गंध आणि सुगंधाचे रंध्र हळूहळू विकसित होत जातात. बऱ्याचदा मरतातही किंवा बधिरता येते त्यांना. मोठ्या गटाराच्या शेजारी घर असणाऱ्यांना त्या वासाची सवय होते. तसंच एखाद्या अत्तराच्या दुकानात काम करणाऱ्याचीही सुगंध जाणवण्याची क्षमता हळूहळू कमी होते. एखादी शिवी वारंवार दिली की, त्यातील अश्लीलता गळून पडते, तसंच आहे हे. पण श्रावण-भाद्रपद हे महिने सर्जनशील दरवळाचे. हरतालिकेनंतर गणपती, गौरीपूजन, घटस्थापना, विजयादशमी या काळात नाना प्रकारचे गंध येतात. रान हिरवाईने नटलं की, त्याचा एक गंध. डोंगरमाथ्यावर बहरून आलेल्या रानफुलांचा एक वेगळाच वास. उग्र वाटावा असा. जसा कडसर. पण हे सारं पाऊस सुखाचा झाला तर. बदबदा कोसळला तरी अडचण आणि वेळेवर नाही आला तरी खोळंबा. पण एकदा तो आला की, याच काळात फुलांच्या शेतीचा एक बहार असतो. जाई, जुई, मोगरा, शेवंती, झेंडू, निशिगंध, गुलाब अगदी नव्या जरबेरासह किती तरी फुलं आता नगदी बाजारपेठेत दाखल झालेली. हा व्यवहार पहाटे फुलणारा. मुंबईच्या बाजारपेठेत वेळेवर गाडी पोहचावी म्हणून फुलं किती वाजता तोडायची याचं नियोजन किती तरी आधी करावं लागतं. फूल कोमेजून जाण्यापूर्वी सारे व्यवहार पूर्ण करण्याच्या नाजूक व्यवसायाचं एक स्वतंत्र गणित आहे.

दादासाहेब शिंदे १६ एकर शेतीपैकी पाच एकरात फूलशेती करतात. या शेती व्यवस्थापनाचा दैनंदिन व्यवहार तोडणीवर अवलंबून. एकदा फूल तोडलं की व्यापाऱ्यापर्यंत पोहचलं पाहिजे तेही ताजं. दररोजचा दर वेगळा. कधी लांब दांडीचा १०० गुलाब फुलांचा गठ्ठा २५० रुपयांना जातो तर कधी ६० रुपयांना. पण पैसा दररोज खेळता राहणारा. त्यामुळे नफ्यातोट्याचं गणित वर्षाच्या शेवटी काढलं पाहिजे, असं त्यांचं मत. जेवढं काम वेळेवर तेवढे पैसे अधिक. फूल आणि फळ शेतीवर सरकारी दराचं नियंत्रण नाही. त्यामुळे नफ्याचं गणित कधी ५० ते ५५ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतं. आता केवळ सुगंधी फुलांचा बाजार राहिला नाही. आता सुगंधाबरोबर फुलांचा गुच्छ सजविण्यासाठी लागणाऱ्या फुलांची शेतीही वाढते आहे. सुगंध आणि सजावटीचा नवा डाव आहे नव्या बाजारपेठेत.

तीन मडक्यांमध्ये पाणी भरलं आहे. ते कुंभ गर्भगृहाचं प्रतीक म्हणून मिरवले जाताहेत. समोर कोणी पुजारी देवीची कवनं म्हणत आहे. आई राजाचा उदोकार होतो आहे. घटांची स्थापना होते. त्या मातीत अनेक प्रकारचं बियाणं टाकलं जातं. जे उगवून येईल ते पुढे रब्बीत पेरायचं. एक प्रकारे बीज प्रमाणीकरणाची प्रक्रिया. पण जे उगवून येईल ते विजयादशमीला डोक्याच्या टोपीत घालून मिरवायचं. या सर्जनशील सोहळ्याच्या काळात मंदिर फुलांनी सजवलं आहे. हळदी- कुंकू, धूप, उदबत्ती, कापूर याचा एकत्रित सुगंध येतो आहे. या प्रत्येकाचा स्वतंत्र गंध पकडता येण्यासाठी रंध्र विकसित व्हावी लागतात. तीन पिढ्या अत्तरांच्या व्यवसायात गेलेले मोहम्मद इब्राहीम फारुकी सांगत होते, ‘सुगंधाचा व्यवसाय नाजूक हाताचा. अत्तर विकत घ्यायचं असेल तर त्याचं मापच तोळ्यात.’ सोनं आणि अत्तर याचं परिमाण एक का असेल? एक फरक आहे एककात. दहा ग्रॅमचा एक तोळा पण अत्तराचा तोळा ११.६६ ग्रॅमचा. तोळ्यात अत्तर मोजता येईल पण वास? प्रत्येकाच्या वासाची जात आणि पोतही निराळा. एखाद्याला गुलाब आवडेल तर दुसऱ्याला जाई-जुई. एक अत्तराची कुपी जवळ बाळगावीच असं वाटणारी माणसं तशी शौकीन. अत्तर बाळगणाऱ्यांची एक मिजास असते. आता जीवनशैली बदलली आहे. महिलांच्या बरोबरीने पुरुषांच्या सौदर्यप्रसाधनांची स्वतंत्र बाजारपेठ निर्माण झाली आहे. त्यात अत्तराची कुपी ‘डायल्यूट’ आणि ‘ब्लेंड’ही झाली. ‘डिओडरन्ट’ आता जीवनशैलीचा एक भाग. अस्सल दरवळाचा पिच्छा करणारे शौकीन मात्र आजही अगदी ७० हजार रुपये तोळा या दराने अत्तर विकत घेतात.

काही शहरांचा एक रुबाब असतो. शहर ऐतिहासिक असेल तर एखादी अत्तरगल्लीही असते. उत्तर प्रदेशातील कनोज हे अत्तराचं केंद्रस्थान. बहुतेक विक्रेते याच शहरातून अत्तर मागवतात. नाना फुलांचा गंध साठवण्याची ही प्रक्रिया तशी वेळखाऊ. म्हणजे एका भांड्यात हव्या त्या सुगंधाची फुलं घ्यायची आणि ती पाण्यात उकळत ठेवायची. त्याची वाफ करत राहायचं. त्यातलं पाणी वेगळं काढायचं. वरच्या बाजूला बाष्पीभवनानंतर तेल साठून राहतं. हे तेल म्हणजे अत्तर.

वाळा म्हणजे खस, मेहंदी म्हणजे हीना, केवडा, जाई, जुई अशा अनेक फुलांचा पानांचा गंध काढून घेण्यासाठी उर्दूत या प्रक्रियेला चांगला शब्द आहे ‘रूह’ काढून घेणे. दरवळ हा फुलांचा आत्मा. तो साठवून ठेवायचा, हे मोठ्या कष्टाचं काम. अलीकडे अत्तराचा व्यापार वाढत आहे. त्याचा खरा वापर सुगंधी तंबाखूमध्ये अधिक. सुगंधी सुपारी बनविणारे अत्तराचे मोठे खरेदीदार. अंगी सुगंध बाळगणारे तसे कमीच. तरीही अत्तराचा वापर आता पूर्णत: बदलला आहे. अगदी तरुण मुलांमध्येही ‘डिओ’ ही अपरिहार्य वस्तू आहे.

वेगवेगळ्या बाटल्यांमध्ये साठवलेले ३५० हून अधिक सुगंध. या बाटल्यांचाही डौल निराळा. काही अगदीच नाजूक लहान मुलाच्या करंगळीसारख्या. तर काही फडताळात मिरवायच्या. गंध विक्रेते या बाटल्यांचे टोपण पुढे करतात. गुलाब, मोतिया, खस, मोगरा, केवडा, चंदन, लिली, चमेली या फुलांबरोबर काही रसायनांनी बनवलेले वगेवेगळे वास. मस्क रिजादी, उद जाफरान, मर्ज, बिनशेख, अशी दोन अत्तरे मिसळून केलेला गंध वेगळ्याच जगात नेणारा. किरकोळ बाजारात मनगटावरही अत्तर लावून वास घ्यायला पूर्वी सांगायचे विक्रेते. पण आता तसे कोणी करत नाही. या डौलदार बाटल्यातून नानापद्धतीचा दरवळ रंध्रांना उत्तेजित करणारा. काही वेळा फुलवणारा. काही उग्र दरवळ लांबपर्यंतच्या माणसाच्या नासिकेपर्यंत जाणारे.

ऊद आणि त्याचेही गंध निराळे. काही अगदीच तरल. सुगंधाच्या या व्यापारात फ्रान्सचे नाव आघाडीवर. जगभरातील सुगंधाचा हा व्यापार दुबईत अधिक. तसे धार्मिक अंगानेही सुगंधाचे महत्त्व अधिकच. ईश्वरासमक्ष जाताना किमान स्वच्छ होऊन जा. मंदिरात जाताना हातापाय धुतात. मशिदीमध्ये वजू करतात, अत्तरही लावतात. प्रत्येक सणावारात सुगंधाचं एक वेगळंच स्थान आहे. पण अत्तराच्या बाटलीच्या तोंडावर तो छोटा चेंडू कसा बसवत असतील याची उत्सुकता सतत कायम असते. पण ‘स्प्रे ’ पंप आला आणि सुगंधाचा हा व्यवसाय तसा बहरला. वापरातील सहजपणा वाढला आणि जगभरात सुगंधाची एक बाजारपेठ नव्याने विकसित झाली आहे.

गौरी आगमनानिमित्त जेवणाच्या तयारीत भुकेला चाळवणारे अनेक गंध घरभर पसरलेले असतात. साखरभातात वेलची नसेल तर किंवा लवंगच नसेल किंवा एखाद्या भाजीमध्ये हिंगच नाही टाकला तर चव बिघडत नाही, वासाचं गणित बिघडतं. एखादा खरपूस वासही एखाद्याला चांगला वाटतो. काही जण वासाने चव चाखतात. आरतीच्या पुरणात कापराचा एक गंध सहज मिसळून गेलेला. एका वेगळ्याच वासाची चव येते. उदबत्ती या शब्दातच ऊद आहे. ऊद हा आसाममधून येतो म्हणे. जेवढा ऊद चांगला त्यात हव्या त्या फुलाचा गंध मिसळायचा. मोठ्या काड्यांना तो चिकटवून उदबत्ती तयार होते. किती काड्या, कोणता सुगंध याचा तपशील पाहणारे गिऱ्हाईक आताशा कमी झाले आहेत. घरात सुगंध असावा म्हणून एखादी अगरबत्ती जळत असायची. आता ‘रूम फ्रेशनर’ आले आहेत. जागा बदलतात त्या अशा. लक्षात येतच असं नाही, कारण बाजारपेठेचा रेटा अधिक असतो. पण सुगंधाच्या बाजारपेठेत तसा पैसा असणाराच मनुष्य जातो. मग भाषाही तसंच रूपडं घेऊन येते. घरी काय अत्तराचे दिवे लागले आहेत का, असा शब्द प्रयोग होतो. अर्थात केवढी ती उधळपट्टी. पण पुष्पार्क गोळा करणारी मंडळी आणि त्याचे विक्रेते यांची एक वेगळीच बाजारपेठ आहे. आता केवळ विलासी माणसं अत्तर वापरतात असं नाही. आता धार्मिक संस्कार, अभ्यंगस्नानात अत्तराचा उपयोग प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. चंदन, ऊद, अबीर जाळून निर्माण केला जाणारा गंध नवा आनंद देणारा. हा सगळा व्यवहार उत्तर भारताशी जोडणारा. उत्तरेचा हा व्यापार देशभर दरवळतो आहे. तो गंध साठवून घेताना एक मोठा श्वास घ्यायचा. जगण्याला आणखी काय लागतं?