– विजय केंकरे
दिलीप प्रभावळकर एका फार्मास्युटिकल कंपनीत नोकरी करत होते. रंगायनने विजय तेंडुलकर लिखित, अरविंद देशपांडे दिग्दर्शित ‘लोभ नसावा ही विनंती’ या नाटकाद्वारे त्यांना शारदाश्रमच्या परिघातून बाहेर आणलं. त्यानंतर प्रायोगिक नाटक, राज्य नाट्यस्पर्धा असा प्रभावळकरांचा प्रवास सुरू झाला. ‘अलबत्या गलबत्या’मधील चेटकीण, तर दुसरीकडे ‘चुटकीचं नाटक’मधला सूत्रधार, ‘इंद्राचं आसन, नारदाची शेंडी’मधला इंद्र, ‘धडपडे बडबडे मारकुटे आणि मंडळी’मधला मास्तर अशा भूमिकांमधून मी त्यांना पाहात होतो. आणि अचानक मला त्यांनी विजय तेंडुलकरांच्या ‘विठ्ठला’मध्ये थक्क केलं. या सगळ्या भूमिकांपासून प्रभावळकरांच्या ‘बिकट वाट वहिवाट’ या पहिल्या व्यावसायिक नाटकापर्यंत त्यांची विभिन्न रूपं मी रंगमंचावर पाहिली. आणि हा दिलीप प्रभावळकर नामक अभिनेता हळूहळू मला उलगडत गेला.
एव्हाना रंगभूमीबरोबरच चित्रपटात काम करायला प्रभावळकरांनी सुरुवात केली होती. पाक्षिकात सदर लेखनही सुरू होतं. एकंदर या नटात काहीतरी जादू आहे हे तेव्हा जाणवत होतं. पुढे त्यांच्याबरोबर काम करताना अधोरेखित होत गेलं की, दिलीप प्रभावळकर हे असे अभिनेते आहेत, ज्यांना स्वत:तल्या त्रुटी पूर्णपणे माहिती आहेत आणि त्या त्रुटींवर मात कशी करायची हा विचार ते आधी करतात. म्हणजे एखादा सर्वसामान्य अभिनेता जसा विचार करतो तसा न करता ते आधी पात्राच्या रूपाचा विचार करून मग त्याच्या आत्म्याकडे जातात. भूमिकेच्या गाभ्यात शिरण्याआधी ती व्यक्तिरेखा कशी दिसेल, इथून सुरू करून हळूहळू ते त्यांच्यातल्या त्रुटींवर मात करतात. त्यांच्याबरोबर दिग्दर्शक म्हणून ‘‘जावई माझा भला’’ हे माझं पहिलं नाटक करताना मला जाणवलं की, हा अभिनेता चांगल्या अर्थाने असुरक्षित किंवा अस्वस्थ आहे. ते कधीच समाधानी नसतात. ते सारखं विचारत राहतात. हे करू का? ते करू का? हे करून बघायचंय का? की ते करायचं ? आणि असं असतानाही ते दिग्दर्शकाला पूर्णपणे समर्पित होतात, हे त्यांच्याबाबतीत फार महत्त्वाचं आहे.

निरीक्षणाची ताकद

दादरच्या शारदाश्रमसारख्या सोसायटीत राहिल्याने तिथलं मध्यमवर्गीय वातावरण, माणसं याचा एक विशेष पगडा त्यांच्यावर आहे. ‘जावई माझा भला’ नाटकात मुलीवर जिवापाड प्रेम असलेला बाप त्यांनी बारिकसारिक तपशिलांसह कमाल साकारला. साहित्याची समज उत्तम असल्यामुळे नाटकाचं, भूमिकेचं आकलन त्यांना सहज होतं. निरीक्षण ही त्यांची महत्त्वाची शक्ती आहे. मुळात त्यांचा पिंड विनोदी असला तरी हा विनोद त्यांच्या निरीक्षणातूनच आलेला आहे. आजूबाजूच्या गोष्टी बारकाईने टिपून त्यांचा वापर करणं, ही त्यांची खासियत आहे. त्यांच्या निरीक्षणातून सजीव आणि ठाशीव झालेल्या असंख्य भूमिकांमध्ये ‘चौकटराजा’मधील नंदू, ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘लगे रहो मुन्नाभाई’मधील बापू या भूमिका त्यांच्या कारकीर्दीतल्या महामेरूच. ‘वाह गुरू’मध्ये व्हीलचेअरला खिळलेलं, हालचाल नसलेलं, मोटोरन्युरॉन या दुर्धर आजाराशी लढा देणारं प्राध्यापक सप्रेचं पात्र त्यांनी साकारलं. अत्यंत अवघड अशी ही भूमिका! आजारामुळे आयुष्याकडे अत्यंत भकास होऊन बघणारं हे पात्र. पण जगण्याची ऊर्मी त्याच्यात निर्माण होत असताना त्याला मरण यावं, असा त्यातला मुद्दा होता. ही भूमिका प्रभावळकरांना पूर्णत: कळली नि त्यांनी परिणामकारकरीत्या ती मांडली.

मला एकदा त्यांच्याशी बोलताना कळलं की, त्यांचा ऑर्केस्ट्राशी आधी संबंध होता. त्यामुळे ते अतिशय उत्तम माऊथ ऑर्गन वाजवायचे. मग मी ‘वाह गुरू’च्या वेळेस ‘आपण युरोपियन नाट्य संमेलनात नाटक करतोय, तर तुम्ही तो वाजवा’ म्हणून त्यांच्या मागे लागलो. आणि त्यांनी तो बरोबर वाजवला. त्या तेवढ्या पीसनेही नाटकात कमाल परिणाम साधला. याचा अर्थ त्यांना लयीची समज उत्तम आहे आणि ती त्यांना अभिनेता म्हणून जास्त उपयोगी ठरते. अभिनेते म्हणून त्यांची समज, त्यांचं विज्ञान शाखेतील शिक्षण, त्यांची हुशारी, अभ्यासू वृत्ती या त्यांच्या खास जमेच्या बाजू. पण या अभ्यासूपणाचं स्तोम ते कधी माजवत नाहीत. एकदा अचानक मला म्हणाले, ‘मी ब्रेकफास्टला येतोय तुझ्याकडे’. त्यासाठी ते दादरहून वांद्र्याच्या घरी मुद्दाम येतायत, हे आश्चर्यकारक होतं. भेटल्यावर कळलं की वांद्र्याला ज्येष्ठ संगीतज्ञ अशोक रानडे यांच्या घरी आवाजाच्या वर्कशॉपसाठी ते येत होते. आपण इतकी वर्षं रंगभूमीवर काम करतोय तर आवाजाची मशागत गरजेची आहे, हे त्यामागचं कारण होतं.

चोखंदळपणे निवड

आमचे नाट्यगुरू शंभू मित्र म्हणतात, ‘नट हा स्वत:च स्वत:चे इन्स्ट्रुमेंट आहे!’. प्रभावळकर यांना हे बरोबर उमगलं आहे. भूमिका निवडीबाबत ते खूप आग्रही असतात. चिमणरावपासून ते अलबत्या गलबत्या, पळा पळा कोण पुढे पळे तो, एक झुंज वाऱ्याशी, नांदा सौख्य भरे, संध्याछाया, घर तिघांचं हवं, वासूची सासू, नातीगोती, जावई माझा भला, आरण्यक, आप्पा आणि बाप्पा, वाह गुरू, कलम ३०२ या आणि अशा कितीतरी वैविध्यपूर्ण भूमिका त्यांनी साकार केल्या. ‘वासूची सासू’, ‘हसवाफसवी’ करत असताना त्यांनी ‘नातीगोती’ सारखं गंभीर नाटक निवडून स्वत:ला विनोदी नटाचा शिक्का लागण्यापासून दूर ठेवलं. म्हणजे ‘नातीगोती’ आणि ‘एक झुंज वाऱ्याशी’ हे त्यांनी त्या वेळी घेतलेले जाणीवपूर्वक निर्णय होते. आजही कारकीर्दीच्या या टप्प्यावर एका वेळी अनंत महादेवनसारख्या दिग्गज दिग्दर्शकासोबत ‘आता वेळ झाली’सारखा आयुष्याच्या सांजकाळावर आधारित चित्रपट आणि लगेचच सुबोध खानोलकरसारख्या नव्या दमाच्या तरुण दिग्दर्शकाबरोबर ‘दशावतार’मधली आव्हानात्मक अशी भूमिका करतात. हे सगळं हुशारीने आणि चोखंदळपणे निवडणारा हा कलाकार आहे. अभिनयातली विविधता त्यांनी आपल्या लेखनातही जपली आहे. गुगली, फसगत, अनुदिनी, चुकभूल द्यावी घ्यावी, बोक्या सातबंडे किंवा एका खेळियाने ही त्यांची लेखनातली मुशाफिरीदेखील थक्क करणारी!

स्वत:कडे वस्तुनिष्ठपणे पाहून हा माणूस जाणीवपूर्वक काम करतो आणि ते करताना आपल्या कामाचं दस्तावेजीकरणही करून ठेवतो. पुन्हा त्यात कुठेही अभिनिवेश नाही. अभिनेते म्हणून प्रभावळकर जितके उजवे आहेत तितकेच ते माणूस म्हणून सरस आहेत. एक प्रेक्षक म्हणून ते इतरांची कामं आवर्जून पाहतात. आपल्या आसपास काय घडतंय याचा सभान मागोवा घेतात. सहकलाकार म्हणून काही गोष्टी ते सांगतात, पण सल्ले देत नाहीत. ते ‘नकळत सारे घडले’ नाटक पाहिल्यावर ते मला म्हणाले, ‘‘हे नाटक बघायला जाताना मला विक्रम काय करणार, तो कसा असणार, कसा दिसणार, कुठे थांबणार, कसा वावरणार वगैरे माहीत होतं. पण तरीही संपूर्ण नाटकभर मला त्याने गंडवलं!’ पुढे नाट्यशिक्षण देताना मला स्वत:ला ‘गंडवलं’ या शब्दाचा अर्थ लागला की, गंडवून घ्यायलाच तर प्रेक्षक नाटकाला जातो आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याला गंडवलं तर तो गंडतो. तसंच ते ‘मित्र’ पाहायला आले तेव्हा म्हणाले, ‘‘सगळ्या अॅक्टर्सनी डॉक्टर लागू शेजारच्या माणसाचं कसं ऐकतात हे बघण्यासाठी हे नाटक पाहायला हवं!’’.

बहुआयामी व्यक्तिमत्व

लेखक, अभिनेता, दिग्दर्शक, लयीचा- गाण्याचा संबंध, स्तंभलेखक आणि उत्तम प्रेक्षक हे सगळं एकत्र असलेली बहुआयामी माणसं फार कमी सापडतात, त्यात दिलीप प्रभावळकर एक आहेत. ते रत्नाकर मतकरींच्या ‘पोर्ट्रेट‘ एकांकिकेचं वर्णन करतात, तेव्हा त्यांचं आणि मतकरींचं नातं किती घट्ट होतं, ते जाणवतं. मतकरींना दिलीप प्रभावळकर आतून अभिनेते म्हणून नीट कळले आणि त्यांनी अनेक बहुरंगी भूमिका त्यांना दिल्या. ‘प्रेम कहाणी’पासून ते ‘चुटकीचं नाटक’पर्यंत किंवा राज्य नाट्यस्पर्धा, बालनाट्यापासून, ‘घर तिघांचं हवं’ , ‘आरण्यक’ वगैरे अनेक नाटकांपर्यंत… प्रत्येक कामातून त्यांचं दोघांचं नातं अधिकाधिक गहिरं होत गेलं. मतकरींच्या ‘घर तिघांचं हवं’मध्ये प्रभावळकरांची भूमिका मोठी नव्हती पण ती किती महत्त्वाची आहे, हे प्रभावळकरांना माहीत होतं. यामध्ये त्यांचं लेखक असणं खूप महत्त्वाचं ठरलं. मतकरी, अतुल परचुरे, डॉक्टर हेमू अधिकारी हे त्यांचे विशेष हळवे कोपरे आहेत.

‘नांदा सौख्य भरे’पासून ‘जावई माझा भला’, ‘आप्पा आणि बाप्पा ‘, ‘कलम ३०२’, ‘वाह गुरू’ आणि आता ‘पत्रापत्री ‘ अशी विविध प्रकारची कामं त्यांनी माझ्याबरोबर केली. ‘पत्रापत्री’च्या वेळेला लक्षात आलं की लेखनसुद्धा ते अभिनेते म्हणून करतात. आपल्याशी सकारात्मक संवाद साधणारा हा रंगकर्मी आहे, असं मला त्यांच्याविषयी नेहमी वाटतं. मग तो संवाद त्यांच्या साहित्यातनं, त्यांच्या नाटकातून आणि त्यांच्या सिनेमातूनही जाणवतो. ‘एक डाव भुताचा’मधली भूमिका असो किंवा ‘झपाटलेला’मधील तात्या विंचू असो, ‘चिमणराव’, ‘टिपरे’, ‘साळसूद’ असो, सगळीकडे त्यांचा तो संवाद प्रकर्षाने जाणवतो.

‘आप्पा आणि बाप्पा’मध्ये दिलीप प्रभावळकर आणि विक्रम गोखले… दोघेही दिग्गज. पण ते एकमेकांना सांभाळून चांगलं काम करायचे. ‘कलम ३०’मध्ये मोहन जोशी आणि प्रभावळकर… परस्परांना काय कॉम्प्लिमेंट करायचे दोघेही! सहकलाकारांना त्यांचा त्यांचा अवकाश देण्याची प्रभावळकर यांची हातोटी विशेष आहे. ‘जावई माझा भला’मध्ये त्यांनी आईचं काम करणाऱ्या अमिता खोपकरवर कुरघोडी करायचा कधीही प्रयत्न केला नाही. ‘विठ्ठला’मध्ये नवीन असलेल्या ज्योती सुभाषला बरोबर घेऊन काम केलं. कुठे काय बोलावं नि कुठे बोलूच नये हे त्यांना बरोबर माहीत असतं. मित्रांमधील चर्चेत कधी राजकीय विषय निघतो तेव्हा मौन हेसुद्धा मतच आहे, असं म्हणून ते गप्प होतात. टीकासुद्धा तितकीच खिलाडूपणे मान्य करतात. ‘पत्रापत्री’ करताना एखादी नकारात्मक प्रतिक्रिया आली तरीही ते अस्वस्थ होतात. त्यातूनच ‘पत्रापत्री’मध्ये नवीन भाग त्यांनी लिहिला. तो कलावंत म्हणून त्यांच्या असमाधानी असण्याचाच एक भाग आहे.

‘थिएटर’मधले जेंटलमन

त्यांच्याशी मैत्री होते, त्यातून मोकळेपणा निर्माण होतो. पण तो असतानाही सार्वजनिक ठिकाणी मात्र ते तुमच्याशी अत्यंत अदबशीररीत्याच वागतील. प्रभावळकरांच्या बाबतीत ज्येष्ठ नाट्यकर्मी अरुण नाईक म्हणतात की, ‘थिएटरमधले ‘जेंटलमन’ जर कोणाला म्हणाल तर ते निश्चितच दिलीप प्रभावळकर आहेत!’ आणि ही अगदी शंभर टक्के प्रभावळकरांची खरी ओळख आहे. त्यांची आजवरची कारकीर्द आणि त्यांना मिळालेले पुरस्कार त्यांच्या बुजुर्गतेची साक्ष पटवतात. रंगभूमीवरील भरीव योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी पुरस्कार; ‘बोक्या सातबंडे’साठी साहित्य अकादमी पुरस्कार ; ‘चौकट राजा’ आणि ‘रात्र आरंभ’ चित्रपटासाठी महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार हे मानसन्मान त्यांना मिळाले आहेत. आज त्यांचं वय ८१ वर्षे आहे. पण काम करण्याच्या त्यांच्या ऊर्जेत इंचभरही फरक पडलेला नाही. अलीकडेच ‘दशावतार’च्या चित्रीकरणापूर्वी त्यांना चिकन गुनिया झाला होता. डॉक्टरनी त्यांना सक्त आरामाची ताकीद दिली होती. पण आपल्यामुळे निर्मात्याचं नुकसान नको, या विचाराने ते कोकणात दाखल झाले. तालमी केल्या. दशावतारी कलाकारांना जाऊन भेटले. तिकडची वर्कशॉप्स केली. कधी नदीत उतरून खोल पाण्याखाली तर कधी रात्री जंगलात फिरून ‘दशावतार’चं चित्रीकरण केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एखाद्या भूमिकेसाठी झपाटल्यागत काम करणं, नवं शिकण्याची ओढ, कामाबद्दल समर्पणाची भावना हे सगळे त्यांचे जबरदस्त पैलू आहेत. नाटकाचा प्रयोग असेल तेव्हा ते दुसरं काही घेणार नाहीत. इतरांसारखे शूटिंग करून धावत-पळत प्रयोगाला पोहोचणार नाहीत. मी एकदा त्यांना विचारलं होतं, स्वत:तला लेखक बाजूला ठेवून दुसऱ्या लेखकाचं काम करताना तुम्हाला त्रास होतो का? तर याचं उत्तर नाही, असं होतं. लेखकाने असंच का लिहिलं असे प्रश्न ते विचारत नाहीत. तसंच ते कधीही नाटकात याला घे, त्याला घे अशा सूचना करत नाहीत. परस्पर दुसऱ्या नटाला काहीही सांगण्याच्या तथाकथित मार्गदर्शकाच्या भूमिकेत ते कधीच जात नाहीत. पण तरीही अनेक अर्थांनी ते खूप लोकांचे मार्गदर्शक आहेत. आपल्या व्यक्तित्वाचे सगळे कप्पे त्यांनी अगदी सहज आणि उत्तम सांभाळले आहेत. व्यावसायिक आयुष्याबरोबरच वैयक्तिक जीवनातही त्यांनी समतोल राखला आहे. कुठलाच माणूस परिपूर्ण नसतो हे मान्य करूनसुद्धा, माझ्या आसपासची जी माणसं मला इतकी वर्षं दिसली आहेत, त्यात परफेक्शनच्या जवळ जाणारी व्यक्ती ही दिलीप प्रभावळकरच आहेत! ८१ व्या वाढदिवसानिमित्त या तरुण, हरहुन्नरी, मनस्वी कलावंताला शुभेच्छा!

शब्दांकन : सुगंधा लोणीकर