राजेश बोबडे

शिफारस व बेइमानीच्या दुनियेत जिकडेतिकडे स्वार्थाधता पसरल्यामुळे माणसांचे व्यवहार भ्रष्ट झाले, असे स्पष्ट करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात : उदात्त भाषा बोलून स्वार्थ व सत्ता मिळविण्याचा हव्यास काही आवरत नाही. मनाला व या प्रवृत्तीला आळा घालणारेही त्याच मार्गी लागले आहे असे दिसून येते. आता एकतर जनमनाला जागृती होऊन त्यानेच आपला न्याय मिळवून घेतला पाहिजे. न्यायाचे, सत्याचे, चारित्र्याचे आंदोलन निर्माण करावयास पाहिजे असे झाल्यामुळे लाचलुचपत, काळाबाजार हे धंदे करून जगणाऱ्या माणसाला दहशत बसली पाहिजे. आज अशा दुराचारी लोकांना समाज प्रतिष्ठा देतो. यापुढे मात्र समाजाने अशा लोकांची छी:थू करून पुन्हा असे न करण्याची जाहीर शपथ त्याच्याकडून घेतली पाहिजे. प्रामाणिकपणाने वागण्यास त्यांना भाग पाडले पाहिजे. असे होणे अत्यंत जरूर आहे. नाहीतर एक दिवस लोकांना सुखासुखी जगणेसुद्धा मुश्कील होईल असे भविष्य दिसू लागले आहे. कारण कायदासुद्धा भित्रा बनला आहे. त्याला आपला मोठेपणा शिफारशीवर टिकवावयाचा आहे. त्याचप्रमाणे नेते, पुढारीही आपल्या अन्यायी मित्रांना भूत मागे लागल्यासारखे भिऊ लागले आहेत.

नेते निवडणुकीवर लक्ष ठेवून आपले व्यवहार करतात आणि साधूसंत आपल्या भोजन-भेटीची व्यवस्था सांभाळून अन्यायाचा प्रतिकार करतात. अशा वृत्तीने का देश प्रगतीला पोचणार आहे? असा प्रश्न करून महाराज म्हणतात  : काही लोक म्हणतात, अहो, सांभाळून नेले पाहिजे. पण माझ्या हे लक्षात येत नाही की स्वत:ची चूक सांभाळून न्या म्हणणारे लोक दुसऱ्याची चूक का सांभाळून नेत नाहीत? माझ्या चुकीची शिक्षा मी भोगलीच पाहिजे असे म्हणणारे लोक समाजात का निपजू नयेत? माझ्या चुकीची शिक्षा, माझ्या करणीचे फळ मी भोगणार या वृत्तीची वाढ हीच खरी जीवाची प्रगती होय. संत तुकारामाच्या म्हणण्याप्रमाणे-

‘आपली आपण करा सोडवण

 अन्याय – बंधन, तोडूनिया ।’

असे झाले तरच सर्वाना सुखकर होईल. बेकायदा कामे व शिफारस या गोष्टीचा अंमल समाजात प्रस्थापित झाला तर मुजोर व शिरजोर सुखी राहतील. पण असे होणे सृष्टीनियमाच्या विरुद्ध आहे. सध्याचा काळ मात्र असा विपरीत आहे. आधी घर फिरले की आधी आढे फिरले याचा अंदाज करता येऊ नये असा. पण या फिरलेल्या परिस्थितीत आम्ही मानव सध्या वावरतो आहोत. बघू या आमचे दिवस कधी आणि कसे येतात ते!

असा आशावाद व्यक्त करून महाराज ग्रामगीतेत म्हणतात..

गोंधळवोनि टाकिले जनमना

 झाला प्रेम-शक्तीचा धिंगाणा।

जिकडे पाहावे तिकडे कल्पना

फुटीर वृत्तीच्या ।

नाही कोणा सेवेचे भान

 घालिती सत्तेसाठी थैमान।

गाव केले छिन्नभिन्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 निवडणुकी लढवोनि ।