राजेश बोबडे

१९४९ सालच्या भारतातील परिस्थितीविषयी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी व्यक्त केलेले चिंतन आजही तंतोतंत लागू पडते. महाराज म्हणतात, ‘‘भारतात आजवर धार्मिक लोकांनी क्रांती केली आहे. त्यांनी समाजाला श्रद्धेच्या व धर्माच्या मार्गाने नेऊन त्यांची धारणा मजबूत केली. पण आज त्याच धार्मिक क्षेत्रातील बुवा लोक संप्रदायाचे आग्रही आणि अध्यात्माचे व्यापारी झाले आहेत. कधीकाळी जी तीर्थक्षेत्रे धर्म व अध्यात्माची महान विद्यालये व प्रचार केंद्रे होती तीच क्षेत्रे आज धर्माच्या नावाखाली स्वार्थाच्या बाजारपेठा झाली आहेत. कमी-अधिक प्रमाणात बहुतांश धर्मात हेच सुरू आहे. वस्तुत: भारतीय संस्कृतीची शिकवण अशी की महात्मा म्हणजे धार्मिकतेने समाजसेवा करणारा पुरुष. अशा सेवकांनी कुंभासारख्या मेळय़ाच्या किंवा आपल्या विविध यात्रांच्या निमित्ताने एकत्र यावे. भारताच्या परिस्थितीची चर्चा करून उन्नतीचे मार्ग शोधावे, ही खरी तीर्थक्षेत्राचे व यात्रांच्या आयोजनामागील योजना व खरा उद्देश.’’

‘‘आज दुर्दैवाने तेच, वैरागी वा बुवा म्हणविणारे स्वार्थ साधण्यात व आपआपला संप्रदाय जगविण्यात मग्न आहेत! जे आजच्या काळातही आपले वैराग्य व नि:स्पृहता टिकवून आहेत, त्यांनी त्याचा उपयोग फक्त वैयक्तिक समाधानासाठी केला आहे. जर अशा महापुरुषांनी प्रचारकार्य हाती घेतले, एकेक प्रांत कार्यक्षेत्राच्या दृष्टीने वाटून घेतला, तर एक- दोन वर्षांत भारत उन्नत होईल! पण त्यांच्या डोळय़ांत भ्रमाचा असा काही मोतिबिंदू पडला आहे, की ते या कार्यास भ्रष्टता समजतात. आजची एकंदर परिस्थितीच अशी आहे की कार्य करणाऱ्याच्या वाटेत मुद्दाम अडथळे निर्माण केले जातात. कार्य न करावे तर पाणी घरात शिरून नाकातोंडात जाऊ लागले आहे! वीरता दाखवावी तर साथीदार कोणी नाही! आणि नम्र रहावे तर अन्यायी छातीवर बसतात! घराबाहेर सेवेसाठी निघावे तर साथ देण्याची कोणाची तयारी नाही! ज्या देशातील लोकांना धार्मिकतेने वागण्याचे स्वातंत्र्य नाही, त्या देशातील लोक जगतातच कसे हे मला समजत नाही. म्हणून मी म्हणतो की, घरावर तुळशीपत्र ठेवून धार्मिकतेने वागण्याच्या स्वातंत्र्यासाठी बाहेर पडलेच पाहिजे.’’

‘‘स्वातंत्र्याचा खरा अर्थ हाच ना की प्रत्येकास दुसऱ्याच्या हितास धक्का न लावता स्वत:च्या गुणांचा विकास करण्यास मुभा असावी. समाजात गैरव्यवस्था नसावी. अशी वस्तुस्थिती असताना आज मात्र स्वराज्याचा अर्थ एकाने दुसऱ्यावर स्वार्थासाठी दडपण आणण्याची मोकळीक असा लावला जातो. लोकांना कोणता मार्ग आखावा हे समजत नाही. लोक म्हणतात की ईश्वर सर्व करील. पण ईश्वराने काही ठेका घेतलेला नाही की त्यानेच लोकांना मनुष्य बनवावे. अवताराची चरित्रे सांगतात की त्या वेळी लोकांनी संघटित होऊन हाक दिली होती, ‘परमेश्वरा तू आमच्या रक्षणार्थ धावून ये’ आज तर एकाच घरातल्या चार जणांचे पटत नाही. मग गावातील व राष्ट्रातील लोक संघटित होणे दूरच राहिले. ते जोपर्यंत संघटित होऊन परमेश्वरास हाक देत नाहीत, तोपर्यंत परमेश्वर प्रकट होणे कठीण नव्हे, तर अशक्य आहे.