‘‘सत्यवतीचा जन्म नाशिक जिल्ह्यातील मुल्हेर येथे १९१२ मध्ये झाला. तिच्या वडिलांचे नाव वासुदेवबुवा पंडित, तर आईचे भागीरथी होते. सत्यवतीचे शिक्षण इयत्ता पाचवीपर्यंत झाले होते. ती १३ वर्षांची असताना १९२६च्या जूनमध्ये तिचा विवाह माझ्याशी झाला. मी त्यावेळी २६ वर्षांचा होतो. संस्कृतविद्योचे बरेचसे शिक्षण घेऊन प्राज्ञपाठशाळेत स्वामी केवलानंद सरस्वती यांच्या देखरेखीखाली शास्त्रांचे अध्यापन करू लागलो होतो. वडील व गुरुवर्यांनी विवाहाची आज्ञा केली होती. म्हणून जन्मगावी पिंपळनेर येथे कन्या संशोधनाकरिता गेलो. अगोदर निरनिराळ्या गावी दोन मुली पाहिल्या. वडिलांचे मित्र करमरकर बंधूंनी पुढाकार घेऊन मुल्हेरच्या वासुदेवबुवा पंडितांची कन्या कावेरी हिला दाखविले. सामुद्रिक शास्त्रात थोडी गती असल्याने मी हस्तरेषा पाहून पसंतीचा प्रस्ताव ठेवला. हस्तरेषा पाहून मग समाधान व्यक्त केले; पण अजून स्थळे पाहायची असल्याने निर्णय नंतर करू म्हटले; पण करमरकर बंधूंनी, ‘तुम्ही कन्येचे सर्वांसमक्ष पाणीग्रहण केल्याने तुम्हास दुसरा पर्याय नसल्याचे’ लक्षात आणून दिले. त्यांचे म्हणणे मी मान्य केले.
पंधरा दिवसांत मुहूर्त ठरविला. पिंपळनेरहून ११ बैलगाड्यांचा जानोसा (वऱ्हाड) मुल्हेरला गेला. तेथील रामानंद संस्थानी विवाह पार पडला. पहिल्या दिवशी समावर्तन (सोडमुंज), दुसऱ्या दिवशी विवाह, तिसऱ्या दिवशी उरलेली कर्मकांडे आटोपून जानोसा पिंपळनेरला परतला. लग्नास दोन हजार रुपये खर्च आला. तो सर्व मोठे बंधू वेणीमाधव यांनी केला. पुढेमी महात्मा गांधींच्या निकट सहवासात आलो. सत्यवतीला या गोष्टीचा अभिमान होता. तिला गांधींचे दर्शन हवे होते. ते झाल्यावर तिने बोटातील एक तोळ्याची सोन्याची अंगठी महात्मा गांधींना अर्पण केली. (१९३४) माझ्या प्रत्येक सुख-दु:खात तिची साथ महत्त्वाची ठरली.
सन १९२९ पर्यंत मी घरी नित्यनियमाने पूजापाठ करीत असे. भटकंतीमुळे देव पारोसे राहात. पत्नीची तक्रार असे. एके क्षणी मी देव्हाऱ्यातील सर्व देव कृष्णार्पण केले व पूजेच्या कर्मकांडातून मुक्त झालो. पुढे फक्त मानसपूजा करीत राहिलो. सन १९३७ ला ‘धर्मकोश’ छपाईच्या कामानिमित्ताने आमचे वाईचे बिऱ्हाड आम्ही पुण्यास टिळक पथावरील चिमण बागेतील आपटे वाड्यात हलविले. तिथे सन १९४० पर्यंत होतो. या काळात अनेक छापे, अडचणीचे प्रसंग आले. सत्यवतीच्या खंबीर साथीमुळे सारे निभावले.
१९४६ ते १९५७ या काळात मधुकर, वासुदेव, सुमन, मालती अशी चार अपत्ये झाली. घरची परिस्थिती ओढग्रस्तीची होती. मुले मोठी होताना केवळ मुलाला अधिकचे शिकवायचा विचार सत्यवतीने मानला नाही. स्त्री जातीच्या परावलंबित्वाबद्दल ती स्वानुभवाधारे सजग व हळवी होती. आई-वडिलांनी मुलगा-मुलगी असा फरक करू नये, असे तिचे ठाम मत असल्याने आम्ही चौघांनाही समान शिक्षण व संधी दिली. परिणामी, मुला-मुलींचा आमच्या पुढचा संसार सुखाचा झाला. हे सारे श्रेय सत्यवतीचे.
सन १९४९ पासून ते १ मार्च, १९५५ ला समाधी घेईपर्यंत स्वामी केवलानंद सरस्वतींची देखभाल सत्यवतीने गुरुऋण म्हणून केली. नंतरच्या काळात ‘धर्मकोश’, ‘मीमांसाकोश’, ‘मराठी विश्वकोश’ निर्मितीच्या काळात येणाऱ्या प्रत्येक अभ्यागताचे आतिथ्य सत्यवतीने केले. ती प्राज्ञपाठशाळा व मंडळांची कोणीही नव्हती; पण तेथील सर्व सरबराई आपले घरचे कार्य म्हणून तिने केले. तिला कोणताच भेद मान्य नसे. यामुळे आमचे घर सर्वांचे सर्वकाळचे सदावर्त राहिले. माझा काटकसरीचा संसार तिच्यामुळे निभावला. तिने १२ ऑगस्ट, १९७८ ला संध्याकाळी ५ वाजता आपली जीवनयात्रा अचानक संपविली. अंत्यसंस्कारादि कर्मकांडावर तिचा विश्वास नव्हता.
मी आता एकटाच एकान्तात रडत आहे. तिच्या शाश्वत दिव्यत्वाचा भास होत आहे. ती सदेह होती, तेव्हा माझी सहचारिणी होती. म्हणजे दिव्यत्वाची मूर्तीच! तिच्या सहजीवनातील अनेक प्रसंग भास वाटताहेत. तिचे यौवन सरले तरी मला ती युवतीच भासे. १४ तास उभी राहून सर्व कामे उरकत असे. थोडा वेळ आडवी पडेल इतकीच विश्रांती. उतारवयाचा तिच्या मनावर परिणाम नव्हता. मन चिरतरुणच राहिले. तिच्या सहवासात ५२ वर्षे कशी सरली कळलेच नाही.’’
– डॉ. सुनीलकुमार लवटे
drsklawate@gmail.com