट उचलून (साधासुधा असल्यास) घरच्या विहिरीत नेऊन टाकतो किंवा सोन्यारुप्याचा असल्यास आटवून दागिन्यांत भर घालतो. वाहवा रे! देवाची आणि धर्माची व्याख्या करणाऱ्या नरोत्तमा! तुझा देश, तुझा धर्म, तुझा परमार्थ हेच का सांगतो तुला, असे त्यास चिकित्सक लोक म्हणू लागले तर मी म्हणेन – त्याचे म्हणणे तरी कुठे चुकते आहे? परमार्थाच्या अंतिम सिद्धांतानुसार जे पुढारी माहात्मे संसार तुच्छ किंवा मिथ्या आहे, असे सांगत आले, त्यांचीच नक्कल करणारे बुवा जर आपल्या काखेत दक्षिणा, शेती, घरे व जहागिऱ्या घेऊन चैन करताना दिसतात तर लोकांना तरी कसा प्रकाश लाभावा? त्यांनी त्यांच्या तत्त्वज्ञानावर विश्वास तरी कसा ठेवावा? आपल्या सोयीप्रमाणे धर्म व भक्तीचा अर्थ लावणाऱ्यांना भजनातून संदेश देताना महाराज म्हणतात,

ही का भक्ति खरी?

पळते मन बाहेरी।

देह देवापुढे,

लक्ष जोडय़ाकडे।।

नेत्र ते वाकडे।

हात चोरी करी।

दास तुकडय़ा म्हणे।

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कैसा भेटे हरी?