राजेश बोबडे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात ख्रिश्चन मिशनऱ्यांना मी दोष का देऊ? जेथे तुमचा साधू पोहचत नाही तेथे सात हजार मैलावरील नवतरुण व नवतरुणी सेवेचे व्रत घेऊन घरदार सोडून काम करतात. तुम्ही मात्र कोऱ्या कल्पनेतील वेदांताची शुष्क चर्चा करीत राहता. दोष आमचाच आहे. आम्ही सर्वजण मानवसेवेच्या विशाल भावनेने मानवापर्यंत पोहचलोच नाही. अध्यात्मालाही सक्रियता हवी. धर्मप्रसारालाच धर्म समजून विदेशी लोक येथे येतात, ती आकुंचित दृष्टी आहे. हे मान्य करूनही आम्हाला आमचे दोष नाकारता येत नाहीत. आमचे साधु जनतेला कोठे देतात शिक्षण आणि दीक्षा ? क्षमा करा, सत्य आहे, या देशातील संन्याशी आणि वानप्रस्थ लोकांचे कार्य खांद्यावर एक कांबळी व हातात व लाठी घेऊन घराघरांत धर्माची प्राथमिक जाणीव देण्याचे होते. आजच्या संतमंडळीवर हेच काम करण्याची खरोखर जबाबदारी आहे. असे विचार १९५५ मध्ये अमृतसर येथे अखिल भारतीय वेदांत परिषदेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मांडले. महाराज पुढे म्हणतात की, याच दृष्टीने मी संतमंडळींशी चर्चा केली, या संतांचे एक संघटन व्हायला हवे. या संघटनेतून भारताच्या कानाकोपऱ्यात प्रगतीपर कामाची लाट आम्ही उठविली पाहिजे. ऋषितत्त्वे पुन:पुन्हा खेडय़ांना सांगून आम्हाला उच्चतेकडे जायला हवे. सनातनधर्म मानवी बुद्धीतून निर्माण झाला नाही.
आज मानवी बुद्धीच्या जंजाळात गुरफटलेला पुरुष समाधान मिळवू शकत नाही. सनातन तत्त्वानीच आज प्रगतीकडे आम्ही जाऊ शकतो, परंतु केवळ पुस्तकी वेदांत म्हणजे सनातनत्व नव्हे. पुस्तके ज्ञानार्जनाची साधने आहेत. घोडय़ाला पाण्यापर्यंत पोहचविण्याचे काम स्वार करू शकतो; त्याच्या मुखात पाणी ओतू शकत नाही, तद्वतच पुस्तकांचे आहे. माझ्या हृदयाला जर चांगली गोष्ट पटली तर ती पुस्तकात नाही म्हणून त्याज्य ठरत नाही किंवा सनातन धर्माला तिच्या आचरणाने बाधाही येत नाही. तत्त्वाला अडथळा होत नाही. नाटकात काम करणारे नट विभिन्न मुखवटे चढवूनही आपल्या मूळरूपास विसरत नाहीत. नाटक संपले की पुन्हा ते सारे एक होतात. प्रकृतीचे नाना वेष चढवून कामाच्या मैदानात माणूस उतरला म्हणून त्याच्या मूळ रूपाला बाधा येणार नाही. संतांनी जनसेवेच्या आखाडय़ात उतरल्यावर आपल्या मूळरूपापासून दूर जाण्याची भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. साधुसंतांनी व्यावहारिकतेकडे नितांत लक्ष द्यावे ; ईश्वराची व काळाचीच ही इच्छा आहे. काळाचा आघात सर्वावर होतो. उद्या आमचेही भविष्य या आघातापासून अलिप्त कसे राहील ? आमच्या उटपटांग गोष्टी अशाच चालू राहिल्या तर शासन आमच्या वागणुकीचा विकृत अर्थ लावील व साधुसंत, त्यांचे मठ यावर वरवंटाही फिरू शकेल. ‘परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम्’ याचा हा अर्थ नाही की देव साधूचा वेष घेणाऱ्यांचे रक्षण करील. साधुवेष घेऊन आम्ही जर ‘दुष्कृत’ अर्थात् अनाचारी होऊन आपले कर्तव्य विसरू तर देव आमचाही नाश केल्याशिवाय राहणार नाही. जनतेचा विश्वाससुद्धा आम्ही गमावून बसू. यासाठी साधुसंतांनी काळाची पावले ओळखून आपल्या मार्गाचे ओघ सेवाक्षेत्राकडे वळविले पाहिजेत, अशी अपेक्षा महाराज साधुसंतांकडून करतात.