चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक सचिन कुंडलकर यांच्या ‘कोबाल्ट ब्लू’ या मराठी पुस्तकाची ख्याती कुठल्याही मोठ्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या भारतीय आंग्ल पुस्तकाइतकी असल्याचे आपल्या गावी नसते. म्हणजे ब्रिटनच्या ‘गार्डियन’ वृत्तपत्रात इंग्रजीत भाषांतरित झालेल्या या कादंबरीतला भाग ‘ट्रान्सलेशन ट्यूसडे’ मालिकेत २०१६ साली आला होता. ‘इलेक्ट्रिक लिटरेचर’ जगभर वाचल्या जाणाऱ्या साहित्यविषयक अमेरिकी संकेतस्थळावर पहिले मराठी नाव झळकले ते कुंडलकरांचे. याच कादंबरीतील एक प्रकरण त्यांनी प्रसिद्ध केले. त्यानंतर हे पुस्तक ‘डीएससी प्राइझ फॉर साऊथ एशियन लिटरेचर’ आणि ‘क्रॉसवर्ड बुक अवॉर्ड’ या दोन महत्त्वाच्या आशियाई पुरस्कारासाठीच्या लघुयादीत होते. मधल्या काळात चित्रपट-वेबमालिका यांच्या व्यग्र धांदलीतही त्यांच्यातील लेखक आणि वाचक सक्रिय असल्याच्या खुणा दिसत राहिल्या. त्यांनी लिहिलेल्या ‘मोनोक्रोम’ या त्रिखंडात्मक कादंबरीचा पहिला भाग ‘रेशीम मार्ग’ मराठीमध्ये २०२३ साली ‘पपायरस प्रकाशना’ने प्रकाशित केला. या पहिल्या भागाचा आकाश करकरे या तरुण अनुवादकाने केलेला इंग्रजी अनुवाद ‘सिल्क रूट’ येत्या आठवड्यात ‘पेंग्विन इंडिया’तर्फे प्रकाशित होतोय. कोबाल्ट ब्लू ही कादंबरीदेखील इंग्रजीत (भाषांतर – जेरी पिंटो) आणि हिंदीत (भाषांतर – गीत चतुर्वेदी) पेंग्विननेच केली आहे.
नवी कादंबरीमालिका मोनोक्रोम कशावर आहे? तर ‘मोनोक्रोम’च्या कथाविश्वात एका व्यक्तीच्या खुनाच्या कथेवर दीर्घचिंतन आहे. पहिला भाग ‘रेशीम मार्ग’ ज्याचा खून झाला त्या व्यक्तीचे भावविश्व रेखाटतो; तर दुसरा भाग ‘बेट’ हा ज्या व्यक्तीने खून केला त्या व्यक्तीचे सखोल आणि संवेदनशील विस्तृत अनुभवविश्व आपल्यासमोर सादर करतो. मानवी हिंसा आणि त्याची प्रत्येकाच्या मनात साठून राहिलेली सुप्त भूक यांविषयी कथाविश्व साकारले आहे. जगातील प्रत्येकाला आपण सगळे अप्रत्यक्षपणे अनेक संवेदनशील, आपल्यापेक्षा वेगळी जाणीव घेऊन जगणाऱ्या आणि एकट्या जिवांचे खुनी आहोत ही भावना परावर्तित करणारे कथाविश्व ‘अंधारातील आवाज’ या तिसऱ्या भागात कुंडलकर मांडणार आहेत. प्रत्येक भागाच्या निर्मिती आणि प्रकाशनामध्ये घेतलेला अवकाश हा लेखकाला लेखनासाठी लागणारे आवश्यक वाचन, त्यासाठी करावा लागणारा प्रवास आणि त्यातील संदर्भाने येणारे संगीत ऐकण्यासाठी पूरक ठरावा अशी या लेखनप्रकल्पाची आखणी झालीय. ‘बेट’ हा दुसरा भाग २०२६ च्या सुरुवातीला प्रकाशित होईल.
असे – आखणी करून कादंबरी लिहिण्याची, तिच्या अनुवादासाठी दमसास घेण्याची आणि तिला जगभर पोहोचविण्याची धमक दाखविणाऱ्या कुंडलकर यांच्यासारखे – किती मराठी लेखक दिसतात?